प्रकरण ७ वें
रशियावर सुधारणा लादणारा पीटर दि ग्रेट
- १ -

सतराव्या शतकांत रशिया अत्यंत मागासलेला देश होता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, वगैरे पश्चिमेकडील देश सुसंस्कृत रानटीपणाच्या दशेला जाऊन पोंचले होते. पण रशियाचा रानटीपणा मात्र अजूनहि ओबडधोबडच हाता; त्याला पॉलिश मिळालें नव्हतें. रशियांतील स्लाव्ह लोक मूळचे मध्य आशियांतले. ते येथून युरोपांत आले. चेंगीझखानानें त्यांना एकदां जिंकलें होतें. कॉन्स्टँटिनोपलच्या मिशनर्‍यांनीं त्यांना रोमन कॅथॉलिक बनविलें होतें. असे हे स्लाव्ह लोक शेंकडों वर्षे अज्ञानी, दुबळे व दंतकथा आणि नाना रूढी यांनीं भारलेले होते. १४६३ सालीं तार्तर रशियांतून घालविले गेले; पण त्यामुळें रशियनांची स्थिती सुधारली असें नाहीं. तार्तर हुकूमशहाच्या जागीं स्लाव्ह हुकूमशहा आला. मॉस्काव्हाचा ग्रँड ड्यूक तिसरा इव्हान आपणास रशियाचा उध्दरकर्ता म्हणवीत असे. पण रशियनांना आगींतून निघून फुफाट्यांत पडल्याप्रमाणें झालें. त्याच्या नातवानें प्रथम सीझर-झार-ही पदवी घेतली. त्याचेंहि नांव इव्हानच होतें. त्याला 'भयंकर'-इव्हान दि टेरिबल-म्हणत. त्यानें तर अधिकच जुलूम केला व प्रजेला केवळ गुलाम केलें. तार्तरांची हुकुमत होती तोंपर्यंत शेतकर्‍यांना थोडें तरी स्वातंत्र्य होतें; पण झारांच्या सुलतानशाहींत त्यांची स्थिति केवळ गुरांढोरांप्रमाणें झालीं ! डुकरें, गाई, बैल शेतावर असतात तद्वत् हे शेतकरीहि तेथें राहात व राबत. त्यांना कशाचीहि सत्ता नव्हती.

रशिया आतां जणूं एक जंगी वसाहतच बनला-लाखों मजूर व एकच धनी ! झार जमीनदारांना व सरदारांना फटके मारीत, जमीनदार व सरदार शेतकर्‍यांवर कोरडे उडवीत आणि सर्वांच्या वर आकाशांत भीषण असा परमेश्वर होता. झारविरुध्द बंड करणार्‍यांना व चर्चची अवज्ञा करणार्‍यांना गांठाळ चाबकानें फोडून काढावयाला तो परमेश्वर बसलेला हाता. जणूं भीषण अशी कोसॅकचीच मूर्ति !

झारांच्या अहंकाराची बरोबरी त्यांचें अज्ञानच करूं शके. अहंकार भरपूर व अज्ञानहि भरपूर ! ते केवळ निरक्षर टोणपपे होते. ते व्यसनी, व्यभिचारी, विलासी होते. ते आपल्या प्रजेसमोर आपल्या वैभवाचें प्रदर्शन करीत, राजवाड्यांत डुकरें पाळीत, मोठमोठ्या मेजवान्यांच्या वेळीं ते खुशाल टेबलावरील कपड्यावर नाक शिंकरीत व आपल्या पाटलोणींस बोटें पुशीत ! ते गणवेश करीत तेव्हां त्यावर शेंकडों पदकें लावीत. पण त्यांच्या शरीरांना कित्येक दिवसांत स्नान माहीत नसे. प्रवासांत असत तेव्हां ते एकाद्या खाणावळींत उतरत व एकाद्या मोलकरणीजवळ चारचौघांत खुशाल झोंपत ! ते दैवी सामर्थ्याचा आव आणीत व भुतांची भाषा वापरीत. नवीनच मिळालेल्या सत्तेनें ते जणूं मस्त झाले होते ! ते दारू प्यालेल्या जंगली माणसांप्रमाणें वागत. त्यांना चालरीत माहीत नसे, सदभिरुचि ठाऊक नसे.

रशियाची राजधानी मॉस्को येथें होती. झारमध्यें वैभव व वेडेपणा, सत्ता व पशुता यांचें मिश्रण होतें. त्याचप्रमाणें मॉस्को राजधानी सौंदर्य व चिखल यांनीं युक्त होती. मास्कोकडे येणारे रस्ते फक्त हिंवाळ्यांत जरा बरे असत. कारण, त्या वेळीं चिखल गोठून घट्ट होत असे. मॉस्कोभोंवतीं दुर्गम जंगलें होतीं. ते दुरून अरबी भाषेंतील गोष्टींमधल्या एकाद्या शहराप्रमाणें दिसे. दुरून होन हजार घुमट व क्रॉस दिसत. ते तांब्यानें मढविलेले असत व सूर्यप्रकाशांत लखलखत. लाल, हिरव्या व पांढर्‍या इमारतींच्या मस्तकांत दोन हजार घुमटांचा व क्रॉसाचा जणूं काय भव्य मुकुटच आहे असें दुरून भासें; पण राजधानींत पाऊल टाकतांच ही माया नष्ट होई व मॉस्को एक प्रचंड अस्ताव्यस्त वसलेलें खेडेंगावच आह असें वाटे. रस्ते रुंद होते; पण त्यावरून जाणार्‍यांस ढोंपर-ढोंपर चिखलांतून जावें लागे. दारुडे व भिकारी याची सर्वत्र मुंग्यांप्रमाणें गर्दी असे, बुजबुजाट असे. सार्वजनिक स्नानगृहांपाशीं दिगंबर स्त्रीपुरुषांची ही गर्दी असे ! येवढेंच नव्हे तर येथें येणारे आपले गुह्य अवयव मुद्दाम दाखवीत व वासनाविकारांना उत्तेजक अशा गलिच्छ गोष्टी बोलत. या राजधानींतील हवा जणूं गुदमरवून सोडी. धूर, दारूचा वास, घाणीची दुर्गंधी, खाद्यपेयांचा घमघमाट, अशा संमिश्र वासानें भरलेली हवा नाकानें हुंगणें, आंत घेणें हें मोठें दिव्यच असे ! भटकणारीं डुकरें आपलीं विष्टेनें भरलेलीं तोंडें येणार्‍याजाणार्‍यांच्या कपड्यांना पुशीत. झिंगलेले शिपाई रस्त्यांतून लोळतांना दिसत व त्यांना जरा कोणाचा अडथळा होतांच ते ताबडतोब ठोसे द्यावयास तयार असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel