पण हळूहळू गटेच्या वाङ्मयांतील यौवनसहज उन्माद, मादकता, निश्चिंत बेदरकारपणा व सुखविलास-लोलुप्ता कमी कमी होत जातात. त्याचा तारुण्यांतील जोम ओसरतो. तो अत:पर जगाला नष्ट करूं पाहणारा बंडखोर राहत नाहीं तर जगाचें स्वरूप समजून घेणारा तत्त्वज्ञानी बनतो. अत:पर त्याचें ध्येय एकच. मरेपर्यंत एकच ध्यास : अधिक प्रकाश, अधिक सौंदर्य. तो कुरुपतेंतहि सुंदरता व नम्रतेंतहि प्रतिष्ठा पाही. वॉल्ट व्हिटमनप्रमाणें मानव कितीहि खालच्या वर्गांतील असोत, त्याला त्यांच्याविषयीं उत्कट प्रेम वाटे. तो राजांसमोर तर लवेच, पण अत्यंत दीनदरिद्री माणसें भेटलीं तर त्यांनाहि प्रणाम करी. खाटीक, भटारखानेवाले, मेणबत्त्या कारणारे, वगैरे लोकांशीं मरेपर्यंत त्याची दोस्ती असे. तो म्हणतो, ''या लोकांबद्दल मला किती प्रेम वाटतें ! माझें प्रेम या खालच्या वर्गांतील लोकांसाठी परत आलें आहे.''  खाणींतील लोकांना भेटून आल्यावर तो म्हणाला, ''ज्यांना आपण खालच्या वर्गांचे समजतों, तेच देवाच्या दृष्टीनें परमोच्च वर्गाचे आहेत.''

पददलितांसाठीं त्याला वाटणारी सहानुभूति केवळ शाब्दिक अगर आलंकारिक नव्हती. त्याला दरसाल एक हजार डॉलर पगार मिळे. या पगारांतून तो दोन अनोळखी  लोकांसहि पोशी. ते मदत मागत व तो नेहमीं देई. त्याला स्वत:ला कधींहि हालअपेष्टा भोगाव्या लागल्या नाहींत. पण तो दुसर्‍यांच्या दु:खाशीं सहानुभूति दाखवी. स्वत:च्या जीवनापलीकडे पाहण्याचें कवीचें क्रांतदर्शित्व त्याच्या ठायीं होतें. एका लॅटिन कवीनें म्हटलें आहे, ''मानवांचीं दु:खें पाहून देव रडतात.'' त्याप्रमाणें गटे हे अश्रू मानीत होता. त्याचेयं दैवी मन गरिबांचें दु:ख पाहून रडे. बुध्दि व्यापक असेल त्यालाच गरिबांचीं दु:खें जाणतां येतात.

गटेची मनोबुध्दि अठराव्या शतकांत अत्यंत सर्वगामी व सर्वसंचारी होती. तो कवि, चित्रकार व संगीतज्ञ होता येवढेंच नव्हे तर वरच्या दर्जाचा शास्त्रज्ञहि होता. जगांतल्या बाह्य विविधतेच्या मुळाशीं एकताच आहे हें त्यानें कवीच्या प्रतिभेच्या योगें ओळखलें व विज्ञानवेत्ता या नात्यानें ही एकता सिध्द करण्याची खटपट केली. वनस्पतिशास्त्र, शारीरशास्त्र व रंगप्रक्रिया यांचा पुरेपूर अभ्यास करून त्यानें 'वनस्पतींचीं स्थित्यन्तरें' हा ग्रंथ लिहिला व दाखविलें कीं, वैभवशील पानें म्हणजेच फुलें, फुलें म्हणजेच पूर्ण विकसित पानें ! पानांचें काव्यांत परिणमन म्हणजेच फुलें. फुलें म्हणजे पानांचें काव्य ! मानवी कवटीचें बारकाईनें निरीक्षण करून त्यानें मनुष्य व खालचे प्राणी यांतील दुवा जोडणार्‍या एका हाडाचा शोध लावला.

मानवजातीशीं संबध्द अशा प्रत्येक विषयाची टेरेन्सप्रमाणें त्यालाहि आवड होती. त्याला फक्त युध्दाची आवड मात्र नव्हती. गटे हा शांतात्मा, शांततेचा उपासक होता. कार्ल ऑगस्ट फ्रेंचांशीं झगडत हाता तेव्हां त्यानें गटेला सैन्यांत बोलावून लष्करी हालचाली पाहण्यास सांगितलें. सैन्याची छावणी होती तेथें गटे गेला, पण तेथील लढायांत त्याला रस नव्हता. त्यानें छावणीच्या आसपासच्या फुलांचा व दगडांचा अभ्यास केला. त्याला आपल्या राष्ट्राविषयीं अत्यंत प्रीति होती, नितांत भक्ति होती. पण तो संकुचित दृष्टीनें देशभक्त नव्हता. तो देशभक्तीनें भरलेलीं युध्दगीतें रचीना म्हणून त्याला कोणीं बुळा, नेभळा म्हटलें, तेव्हां त्यानें उत्तर दिलें, ''मला ज्याचा अनुभव आला नाहीं असें कांहींहि मीं कधींच उच्चारिलें नाहीं. ...स्वत: प्रेम केल्यावरच मीं प्रेमगीतें लिहिलीं. कोणाचाहि व्देष न करतां मी व्देषगीतें कशीं लिहूं ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel