नीरोनें या खुनाखुनीपासून थोडी विश्रांति घेतली व नवीनच एक माथेफिरूपणाचा प्रकार सुरू केला. आपण मोठे कलावान् आहों असें त्याच्या डोक्यानें घेतलें. तो गाऊं लागला, काव्यं करूं लागला, बांसरी वाजवूं लागला, सतार वाजवूं लागला. त्यानें एकदां एका नाटकगृहांत आपल्या गायन-वादनाचा एक भव्य प्रयोग केला. त्यासाठीं त्यानें टाळ्या वाजविणारे पांच हजार लोक भाड्यानें आणले होते ! ल्यूसियन लिहितो, ''एकदां तो मंद्रसप्तकांत गात असतां त्याला गाणें नीट जमेना तेव्हां लोक मधमाश्यांप्रमाणें गोंगाट करूं लागले ; पण तो तार सप्तकांत गाऊं लागला तेव्हां तर लोकांस हंसूं आवरेना ; राजा रागावेल ही भीति मनांत असूनहि ते खो खो हंसूं लागले. तार सप्तकांत नीट गातां यावें म्हणून तो सार्या शिरा ताणीत होता व तोंड वेडेंवांकडें करीत होता. चाकावर घातलेला एकादा गुन्हेगार जशीं तोंडें करतो तशीं त्याचीं तोंडें होत होतीं. त्याचा नैसर्गिकपणे लालसर असलेला चेहरा जवळजवळ तांब्यासारखा दिसूं लागला.
नीरोला वाटलें कीं, संगीताचा व प्रकाशाचा देव अॅपॉलो याच्याहिपेक्षां आपण उत्कृष्ट गाणारे आहों. तो श्रोत्यांना आपलें कंटाळवाणें गाणें ऐकावयाला सक्तिनें तासन् तास बसावयास लावी. शेवटीं तर विटून व कंटाळून त्यांना घेर्या येत. नीरोनें नृत्यकलेंतहि पारंगत होण्याचें ठरविलें. पण नृत्यकलेच्या शिक्षकांइतके आपणास पाय उंच करतां येत नाहींत, त्यांच्याइतक्या सुलभतेनें व चपळाईनें पाय नाचवितां येत नाहींत असें पाहून त्यानें त्या शिक्षकांनाच ठार मारलें व नृत्याचा नाद सोडून दिला. एकदां तर नाटकगृहांतल्या एका प्रयोगाच्या वेळीं आपण दिगंबर स्वरूपांतच रंगभूमीवर जावें असें त्याच्या मनानें घेतलें. आपलें शरीर हरक्युलिसच्या शरीराप्रमाणें अत्यंत प्रमाणबध्द आहे हें तो प्रजेला पटवूं पाहत होता. वास्तविक त्याचें शरीर विद्रूप होतें, मान आंखूड व फार जाड होती, छाती अरुंद होती व पायांच्या काड्या झाल्या होत्या ; वरचें नगार्यासारखें अगडबंब पोट त्या काड्यांना झेंपत नसल्यामुळे पाय वांकत. ''तुम्ही आपलें हें शरीर कृपा करून उघडें नका दाखवूं'' अशी विनंती त्याच्या मित्रांनीं केली. शेवटीं त्यानें ऐकलें.
त्यानें रोमचा इतिहास काव्यांत लिहिण्याचें ठरविलें. या संकल्पित महाकाव्याचीं चारशें पुस्तकें होणार होतीं. आपण दैवी शक्तिचा अतिमानुष कलावन्त आहों, सर्वांगीण व सर्वकलाप्रवीण असा कलावन्त-सम्राट् आहों हें दाखविण्यास तो अधीर झाला होता. इतर सम्राटांनीं आपण देवाच्या बरोबरीचे आहों असें दाखविण्याचा अट्टाहास केला ; पण नीरोला आपण सर्व देवांहूनहि मोठे, देवाधिदेव आहों असें वाटे.
त्याची भव्यतेप्रत पोंचण्याची धडपड होती. पण तो हास्यास्पद मात्र झाला. मर्त्य मानवांप्रमाणें साध्या गोष्टी करण्याचा त्याला कंटाळा आला. नीरोला शोभेसें कांही तरी अतिमानुष्य, भव्य, दिव्य, आपल्या हातून व्हावें असें त्याला वाटूं लागलें. रोममध्यें एकदम प्रचंड आग लागली : सहा दिवस व सात रात्री ती पेटत होती ! शहराचे तीन भाग भस्मसात् झाले. ती आग नीरोनेंच मुद्दाम लावली होती कीं काय, हें नक्की कळत नाहीं ; निदान तसा पुरावा नाहीं. पण ती आग पाहून तो नाचूं लागला ! केवढी मौज, किती गंमत, असें त्याला वाटलें. असें भव्य ज्वाला-दर्शन घडल्याबद्दल त्यानें प्रभूचे आभार मानले. ही होळी दुरून, उंचावरून फार छान दिसेल असें वाटून राजवाड्याच्या अत्यंत उंच भागीं त्यानें एक शामियाना तयार केला. त्यानें अत्यंत सुंदर पोषाख घातला, तो सोन्यामोत्यांनी सजला, त्यानें हातांत सारंगी घेतली, ती होळी पाहून त्याचें हृदय उचंबळून आलें व तो त्या उंच स्थळीं गात राहिला. समोर ज्वालांचा सागर नाचत होता ! त्यानें सर्व देवांना शहर जाळणार्या पार्श्वभूमीवरचें आपलें संगीत ऐकण्यास आवाहन केलें. ट्रॉयला आग लागल्या वेळीं त्या प्रसंगावर होमरनें लिहिलेलें काव्य नीरो आपल्या सारंगीच्या साथीवर गात होता.