राजांची जुलुमी सत्ता नष्ट करण्याचा हुकूमशाही हाहि एक उपाय दिसतो; पण विस्तवानें विस्तवाशीं खेळणें मूर्खपणाचें व व्यर्थ होय. एक हिंसक प्रकार जाऊन त्याच्या जागीं दुसरा येणें इतकाच त्याचा अर्थ ! राजघराण्यांतील पुरुषाला पदच्युत करून सामान्य कुळांत जन्मलेला तेथें येऊन बसतो इतकाच फरक. पण राष्ट्राचें दास्य कायमच असतें, स्वातंत्र्य दूरच असतें. अनियंत्रित राजशाही व फॅसिझम हुकूमशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे एकाच शासनपध्दतीचे दोन पोटभेद अनियंत्रित सत्ता चालविणार्‍या हुकूमशहांचाच हा एक प्रकार. जर्मनींतीलं व इटलींतील फॅसिझम पाहिल्यास असें दिसून येईल कीं, मानवांतील अत्यंत निंद्य व अत्यंत जुलुमी प्रवृत्तींच्या हातीं तेथली सर्व सत्ता देण्यांत आली आहे. त्यां सिंहासनावर आहेत. अर्वाचीन हुकूमशहा हा मानवांतील अत्यंत निंद्य प्रवृत्तींचा प्रतिनिधी होय.

- ३ -

पण अर्वाचीन हुकूमशहा नैतिकदृष्ट्या अत्यंत कमी दर्ज्याचा असला तरी त्याच्या ठायीं राजकारणांतील धूर्तता मात्र भरपूर प्रमाणांत असते. राजकारणांत तो हुषार असतो. हिटलर-मुसोलिनीसारखे लोक सत्ताधारी होतात तेव्हां त्यांच्यासमोर (१) विस्कळित राष्ट्राची एकी करणें, (२) राजकीय चळवळीसाठीं पैसे पुरविणार्‍या श्रीमंतांचे हितसंबंध संभाळणें व त्यांचा पुरस्कार करणें व (३) आपल्या हातीं सत्ता ठेवण्याची अपरंपार अभिलाषा (हाच सर्वांत महत्त्वाचा हेतु) असे तीन हेतू असतात. पहिले दोन तिसर्‍याच्या पूर्ततेसाठीं असतात. ज्यांतील प्रत्येक व्यक्ति स्टेटशीं राजनिष्ठ असेल असें संघटित एकजुटीचें इटली राष्ट्र आपण निर्माण करीत असल्याची घोषणा करताना मुसोलिनीच्या डोळ्यांसमोर असलेलें राजकीय तत्त्वज्ञान त्याच्या दृष्टीनें बरोबर व खरेंच असतें. आपल्या फायद्यासाठीं वाटेल तेव्हां हातीं धरतां येण्यासारखी, सार्‍या इटलीची मिळून एकमुठी तलवार तो तयार करूं इच्छी. आपल्या हेतूवर उघड टीका होऊं नये असें वाटत असल्यामुळेंच तो भाषणस्वातंत्र्याची गळचेपी करी. सार्वजनिक मतांची, त्यांमुळें इटलीचें अकल्याण होईल म्हणून नव्हे, तर आपल्या सत्तेला धोका येईल म्हणूनच त्याला भीति वाटे. भांडवलशाही व कामगार यांच्यांत ऐक्य (वस्तुत: तें नाममात्रच असतें) व अविरोध आहेत असें दाखविण्याची खटपट तो करी याचें कारण, देशांत झगडे व लढे असतील तर त्यामुळें स्वत:ची सत्ता संपुष्टांत यावयाची व देशांत उघड गोळीबार सर्वत्र होऊं लागल्यास एकाद्या वेळीं त्यांत आपलेंहि डोकें जखमी व्हावयाचें अशी त्याला भीति वाटे हें होय. मुसोलिनी सर्वांना दडपून टाकून समाजास गुलाम करून ठेवूं इच्छीत असे. कारण, असें केलें तरच त्याला स्वत:ची सत्ता टिकविणें शक्य असे. लोकांना मारूनमुटकून समाधानी ठेवण्याच्या खटाटोपोमुळेंच लोकांच्या तक्रारींकडे तो दुर्लक्ष करी. वर्तमानपत्रांना तो हुकूमशहा व त्यांचें धोरण यांचें नेहमीं समर्थन करण्यास बजावी. हुकूम न पाळणार्‍यांना तो गोळया घालून गप्प बसवीत असे व हें सर्व करून अत्यंत प्रामाणिकपणानें व मोठ्या आढ्यतेनें जगाला सांगे, ''पाहा, इटलींत कसें ऐक्य आहे ! येथें एकहि विरोधी आवाज नाहीं.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel