- २ -

ग्रीकांची मनोरचना अपूर्व होती.  त्यांची मनोरचना वैशिष्ट्यपूर्ण होती.  त्यांना निर्मितींत जेवढा आनंद वाटे तेवढाच विध्वंसांतहि वाटे.  त्याना मेळ, सुसंवादिता आवडे ; परंतु त्यांच्या राजकीय जीवनांत मात्र कधींच मेळ नसे.  तेथें नेहमींच विसंवाद व भांडणें.  ते संयमाचा नि नेमस्तपणाचा उपदेश करीत ; परंतु भांडणें शोधण्यांत नेहमीं वेळ दवडीत.  ते देवांशीं बोलत, संवाद करीत आणि इकडे शेजार्‍यांना फसवीत व लुबाडीत.  ग्रीक लोक उदात्तता व मूर्खता यांचें मिश्रण होते.  एस्पायलॅस हा त्यांचा सर्वांत मोठा नाटककार.  परंतु स्वत:जवळच्या दैवी नाट्यकलेचा त्याला अभिमान वाटत नसे.  आपण एक शिपाईगडी आहों यांतच त्याला सारा पुरुषार्थ वाटे.  ग्रीक लोकांना युध्दासाठीं म्हणून युध्द आवडे.  जणूं तो त्यांचा एक आनंद होता !  विध्वंसनाचा, मारणमरणाचा आनंद ! सौंदर्यासाठीं ज्याप्रमाणें ते सौंदर्याची पूजा करीत, त्याप्रमाणेंच लढण्यासाठीं म्हणून लढत.  ते प्रतिभावंत परंतु जंगली असे लोक होते.  कलेमध्यें अद्वितीय होते, दैवी होते, परंतु परस्परांशीं वागतांना जंगलीपणानें वागत.  एकाद्या पुतळ्याचें बोट जरा बिघडलें तर तें त्यांना अक्षम्य पाप वाटे.  परंतु युध्दकैद्यांची बोटें तोडणें त्यांना थोर कर्म वाटे, देशभक्तिचें कर्म वाटे.

ग्रीस देशांत अनेक नगरराज्यें होतीं.  अशा या नगरराज्यांत तो देश विभागला गेला होता.  प्रत्येक राज्य स्वतंत्र होतें.  प्रत्येक दुसर्‍याचा नाश करूं पहात होतें.  परंतु त्यांचे द्वेषमत्सर कितीहि असले तरी ओबडधोबड स्वरूपाची व स्थूल प्राथमिक पध्दतीची अशी लोकशाही त्यांनीं निर्माण केली यांत शंका नाहीं.  प्रथम त्यांनीं राजांना नष्ट केलें.  नंतर मूठभर प्रतिष्ठितांची—सरदार-वर्गाची—सत्ता त्यांनी नष्ट केलें.  ख्रि.पू. सातव्या शतकांतच अथेन्समध्यें पूर्ण लोकसत्ता होती.  ती लोकसत्ता सर्वसामान्य जनतेची नव्हती, तर असामान्य जनतेची—वरिष्ठ वर्गाची—होती.  अथेन्समधील फक्त एक-पंचमांश लोकांनाच तेथील लोक-सभेंत वाव होता.  ज्यांचे आई-बाप अथीनियन असत, त्यांनाच त्या लोकसभेंत प्रवेश असे.  उरलेल्या चार-पंचमांश लोकांत परके असत, गुलाम असत, गुन्हेगार असत ; आणि स्त्रियांना तर सार्वजनिक व राजकीय कामांत संपूर्णपणें प्रतिबंधच होता.  या सर्वांना सर्वसाधारणपणें शुद्र असें संबोधण्यांत येईल, असंस्कृत रानटी लोक असें समजण्यांत येई.

ग्रीस देशांतील ही लोकशाही अशा प्रकारें जरी प्राथमिक स्थितींतील असली, तरी तिच्यामुळें पर्शियनांच्या उरांत धडकी भरली.  ग्रीक लोक या लोकशाहींमुळें वाईट उदाहरण घालून देत आहेत, उद्यां आपल्या आंगलट येणारा नवीन पायंडा पाडीत आहेत असें त्यांना वाटलें.  ग्रीकांचा लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाला तर अनियंत्रित सत्तेचा पायाच उखडला जाईल अशी भीति पर्शियन साम्राज्यवाद्यांस वाटूं लागली.  लोकशाहीचे पुरस्कर्ते ग्रीक लोक म्हणजे प्राचीन काळचे बोल्शेव्हिक होते.  त्या ग्रीकांना जिंकून घेण्याचें पर्शियनांनीं निश्चित केलें.  लोकशाहीचा हा धोका नष्ट करण्याचें त्यांनीं ठरविलें.

ग्रीस देशावर स्वारी करायला त्यांना चांगलें कारणहि सांपडलें.  आशियामायनरमध्यें ज्या ग्रीक वसाहती होत्या त्यांनीं क्रोशियसच्या पुढारीपणाखालीं मागें एकदां पर्शियनांवर हल्ला चढविला होता.  म्हणून त्या ग्रीक वसाहतींचा मायदेश जो ग्रीस त्याच्यावर हल्ला करून सूड घेणें अत्यंत न्याय्य आहे असें पर्शियनांनीं ठरविलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel