प्रकरण ९ वे
कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन
- १ -
मार्कस ऑरेलियसचा मुलगा कॉम्पोडस हा नीरो वगळल्यास इतर सर्व सम्राटांत अत्यंत दुष्ट व रानटी सम्राट् होऊन गेला. पुढील तीनशें वर्षांतल्या सम्राटांचा इतिहास थोडक्यांत सांगावयाचा तर असें म्हणतां येईल कीं, त्यांनीं खून केले, कत्तली केल्या, जुलूम केले व शेवटीं त्यांचेहि खून झाले ! त्यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास सांगत बसण्यांत फारसा अर्थ नाहीं. तो म्हणजे कंटाळवाणी व वीट आणणारी मूर्खपणाची कथाच आहे. नांवें व तारखा बदलल्या कीं सर्व प्रकार तेच ! मार्कस ऑरेलियसमागून झालेल्या अनेक सम्राटांपैकीं कॉन्स्टंटाइन तेवढाच इतरांहून वेगळा आढळतो ; पण तो इतरांपेक्षां अधिक चांगला म्हणून नव्हे तर त्यानें ख्रिश्चन धर्म हा राज्याचा—राष्ट्राचा—धर्म केला म्हणून. तथापि कॉन्टंटाइनचा ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्माहून वेगळा होता.
- २ -
कॉन्स्टंटाइन इ. स. ३१३ या वर्षी गादीवर आला. इतर सार्या उमेदवारांस ठार करूनच नेहमींच्या पध्दतीप्रमाणें तो गादीवर आला. त्याचा बाप कॉन्स्टंटियस हा डायोक्लेशियन सम्राटांच्या कारकीर्दीत गव्हर्नर होता. त्याची आई हेलेना ही एका खानावळवाल्याची ख्रिश्चन कन्या. पित्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या रक्तांत उतरली होती व ती पुरी करण्यासाठीं त्यानें तिचा धर्म पत्करला. गादीसाठीं असलेल्या प्रतिस्पर्ध्यांतल्या मॅक्झेन्टियसशीं लढतांना त्याला यश येईना. त्यानें सार्या जुन्या देवदेवतांना प्रार्थिलें, पण सर्वच दुसर्या कोठल्या तरी भानगडींत गुंतलेल्या असल्यामुळें कोणीच मदतीस येईना ; त्याचा पराभव होऊं लागला ; शेवटीं हताश होऊन त्यानें आपल्या आईच्या 'येशू'-देवाची प्रार्थना केली ; त्याला विजय मिळाला. तो नव्या देवाला केलेल्या प्रार्थनेमुळें मिळाला, असें त्याला वाटल्यामुळें त्यानें शांततेचा धर्म देणार्या येशूला रोमन साम्राज्याची 'युध्द-देवता' बनविलें.
भोळसट रोमनांना युध्दांत खरोखर ख्रिस्तानेंच मदत केली हें पटवून देण्यासाठीं त्यानें एक चमत्कार-कथा रचिली : ''मॅक्झेन्टियसवर चाल करून जातांना मला 'या चिन्हाच्या योगेंच तुझा जय होईल' असे शब्द वर असलेला एक जळजळीत क्रॉस दिसला.''
या नवीन ख्रिश्चन युध्ददेवतेमुळें कॉन्स्टंटाइनला इतका आनंद झाला कीं, त्यानें ख्रिश्चन धर्म रोमचा राष्ट्रधर्म केला. तोंपर्यंत ख्रिश्चन धर्म शांतिप्रियांचा होता, प्रतिकार न करणार्यांचा होता. पण आतां तो अहंमन्यतेनें व गर्वानें लढणार्या लोकांचा चढाऊ धर्म झाला. ''रोमन सैनिकांनो, पुढें चला'' या युध्दघोषणेऐवजीं ''ख्रिश्चन सैनिकांनो, पुढें चला'' अशी रोमची नवी युध्दघोषणा बनविण्यात आली व त्या सैन्याच्या पुढें, पाठीवर जड क्रॉस असलेला गॅलिलीचा तो थकलेला ज्यू मिरविण्यांत येऊं लागला.