मार्कसवर आपणांला दुबळेपणाचा आरोप करतां येईल ; पण जाणूनबुजून केलेल्या दुष्टतेचा आरोप मात्र मुळींच करतां येणार नाहीं.  रॅम्से मॅक्डोनल्डप्रमाणेंच तो शांततेच्या काळांत व शांत वृत्तीच्या माणसांत वावरण्यास योग्य होता.  आजच्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणें त्या काळचें रोमन साम्राज्यहि संकटांत होतें.  पुष्कळशा वसाहतींत बंडें माजलीं होतीं.  मार्कसची इच्छा नसूनहि सम्राट्पदावर असल्यामुळें त्याला बंडखोरांविरुध्द चालून जावें लागलें, त्यांचीं बंडें मोडावीं लागलीं, आपल्या ध्येयाशीं विसंगत धोरण पत्करावें लागलें. मानवजातीच्या स्वातंत्र्यापेक्षां 'रोम जगाची अधिराज्ञी आहे' यावर त्याची अधिक श्रध्दा होती व सिंहासनावर आपण राहावें याची त्याला अधिक तळमळ लागली होती.  मार्कसच्या बाबतींत अखेरचा निकाल देण्यापूर्वी आपण स्वत: त्याच्या स्थितींत जाऊन पाहिलें पाहिजे.  आज आपण ब्रिटिश सत्तेचे प्रमुख चालक असतों तर आपणांपैकीं कितीकांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचें धैर्य दाखवितां आलें असतें ?  मार्कसचीहि नेमकी अशीच स्थिति होती.  अर्थातच मार्कस जर बुध्द असता तर तो वेगळ्या रीतीनें वागला असता.  पण तो बुध्द नव्हता.  जगाचें भलें करावें म्हणून बुध्दानें राज्यत्याग केला.  मार्कसनें राज्यपदासाठीं भलें करण्याचें सोडून दिलें.  हिंदुस्थाननें जगाला 'शांति देणारे महापुरुष' दिले.  रोम 'जास्तींत जास्त तत्त्वज्ञानी योध्दा' निर्माण करूं शकलें.

मार्कस प्रथम रोमन सम्राट् होता व नंतर मानव जातीवर प्रेम करणारा होता हें नीट ध्यानांत धरलें तर मग आपणांस त्यानें ख्रिश्चनांचा छळ का केला हें समजूं शकेल. थोडीं कमीजास्त माणसें मारलीं गेलीं म्हणून वैतागण्याइतका वा विरक्त होण्याइतका कच्चा शिपाई तो नव्हतो.  शिपाईगिरी त्याच्या रक्तांत अधिक भिनलेली होती.  ख्रिश्चन लोक रोम देव-देवतांविरुध्द बोलत, नवीन राज्य येणार वगैरे भविष्यकथा सांगत.  साहजिकच रोमन राज्याला यांत धोका आहे असें वाटे.  ख्रिश्चनांचे प्रमुख पुढारी ठार मारून त्यांना दडपून ठेवणें हें राज्याचे पालनकर्ते या नात्यानें आपलें कर्तव्य आहे, असें मार्कसला वाटे.  बंड मोडून तो पुन: आपल्या हस्तिदंती तत्त्वज्ञानमंदिरांत येई तेव्हां तो लिही, ''मी दुसर्‍यांना हेतुपुर:सर वा उगीचच दु:ख दिलेलें नाहीं.''  त्याच्या या लिहिण्यांत दंभ नसून सत्यता असावी असें वाटतें.

दैवदुर्विलास हा कीं, मार्कस हा सत्याची तळमळ असणारा माणूस होता.  कृतिमता वा दंभ त्याच्या ठायीं मुळींच नव्हता.  स्वत:च्या राष्ट्राची सुरक्षितता किंवा प्रतिष्ठा धोक्यांत असतां तो सीझरच्या अहंमन्यतनें शासन करी ; पण स्वत:चा जीव धोक्यांत असतां मात्र तो एकाद्या संताच्या उदारतेनें क्षमा करी !  त्याचा अ‍ॅव्हिडिअस कॅशियस नामक एक सेनापति होता.  त्यानें त्याला मारण्याचा कट केल्याचें त्याला कळलें तेव्हां कॅशियसविरुध्द कांहींहि करण्याचें नाकारून तो म्हणाला, ''तो दोषी व अपराधी असेल तर आपल्या कृतकर्माचें फळ तो भोगील.'' कट फसला व कॅशियसचाच कोणीं तरी खून केला.  मित्रांनींच नव्हे तर राणी फॉस्टिना हिनेंहि कॅशियसच्या घराण्यांतल्या सर्वांना ठार करावें असें परोपरीनें विनविलें, निदान स्वत:च्या रक्षणासाठीं तरी ही गोष्ट करण्याबद्दल विनविलें ; पण मार्कसनें त्याकडे मुळींच लक्ष दिलें नाहीं.  तो म्हणाला, 'पित्याच्या पापासाठीं मुलांबाळांनीं शासन कां बरें भागावें ? त्यांचा काय अपराध ? कटांत सामील होण्याबद्दल कॅशियसनें अनेक प्रमुख रोमन नागरिकांना लिहिलेल्या पत्रांचें भेडोळें त्याच्यापुढें टाकण्यांत आलें.  तो गठ्ठा पाहून त्यानें काय केलें असेल ? एक शब्दहि न बोलतां त्यानें तीं सारीं पत्रें 'अग्नये स्वाहा' केलीं व नंतर पुन: चिलखत चढवून तो दुसर्‍या एका युध्दावर जाण्यासाठीं, रक्तपातासाठीं तयार झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel