भाग पांचवा
खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ

प्रकरण १ लें
गटे : हा पाहा खरा मनुष्य !
- १ -

आठव्या शतकांतील तरुण स्त्री-पुरुष अर्वाचीन होते. आजच्या तरुण स्त्रीपुरुषांप्रमाणेंच तेहि जगाविषयीं असंतुष्ट होते. ज्या जगांत ते वावरत, तें त्यांना समाधानकारक वाटत नसे. स्वत:च्या आशा-आकांक्षांना साजेल, आपल्या हृदयाच्या भुकांना व वृत्तींना संतोषवील, असें नवें जग निर्मिण्याची त्यांनीं पराकाष्ठा केली. फ्रान्स व अमेरिका या देशांतील बंडांनीं राजकीय स्वरूप घेतलें. दुसर्‍या देशांत—विशेषत: जर्मनींत-परंपरेविरुध्द सुरू झालेला झगडा विशेषत: बौध्दिक स्वरूपाचा होता. जर्मन क्रांति-वीरांनीं आपल्या देशांतील जुनाट कल्पना फेंकून दिल्या; पण शासनपध्दति मात्र जुनाटच ठेवली. त्यांनीं फक्त रूढींवर हल्ला चढविला; ते राजसत्तेच्या वाटेला गेले नाहींत. जर्मन क्रांति लेखणीची होती, तलवारीची नव्हती. त्यांनीं आपल्या देशबांधवांचीं मनें मुक्त केलीं, त्यांच्या शरीरांकडे फारसें लक्ष दिलेंच नाहीं; ती परतंत्रच राहिलीं. स्वतंत्र विचाराला ते मान देत; पण स्वतंत्र कृतीवर त्यांचा विश्वास नव्हता. देवाला त्यांनीं उडवून दिलें, तरी राजासमोर मात्र ते वांकले, नमले.

जोहान वुल्फगँग गटे हा या बौध्दिक क्रांतिकारकांचा पुढारी होता. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यानें ईश्वराविरुध्द बंड केलें, सातव्या वर्षी माणसांनीं चालविलेल्या अन्यायाविरुध्द तक्रार केली, आठव्या वर्षी लॅटिन भाषेंत एक निबंध लिहून त्यानें प्राचीन ग्रीकांच्या व ख्रिश्चनांच्या ज्ञानांची तुलना केली, अकराव्या वर्षी एक कॉस्मॉपॉलिटन कादंबरी सात भाषांत लिहिली, बाराव्या वर्षी व्दंव्दयुध्द केलें. चौदाव्या वर्षी उत्कटपणें स्वत:ला प्रेमपाशांत अडकवून घेतलें, चोर्‍याहत्तराव्या वर्षीहि पुन: एकदां उत्कट प्रेमपाशात मान गुंतविली व वयाच्या ब्यायशींव्या वर्षी 'फॉस्ट' महाकाव्याचे दोन भाग पूर्ण केले.

ट्यूटॉनिक वंशांत जन्मलेला हा गटे एक अत्यंत आश्चर्यकारक विभूति होता. त्याचें जीवन व त्याचें कार्य आतां आपण पाहूं या.

- २ -

गटेचा जन्म १७४९ सालीं झाला. त्याचे आजोबा शिंपी होते, पणजोबा लोहार होते. शिंप्यानें आपल्या मुलाला प्रतिष्ठित मनुष्य बनविलें. गटेचा बाप जोहान्स कॅस्पर हा फ्रँफ्रँकफुर्ट येथील शाही सल्लागार झाला व आपण गरीब कुलांत जन्मलों हें लवकरच विसरून गेला. आपल्या पूर्वजांपैकीं एक लोहार होता व एक शिंपी होता हें त्यानें कधींहि सांगितलें नाहीं. व्हॉल्टेअरप्रमाणेंच तोहि जन्मत: मरणोन्मुख होता व त्याची प्रकृति ठीक नव्हती; पण पुढें ती चांगली झाली. व्हॉल्टेअर नेहमीं शरीर-प्रकृतीच्या बाबतींत रडत असे, तसें फारसें रडण्याची पाळी गटेवर आली नाहीं. त्र्यायशीं वर्षांच्या दीर्घ जीवनांत तो फक्त तीनदांच आजारी पडला. निरोगी शरीर व निरोगी मन वांट्यास येणार्‍या फारच थोड्या लोकांपैकीं गटे एक होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel