आपल्या राजाची कीर्ति वाढावी, आपलें राष्ट्र सुधारलेलें व्हावें, म्हणून कन्फ्यूशियसचे जे प्रयत्न चालले होते त्यांत त्याला बरेंचसें यश येत होतें.  परंतु ली प्रांताचा राजा लू प्रांताचा मत्सर करी, द्वेष करी.  कन्फ्यूशियसच्या नेतृत्वाखालीं लू प्रांताची कीर्ति पसरत आहे ही गोष्ट ली प्रांताधिपतीस सहन झाली नाहीं.  कन्फ्यूशियसचें लू प्रांताच्या राजावर जें वजन होतें तें नष्ट व्हावें म्हणून त्यानें एक साधी युक्ति केली.  त्यानें लू राजाकडे ऐशीं नृत्यांगना पाठविल्या.  युक्ति सफल झाली.  राजा त्या नृत्यांगनांत इतका रमला, कीं तो कन्फ्यूशियस व त्याचे प्रयोग सारें विसरून गेला.

कन्फ्यूशियसला या गोष्टीचा तिटकारा आला.  तो आपला स्वत:चा लू प्रांत सोडून रागानें निघून गेला आणि पुन्हा जगभर भटकूं लागला.  जगाच्या करुणेवर, जागाच्या आधारावर त्यानें स्वत:ला सोंपविलें.

- ४ -

या वेळेपर्यंत कित्येक हजार शिष्य त्याला मिळाले होते.  तरीहि आपलें जीवन विफल आहे असें त्यास वाटे.  राजे पशुसमान होते, प्रजा अडाणी होती आणि त्याचें उत्तम पुरुषाचें ध्येय अद्याप स्वप्नांतच होतें.  मानवजातीस स्वत:प्रमाणें बनविण्याचा त्यानें प्रयत्न केला.  परंतु ज्या मातीवर तो प्रयत्न करूं पहात होता ती माती टणक होती.  त्याचीं सौम्य बोटें त्या मातीला आकार देऊं शकतना.  प्रवास करितांना पुष्कळ वेळां खुनी व दरोडेखोर त्याच्यावर हल्ला चढवीत.  पुष्कळ वेळां त्याला अन्नाशिवायहि दिवस काढावे लागले, तरीहि तो ध्येयापासून च्युत झाला नाहीं ; स्वीकृत कार्य त्यानें सोडलें नाहीं.

या वेळचें स्वत:चें एक सुंदर शब्दचित्र त्यानें काढलें आहे.  तो लिहितो :- '' कन्फ्यूशियस ज्ञानासाठीं इतका तहानलेला आहे, कीं पुष्कळ वेळां खाण्यापिण्याची सुध्दां त्याला आठवण रहात नाहीं.  आपल्या प्रयत्नांना यश येत आहे असें जरा दिसलें, कीं त्या आनंदांत तो सारें दु:ख विसरून जातो.  ज्ञानोपासना करतां करतां व ध्येयार्थ धडपडत असतां वार्धक्य जवळ येत आहे हें त्याच्या लक्षांतहि येत नाहीं.''

हातीं घेतलेले उद्योग निराशेनें सोडून द्यायला तो अद्याप तयार नव्हता.  जनतेला दैनंदिन व्यवहारांत मार्गदर्शन व्हावें म्हणून प्राचीन ग्रंथांचे संपादन व संकलन त्यानें सुरू केलें.  जुन्या चिनी बायबलांतून त्यानें जणूं नवीन बायबल, नवा करारच चिनी जनतेस दिला.  कन्फ्यूशियसहि बुध्दांप्रमाणें नास्तिक होता.  स्वर्ग किंवा नरक यांवर त्याचा विश्वास नव्हता.  त्याचा एकाच गोष्टीवर अपरंपार विश्वास होता, तो म्हणजे स्वत:च्या मानवबंधूंवर.  कन्फ्यूशियसची श्रध्दा होती, कीं जर शंभर वर्षे नीट सुव्यवस्थित राज्यकारभार चालेल तर पृथ्वीवरचा सारा अत्याचार नाहींसा होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel