विस्तवाचा शोध लागला.  कांतडीं पाघरूं लागले.  त्याचबरोबर प्रकट वाणीहि जन्मली.  बोलायला लागण्यापूर्वी ते आधीं गाऊं लागलें असावेत.  ज्या वेळेस त्यांना अस्वस्थ व असुखी वाटत असे त्या वेळेसे ते सारे एकदम दु:खानें किंचाळत ; जेव्हां एकादी सुंदरशी शिकार त्यांना मिळे, किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश पडे, तेव्हां ते आनंदानें आवाज करीत.  हळूहळू या सर्वांतून अतुटक असें 'क' वर्गांतील गान निर्माण झालें.  त्यांच्यांतील जे अधिक प्रतिभावान् व प्रगतिशील होते ते आपल्या मनांतील नवीनच उगवलेले विचार अधिक स्पष्टतेनें प्रकट करूं लागले.  आपल्या आवाजांत भर घालून, त्याला कांहीं जोडून, ते विचार प्रकट करूं पहात.  अशा रीतीनें मानवी भाषेंतील पहिली अक्षरें जन्मास आलीं.

वाणीमुळें ज्याप्रमाणें मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून पृथक् झाला, त्याचप्रमाणें हत्यारांच्या व नानाविध यंत्राच्या शोधामुळेंहि हा गुहेंतील मानवप्राणीं मानवेतर प्राण्यांपासून निराळा झाला.  आणि पहिलें यंत्र म्हणजे आपला हात.  आपल्या या हातानें फेंकतां येतें हा अगदीं आरंभींचा अति महत्त्वाचा शोध.  हातानें जवळच नव्हे, तर लांब अंतरावरसुध्दां दगड मारतां येतो हा शोध ज्या आदि काळांतील एडिसननें लाविला त्याचें मानवजातीवर फार ॠण आहे.  तो अज्ञात असा एडिसन अत्यन्त बुध्दिमान् असला पाहिजे.  संकृति व सुधारणा त्याची अत्यंत ॠणी आहे.  मारण्याची जी सुंदर कला तींत त्या वेळेपासून मनुष्य इतर प्राण्यांच्या सदैव पुढें राहिला !

वस्तु कशी फेंकावी हें कळतांच फेंकण्याच्या निरनराळ्या वस्तूंचा-अधिक प्रभावी हत्यारांचा-शोध होऊं लागला.  दगडधोंडे व काठ्यालाठ्या त्याला अपुर्‍या वाटूं लागल्या.  आपलें भक्ष्य अधिक सहजतेनें मारतां यावें म्हणून घांसून घांसून अणकुचीदार काठी तो करूं लागला.  दगडांनासुध्दां धार लावून त्यांचे सुळके तो करी.  मृतपशूंचें कांतडें सोलून काढण्यासाठीं, तसेंच मांसखंड करण्यासाठीं या पाषाणी हत्यारांचा उपयोग मनुष्य करूं लागला.  स्वत:साठीं व कुटुंबातील इतरांच्यासाठीं तो अशा प्रकारें मांस तोडी.

आणि अशाच रीतीनें हळूहळू प्रगति होत आजचीं वाफेचीं यंत्रें जन्मलीं.  विद्युद्यंत्रें जन्मलीं.  हे शोध लागणें ही गोष्ट आश्चर्याची नसून हे शोध लागायला इतकीं हजारों वर्षे लागलीं हें आश्चर्य होय.  वास्तविक चारपांचशें वर्षांतच हें शोध लागले पाहिजे होते.  परंतु यासंबंधीं पुढें बोलूं.  सध्यां मानवजातीच्या त्या आरंभींच्या प्रगतीसंबंधींच बोलूं.  हीं जीं पहिलीं ओबडधोबड हत्यारें मानवानें निर्मिलीं, त्यांच्या साहाय्यानें दोन गोष्टी त्याला करतां येऊं लागल्या.  स्वत:चें संरक्षण करणें व दुसर्‍यास मारणें.  परंतु आपल्या ह्या अगतिक व एकाकी प्रयत्नांनीं तो या दोन्ही बाबतींत फारशी प्रगति करूं शकला नाहीं.  आपणाहून अधिक सामर्थ्यसंपन्न अशी एकादी वस्तु त्याला पाहिजे होती ; त्या सामर्थ्यसंपन्न शक्तिचें साहाय्य त्याला हवें होतें.  'आणि अत्यंत महत्त्वाचा असा एक शोध लावण्यांत त्याला यश आलें.  मानवानें ईश्वराला निर्मिलें.  देवाचा किंवा अनेक देवांचा शोध लागला.

देवाचा शोध कसा लागला याविषयीं नाना उपपत्ती आहेत.  परंतु सर्वांत अधिक शक्य अशी पुढील उपपत्ति वाटते.  मानवप्राणी स्वत:च्या छाया पाण्यांत बघत.  स्वप्नांत आपल्या मित्रांच्या आकृती ते बघत.  आपणां सर्वांस जणूं दोन शरीरें आहेत असें त्यांना वाटलें.  एक हें दैनंदिन इंद्रियगम्य शरीर, ज्याला आपण हातांनीं स्पर्श करतों; आणि विशिष्टच प्रसंगीं कधींकधीं दिसणारें व बहुधा नेहमीं अदृश्य असणारें असें तें दुसरें छायामय शरीर.  मनुष्य मरतो तेव्हां त्याचें तें स्थूल शरीर पुरलें जातें; परंतु त्याचें तें दुसरें छायामय शरीर नष्ट होत नाहीं.  तें स्वप्नांत आपणांस दिसतें, भेटतें.  तें छायामय शरीर कोठेंतरी जिवंत असलेंच पाहिजे.

समजा, एकाद्या जातीजमातीचा प्रमुख मनुष्य मेला.  तो जिवंत होता तेव्हां त्याला सारे भीत ; परंतु आतां मेल्यावर तो अधिकच भीतिप्रद झाला.  कारण त्याचें तें छायाशरीर आतां अदृश्य असणार.  छायाशरीरधारी तो नायक कधीं येईल व हल्ला करील तें कळणारहि नाहीं.  आपण कदाचित् त्याला असंतुष्ट केलें तर काय होईल, काय न होईल, असें या दुबळ्या व दुर्दैवी मानवाला वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel