पुस्तकाचा व पत्रकांचा त्यानें नुसता पाऊस पाडला ! अत्यंत भावनोत्कटनेनें त्यानें हें सारें लिखाण लिहिलेलें आहे. त्याचें लिहिणें जळजळीत निखार्‍यासारखें आहे. या लिखाणांत उदात्त भावनेची कळकळ आहे. हें सारें लिखाण केवळ मनुष्यांच्या अंधश्रध्देविरुध्दच होतें असें नव्हे, तर त्यांच्या धार्मिक आचारांविरुध्दषह होतें. बहुजनसमाजानें ''ईश्वर आहे'' असें मानणें ठीक आहे. ''ईश्वर नसेल तर एकादा शोधून काढावा लागेल. एपिक्यूरसचें ईश्वराशिवाय चालत असे; पण व्हॉल्टेअरला ईश्वर अजीबात रद्द करणें बरें वाटेना. ईश्वर म्हणून कोणी मानला म्हणजे बहुजनसमाज जरा बरा वागतो असें त्याचें मत होतें. ईश्वर असणें जरूर आहे असें त्याला वाए. इतर कोणत्याहि कारणासाठीं नसेना का, पण निदान आपणास त्याच्याशीं मांडतां यावें म्हणून तरी तो त्याला हवा असतो. ईश्वर म्हणजे जगांचें परमोच्च ज्ञान, अनंतपट कार्यक्षम असा विश्वकर्मा. पण धर्मोपदेशक या ईश्वराला इन्क्विझिटर करतात. लष्करी अधिकारी त्याला शिक्षाप्रिय सार्जंट बनवितात व अशा रीतीनें श्रध्देचें भीतींत व धर्माचें भोळसटपणांत रूपांतर करतात. व्हॉल्टेअर म्हणतो, ''या रुढि-राक्षसीला आपण नष्ट करूं या. ही रूढि धर्मांतूनच जन्मते पण धर्मालाच छिन्नविछिन्न करते. रूढींविरुध्द बंडाचा झेंडा हातीं घेऊन उभे राहतील ते सारे मानवजातीचे उपकारकर्ते होत.''

व्हॉल्टेअरनें आपलें उर्वरित जीवन धार्मिक रूढी व अंधळेपणा यांशीं दोन हात करण्यांत दवडिलें. या रूढींतून निर्माण होणार्‍या द्वेष, मत्सर, असहिष्णुता, संकुचितपणा, अन्याय व युध्द यांच्याविरुध्दषह तो बंड करीत राहिला. युध्द म्हणजे मोठ्यांतला मोठा गुन्हा असें तो म्हणे. तो म्हणतो, ''हा गुन्हा अधिकच लज्जास्पद व चीड आणणारा वाटतो; कारण, सेनाधिपति होणारा प्रत्येक डाकू धर्माच्या नांवानें जाहीरनामा काढून चोरी करावयास निघतो व युध्दप्रिय देवांना आपल्या बाजूनें लढावयास बोलावतो.'' जो आपल्या विशिष्ट धार्मिक समजुतीसाठीं मारावयास उठतो तो खरा धार्मिक नव्हे. शास्त्रज्ञाचें म्हणणें कोणीं न मानलें तर काय तो मारावयाला उठतो ? भूमितींतील सिध्दन्तासाठी का कधीं युध्द झालें आहे ? पण हे धर्मोपदेशक कांहीं धार्मिक गोष्टीसाठीं खुशाल खाटिकखाना सुरू करतात ! त्यांच्या धार्मिक गोष्टी म्हणजे केवळ मृगजळ असतें. तो मिथ्या काथ्याकूट असतो. त्यांचे धार्मिक सिध्दन्त म्हणजे त्यांचीं स्वत:चीं कांहीं विशिष्ट मतें असतात. त्यासाठीं मारामार्‍या कशाला ? व्हॉल्टेअर म्हणतो, ''हे असे लोक म्हणजे भयंकर प्रकारचे वेडे होते. कांहींहि किमत पडो, यांच्या या विषारी चळवळी बंद पडल्याच पाहिजेत.''

जगांतील धार्मिक असहिष्णुतेची पुंजी कमी व्हावी म्हणून व्हॉल्टेअरनें भरपूर कामगिरी केली आहे. धार्मिक बाबतींत कोणीं ढवळाढवळ करूं नये, हे तत्त्व त्यानें कायमचें प्रस्थापित केलें व चर्च आणि स्टेट यांची कायमची ताटातूट केली. त्यानें धर्मोपदेशकांच्या हातांतील तलवार काढून घेतली. व्हॉल्टेअरचें जीवनारंभकाळीं 'हंसा व हंसूं द्या' हें ब्रीदवाक्य होते. पण आतां त्यानें अधिक उच्च ब्रीदवाक्य घेतलें : ''तुम्ही विचार करा व इतरांनाहि विचार करूं द्या.'' एका पत्रांत तो लिहितो, ''तुम्ही जें कांहीं म्हणतां त्यातील एका अवाक्षराशींहि मी सहमत नाहीं. पण तुम्हांस जें म्हणावयाचें आहे तें म्हणण्याचा तुम्हांस हक्क आहे आणि या तुमच्या हक्काचें मी मरेतों समर्थन करीन.'' व्हॉल्टेअरचे हे शब्द म्हणजेच त्यानें मानवी सुधारणेंत घातलेली मूल्यवान् भर होय. अठराव्या शतकाची सुधारणेला मोठी देणगी म्हणजे हे धीरोदात्त शब्द होत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel