हॅनिबॉल कार्थेजहून येणार्‍या सैन्याची व वाहतुकीची वाट पाहत होता.  आपण लवकरच मदतीस येतों असा त्याचा भाऊ हस्द्रुबॉल याचा निरोप आला.  नीट सुसज्ज असें प्रचंड सैन्यच नव्हे तर रोमला वेढा घालण्यासाठीं जरूर तीं यंत्रेंहि घेऊन हस्द्रुबॉल येणार होता.

हस्द्रुबॉल विजयी होत होत उत्तरेकडून आल्प्सच्या मार्गानें येत होता.  त्यानें स्पेनमधील रोमन शिबंदीचा फन्ना उडविला होता व तो आतां इटलींत येणार होता.  ही विजयकर्ता कानीं पडतांच हॅनिबॉल आनंदला व आपली आणि हस्द्रुबॉलची गांठ कोठें पडावी हें त्यानें ठरविलें.  दोघांची गांठ पडल्यावर दोघेहि टायबर नदीच्या तीरावरील रोम शहरावर चालून जाणार होते.

हॅनिबॉल हस्द्रुबॉलची वाट पाहत असतां हस्द्रुबॉलऐवजीं रोमन लोकांनींच त्याला एक अभिनंदनपर भेट पाठविली.  हॅनिबॉल ती उघडून पाहूं लागला तों आंत त्याला काय आढळलें ?  त्याच्या भावाचें मुंडकें !  रोमन लोकांनीं हस्द्रुबॉलच्या सैन्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार केलें होतें.

- ५ -

भावाच्या मरणामुळें हॅनिबॉलच्या आशा धुळीस मिळाल्या ; त्याचे मनोरथ ढांसळले.  इटलींत यापुढें एक क्षणहि राहणें उपयोगी नव्हतें ; नव्हे, तें मूर्खपणाचेंच ठरलें असतें.  हस्द्रुबॉलवर मिळालेल्या विजयामुळें रोमनांनींहि चढाई सुरू करून भूमध्यसमुद्रांतून एक सैन्य खुद्द कार्थेजवर पाठविलें.  कार्थेज संकटांत पडलें.  हॅनिबॉलला स्वत:च्या नगरीच्या रक्षणार्थ धांवपळ करीत मागें फिरावें लागलें.  किती तरी वर्षांनीं तो स्वदेशांत परत आला होता.  तो भरतारुण्यांत इटलींत गेला होता ; त्या वेळीं त्याच्या नसांनसांत रोमनांचा द्वेष भरला असून त्याला तेव्हां विजयाबाबत खात्री होती.  पण आतां त्याच्या डोळ्यांवरची झांपड उडाली होती ; तो हताश होऊन वृध्दावस्थेंत कार्थेजला परतला होता.  त्याच्या मनांतील द्वेषबीजाचेंच आतां निराशेच्या हलाहलांत रूपान्तर झालें होतें व तें त्याला सारखें जाळीत होतें.  त्याच्या देवांनीं त्याची वंचना केली होती.  आपला नक्की पराजय होणार हें जाणून तो लढत होता—गमावलेल्या गोष्टीसाठीं लढत होता.  तरीहि तो डगमगला नाहीं.  सैन्याचे अवशिष्ट जीर्णशीर्ण भाग घेऊन तो उभा राहिला.  ख्रि.पू. २०२ मध्यें झामा येथें रोमनांची व त्याच्या सैन्याची गांठ पडली.  कार्थेजियनांचा पुरा मोडा झाला.  हॅनिबॉलनें तहाचीं बोलणीं सुरू केलीं.

हॅनिबॉल कार्थेजमध्यें कांही दिवस सार्वजनिक खात्यांचा मंत्री म्हणून काम करीत होता.  पण आपल्या अमर द्वेषाच्या शमनार्थ रोमवर पुन्हां जंगी स्वारी करण्याची तयारी तो गुप्तपणें करीत असल्याची कुणकूण कानीं आल्यामुळें रोमनांनीं साशंक होऊन कार्थेजकडे हॅनिबॉलला आपल्या ताब्यांत देण्याची मागणी केली.  आपल्या भावाचा क्रूरपणें करण्यांत आलेला वध डोळ्यांसमोर असल्यामुळें हॅनिबॉल आश्रयार्थ आशियामायनरमध्यें अ‍ॅन्टिओकसच्या दरबारीं पळून गेला.

पण रोमन तेथेंहि त्याच्या पाठोपाठ आले.  तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं अशी सारखी धांवपळ करीत होता व शत्रूहि सारखे त्याचा पाठलाग करीत होते.  शिकारी कुत्रे पाठीस लागावे त्याप्रमाणें रोमन त्याचा पिच्छा सोडीनांत.  वन्य पशूंची शिकार करणें हा तर रोमनांचा आवडता खेळ होताच ; पण पराभूत व भयभीत शत्रूची शिकार करणें हा त्यांचा त्याहूनहि आवडता खेळ होता.  शेवटीं काळ्या समुद्राच्या तीरीं बिथिनिया येथें तो पकडला गेला.  निसटून जाणें अशक्य असें वाटलें तेव्हां त्यानें आत्महत्या केली.  'रोमनांची चिंता सरावी, त्यांना हायसें वाटावें म्हणून मी स्वत:च स्वत:ला मारून घेतों' असें तो उपहासानें म्हणाला.

म्हातार्‍या व अगतिक हॅनिबॉलचा सूडबुध्दीनें असा सारखा पाठलाग करणें हें खरोखर गुन्हेगारींचे कृत्य होतें.  पण पुढें सर्व कार्थेज शहराचा जो जाणूनबूजूस खून करण्यांत यावयाचा होता त्या नीचतम व अति भयानक गुन्ह्याची ती केवळ नांदी होती ; त्या घोरतम पापाची ही केवळ प्रस्तावना होती.

कार्थेज शहराचा बळी कसा घेण्यांत आला ती कथा पुढील प्रकरणांत सांगूं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel