त्याची बालवृत्ति जन्मभर टिकली. आरमार बांधण्यास प्रारंभ करते वेळी त्याच्याजवळ फार मोठ्या योजना होत्या असें नाहीं. त्याचीं तीं गलबतें म्हणजे त्याची करमणूक होती. आपल्या बालवीरांना नकली बंदुकी देऊन त्यानें खेळांतील शिपाई बनविलें होतें तद्वतच हेंहि. पण गलबतें हवीं असतील तर समुद्र हवा हें लवकच त्याच्या लक्षांत आलें. लहान मुलगा मनांत येई ते करूं पाहतो तद्वत् पीटर लगेच काळ्या समुद्राकडे आपले बुभुक्षित डोळे फेंकूं लागला. दक्षिणेकडे काळा समुद्र होता व पश्चिमेकडे बाल्टिक समुद्र होता.
काळ्या समुद्रांत प्रवेश मिळावा म्हणून सैन्य घेऊन त्यानें तुर्कांवर स्वारी केली; पण अझोव्ह येथें त्याचा पराजय झाला. तरी मॉस्कोला परत येऊन आपण मोठा जय मिळविला अशी बढाई तो प्रजेपुढें मारूं लागला. त्यानें दारुकाम सोडून विजयोत्सव केला. दारुकाम त्याला फार आवडे. त्याच्या करमणुकींचे प्रकार मुलांच्या करमणुकींच्या प्रकारांसारखेच असत. बाल्टिक किनारा मिळविण्यासाठीं त्यानें स्वीडनच्या बाराव्या चार्लस राजाशी लढाई सुरू केली. ती बरींच वर्षे चालली. त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग तींत गेला. पण दारुकाम सोडणें व इतर करमणुकी यांच्या आड हें युध्द येत नव्हतें. आणि तिकडे रणांगणावर शिपाई मेले म्हणून त्याला त्याचें काय वाटणार होतें ? मरणार्यांची जागा घेण्यास दुसरे भरपूर होते. पण लढाईचें कांहीं झालें तरी, एक दिवसहि दारुकाम सुटलें नाहीं किंवा इतर करमणुकी झाल्या नाहींत तर मात्र तो दिवस फुकट गेला असें त्याला वाटे.
चार्लसशीं युध्द चालू असतां त्याचें लक्ष दुसर्या एका गमतीकडे गेलें. आरमार व लष्कर निर्माण केल्यावर नवीन रशिया निर्माण करण्याचें त्याच्या मनानें घेतलें. तो आपली निरनिराळीं खेळणीं घेई व पुन: पुन: वेगवेगळ्या रीतींनीं रची व मांडी. वस्तू असतील तशाच ठेवणें त्याला आवडत नसे. त्यानें इतर खेळण्यांत फेरबदल केला तद्वत् रशियालाहि नवा आकार, नवें रंगरुप देण्याचें त्याच्या मनानें घेतलें. मॉस्कोच्या उपनगरांतील परकीयांविषयीं त्याला आदर वाटे. म्हणून त्यानें सारा रशिया परकीयांनीं भरुन टाकण्याचें ठरविलें.
रशियाला युरोपच्या पातळीवर आणण्याच्या कामीं पश्चिम युरोपचा अभ्यास करणें अवश्य होतें. म्हणून तो हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड वगैरे देशांत गेला व पश्चिमेकडील संस्कृतीचे कांहीं कपटे घेऊन आला. नवीन कपड्यांनीं भरलेलें एक कपाटहि त्यानें बरोबर आणलें. आपण आणलेल्या कपड्यांसारखेच कपडे प्रजेनें वापरावे, आपण शिकून आलेल्या चालीरीतींसारख्याच चालीरीती प्रजेनें सुरू कराव्या अशा उद्योगाला तो लागला. शिपायांना कात्र्या देऊन रस्त्यांवरून जाणार्या दाढाळ शेतकर्यांच्या दाढ्या त्यानें कापावयाला अगर उपटावयाला सांगितलें. त्यानें स्वत: सरदारांचे व दरबारी लोकांचे कपडे फाडून टाकले व पिश्चमेकडचे फॅशनेबल कपडे त्यांनीं वापरावे असा अट्टाहास चालविला.
झारनें चालविलेल्या या सुधारणा पाहून रशियन पोप रागावला. रशियांतील धर्मगुरू स्वत:ला जनतेचा बाप म्हणवीत असे. त्याच्या मताप्रमाणें मानव ईश्वराची प्रतिकृति असल्यामुळें त्यांनीं ईश्वराप्रमाणें लांब दाढ्या ठेवल्याच पाहिजेत व लांब चुण्यांचे झगे घातलेच पाहिजेच. रशियन धर्मगुरूनें त्यामुळें असें पर्च्मान काढलें कीं, सर्व धार्मिक लोकांनीं राजाचा हुकूम अमान्य करून दाढ्या, निदान हनुवटीवर तरी, ठेवाव्या; नाहीं तर एकाद्या पेटींत तरी आपली दाढी राखून ठेवावी, म्हणजे मरतांना ती आपल्या बरोबर नेतां येईल. दाढीवरील या धार्मिक चर्चेला गंभीर स्वरूप आलें. पीटरनें पोपविरुध्द बंड केलें व तो स्वत:च धर्माचा मुख्य झाला. पण पीटरच्या इतर सुधारणा कांहीं इतक्या पोरकट नव्हत्या; कांहीं तर खरोखरच महत्त्वाच्या होत्या. त्यानें सीनेट नेमलें, राज्याचे आठ भाग केले, रस्ते बांधले, कालवे खणले, शाळा काढल्या, विद्यापीठें स्थापिलीं, दवाखाने काढले, नाटकगृहें बांधलीं, नवीन धंदे निर्मिले; नाटकगृहें तयार झालीं कीं नाटकेंहि निर्माण होऊं लागतील असें त्याला वाटलें. ज्या नाटकांत त्याची स्तुति असे त्या नाटकांसाठीं हीं नाट्यगृहें होतीं.