- ५ -

ऑर्लीन्सचा वेढा उठला. जोन ऑफ आर्क आतां बारा हजार फौज उभारूं शकली. सारे जण तिजकडे सन्त म्हणून पाहूं लागले. कोणी तिला चेटकीण म्हणूं लागले. फ्रेंचांची बाजू घेणारे तिला सन्त म्हणत; इंग्रजांची बाजू घेणारे तिला डाकीण म्हणत. जोन चार्लसला टूर्स येथें भेटली व मग उभयतां लॉयरी नदीच्या तीरानें र्‍हीम्स शहरीं आलीं. तेथें असलेलें इंग्रज सैन्य घाबरून गेलें व भयभीत होऊन पळून गेलें. कांहीं कांहीं ठिकाणीं इंग्रजांनीं थोडा विरोध केला. जार्गो, पॅटे, ट्रॉयीझ वगैरे ठिकाणीं झटापटी झाल्या; पण जोनच्या संस्फूर्त सैनिकांनीं त्यांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडलें. लढाई शक्य तों टाळावी असें जोनचें धोरण असे. इंग्रजांनीं फ्रान्स सोडून जावें येवढेंच तिला हवें होतें. ती त्यांचा द्वेष करीत नव्हती. रक्त पाहून ती खिन्न होई. रक्तपातानें तिचें मन विटे. स्वत:च्या लोकांच्या वेदना पाहून तिला जितकें दु:ख होई, तितकेंच शत्रूच्या सैनिकांच्या वेदना पाहूनहि होई. जखमी शिपाई—मग तो इंग्रज असो वा फ्रेंच असो—तिला संकटांत सांपडलेला ख्रिश्चन बंधु वाटे. पॅटे येथील लढाईत रणांगणांत शत्रूचे पुष्कळसे सैनिक मेलेले पाहून ती रडली. तिच्या एका सैनिकानें एका इंग्रज कैद्याला मरणान्तिक प्रहार केला तेव्हां आपल्या घोड्यावरून उतरून तिनें त्या मरणोन्मुख इंग्रज शिपायाच्याजवळ गुडघे टेंकले व त्याचें डोकें आपल्या हातांत घेतलें, ती त्याला कांही सौम्य व मृदु शब्द बोलली व त्याचे प्राण गेले.

तिच्या निष्ठावन्त सैनिकांना तिची ही उदार दया समजत नसे. ते तिजसाठीं लढावयाला व मरावयाला तयार होते. पण ही करुणा, या करुणेंतील भावना ते समजूं शकत नसत. ती विरोध करी तरीहि तिच्या विरोधास न जुमानतां तिचे सैनिक युध्दांतील बहुतेक कैद्यांस ठार मारून टाकीत.

इ.स. १४२९ च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस विजयी फ्रेंच सेना र्‍हीम्स येथें आली. नंतर दोन दिवसांनीं तेथील भव्य चर्चमध्यें राजाला राज्याभिषेक झाला. आर्चबिशपनें चार्लसच्या डोक्यावर मुकुट ठेविला. समारम्भाच्या वेळीं दरबारची कांही स्त्रीपुरुष मंडळी हजर होती. कांही सरदार होते, कांहीं वारांगना होत्या; पण राणी मेरी द अंजो ही चिनॉन येथें मागें राहिली होती. प्रवासाच्या खर्चांत बचत व्हावी म्हणून राजानें तिला मागें ठेविलें होतें. चार्लस दरिद्री व निर्धन होता, तसाच अति अनुदारहि होता.

जोन ऑफ आर्कचें आरंभींचें काम आतां संपलें होतें. ऑर्लीन्सचा वेढा तिनें उठविला होता. राजाला राज्याभिषेक झाला होता. आतां इंग्रजांना फ्रान्समधून हांकलणें येवढेंच काम राहिलें होतें. पण तिची लोकप्रियता कमी होऊं लागली. जोन दररोज देवदूतांशीं बोले. पण तिच्या शिपायांना आतां तिच्या या दैवी मुलाखतींचें व भेटीचें कौतुक वाटेनासें झाले. तिला जीं दिव्य दर्शनें घडत त्यांची प्रभा आतां फिकी, निस्तेज झाली. एक रोजची सामान्य गोष्ट अशा दृष्टीनें लोक त्यांकडे पाहूं लागले. तिचे लोक आतां तिला कंटाळले. तिचें त्यांच्याबरोबर असणें जसजसें लांबूं लागलें तसतसे ते अधीर होऊं लागले. कारण, ती त्यांना लुटालूट करूं देत नसे. ती त्यांच्यावर पावित्र्याचें जीवन लादीत होती; पण त्यांना अशा जीवनाची संवय नव्हती. ''ही जोन आम्हांला बायका बनवीत आहे'' असें ते म्हणत. तिचे कांहीं शिपाई तिला सोडून गेले, कांहींनीं बंड केलें !

आणि इकडे तिचे शत्रू तिच्या नाशाची योजना करीत होते, नाशाची जाळीं विणीत होते. आपल्या मार्गातून जोन जावी असें निरनिराळ्या चार पक्षांना वाटत होतें : (१) इंग्रज, (२) इंग्रजांना अनुकूल असलेले फ्रेंच, (३) तिच्या राजप्रियतेचा मत्सर वाटणारे कांही दरबारी व (४)  देवदूतांशीं तिच्या होणार्‍या भेटीगांठींबद्दल मत्सर वाटणारे बिशप.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel