प्रकरण ७ वें
अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्ष-नेता पेरिक्लीस
- १ -

पर्शियनांनीं आशिया जिंकून घेतला आणि आतां त्यांनीं आपली गिधाडी दृष्टि युरोपकडे वळविली.  इर्जियन समुद्राच्या पलीकडे ग्रीस देश होता, भूमध्दसमुद्रांत आपले दांत खोल रुतवित ग्रीस उभा होता.  पर्शियांतल्याप्रमाणें ग्रीस देशांतहि आर्यन शाखेचेच लोक होते.  आर्याच्या त्या सर्वत्र पसरण्याच्या वेळींच हे आर्य इकडे येऊन ग्रीस देशांत घुसले.  तेथल्या मूळच्या रहिवाशांची त्यांनीं हकालपट्टी केली आणि नंतर स्वत:च्या संस्कृतीचा त्यांनीं आरंभ केला.  फोनिशियनांपासून ते नौकानयन शिकले.  इजियन समुद्र ओलांडून आशियामायनरच्या किनार्‍यावर त्यांनीं अनेक वसाहती वसविल्या.  नकाशांत तुम्ही पहाल तर तुमच्या तत्काळ ध्यानांत येईल, कीं इजियन समुद्र हा एक अरुंद जलमार्ग आहे.  अनेक बेटें या रस्त्यावर वाटोवाट उभीं आहेत.  जणूं त्यांनीं सेतूच बांधला आहे.  दंतकथा रचणार्‍या ग्रीकांनीं हीं बेटे ईश्वरानें तेथें कां रोविलीं याचीं दोन कारणें दिलीं आहेत : ग्रीकांनीं यांच्यावरून पावलें टाकीत जावें म्हणून देवानें हीं बेटे ठायींठायीं उभीं केलीं हें एक कारण ; दुसरें कारण म्हणजे एका खंडांतून दुसर्‍या खंडांत जाणार्‍या प्रवाशांनीं वाटेंत विसांवा घ्यावा म्हणून हीं बेटें प्रभूनें उभीं केलीं होतीं.  या बेटांमुळें फार प्राचीन काळापासून ग्रीकांनीं आशियाशीं संबंध ठेवला होता आणि त्यामुळें ते पश्चिमात्यांस पौर्वात्यांचा परिचय करून देणारें बनले.  पौर्वात्यांसाठीं ते पाश्चिमात्यांचे दुभाष्ये बनले.  ते पूर्वेचा अर्थ पश्चिमेस विशद करणारे आचार्य झाले.

ग्रीक लोक व आशियांतील लोक याच्यांत व्यापार चाले आणि तद्‍नुषंगानें लढायाहि होत.  त्या शेंकडों युध्दांचा भीषण इतिहास आपणांस नको आहे.  परंतु त्यांतील महायुध्द जें ट्रोजन वॉर, तें होमरनें आपल्या काव्यामुळें अमर करून ठेवलें आहे.  आंधळा महाकवि होमर ! दोन रानटी जातींतील क्षुद्र भांडणांचा विषय घेऊन अमर सौंदर्याचें महाकाव्य त्यानें जगाला दिलें.

या ग्रीक लोकांचें खरोखर एक अपूर्व वैशिष्ट्य होतें.  ज्या ज्या वस्तूला ते स्पर्श करीत, तिचें ते शुध्द शंभर नंबरी सोनें करीत.  साध्या वस्तूला स्पर्श करून तिचें काव्याच्या शुध्द सुवर्णांत ते परिवर्तन करीत.  ही दैवी देणगी, ही अद्‍भुत कला त्यांच्या ठायीं कशी आली तें सांगणें कठिण.  त्यांच्या देशाच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळें हा गुण त्यांच्या अंगीं आला असें अर्वाचीन इतिहासकार सांगतात.  ग्रीस हें द्वीपकल्प आहे.  हा देश शेंकडों लहान लहान दर्‍यांखोर्‍यांमुळें विभागला गेला आहे.  प्रत्येक खोरें दुसर्‍या खोर्‍यापासून सभोंवतालच्या डोंगरपहाडांनीं सुरक्षित असें आहें.  कधीं कधीं समुद्राचा बाहूहि रक्षणार्थ आला आहे.  याप्रमाणें पृथक् पृथक् अशा त्यांच्या शाखा झाल्या.  त्या त्या लहान खोर्‍यांत जीवनाचा विकास करीत ते राहिले.  लहान वस्तूंतहि पूर्णता ओतायची कला ते शिकले.  निर्दोष भावगीतें, निर्दोष नाटकें, निर्दोष भांडीं, निर्दोष शिल्प, निर्दोष मंदिरें/सर्वत्र परिपूर्णता आहे.  परंतु ग्रीक लोकांप्रमाणेंच इतर ठिकाणींहि असणार्‍या लोकांना अशी भौगोलिक रचना मिळालेली का नाहीं ? मिळालेली आहे.  परंतु ग्रीक लोकांप्रमाणें जीवनांतील पूर्णता, हा ज्ञानविज्ञान-कलांचा अभिनय विलास व विकास त्यांना दाखवितां आलेला नाहीं.  प्रामाणिकपणानें म्हणावयाचें झालें तर आपणांस असेंच म्हणावें लागेल, कीं ग्रीक हे सौंदर्योपासक कां झाले, ज्यू हे शांतीचे उपासक कां झाले, याचें कारण सांगतां येणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel