- ३ -

'बीगल' गलबतावरच्या प्रवासानें डार्विनच्या जीवनाला तर नवीन दिशा लावलीच, पण सार्‍या मानवी विचारांचीहि दिशा बदलली. ही युगप्रवर्तक सफर पांच वर्षे चालली होती. गलबतांतून पृथ्वीप्रदक्षिणा करून डार्विननें जीवनाचें कोडें उलगडण्यासाठीं निसर्गाच्या अनेक वस्तू जमा केल्या, सृष्टींत सर्वत्र विखुरलेले नाना नमुने त्यानें पाहिले, गोळा केले व त्यांचें वर्गीकरण केलें. त्याची दृष्टि शास्त्रज्ञाची होती, त्याचें मन व त्याची बुध्दि हीं कवीचीं होतीं. त्यानें जमविलेले प्राण्यांचे हजारों नमुने एकत्र जोडून त्यांतून सुसंगत अशी प्राण्यांच्या उत्पत्तीची मीमांसा करून उत्पत्ति लावली व त्यांच्या विविधतेचें विवेचन केलें. आपलें संशोधन आपणास कोठें घेऊन जात आहे याची तो गलबतावर होता तेव्हां त्याला नीटशी कल्पना आली नव्हती. प्रत्येक खर्‍या निरीक्षकाप्रमाणें आधींच मनांत एकादी मीमांसा निश्चित करून तो निघाला नाहीं. प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तो सिध्दान्ताकडे जाई. वीस वर्षे त्याचें संशोधन अखंड व परिश्रमपूर्वक चालू होतें. त्यानें अपरंपार माहिती मिळविली व तिची नि:पक्षपातपणें छाननी केल्यावर त्याला उत्क्रान्तीची महत्त्वाची उत्पत्ति आढळून आली.

हें सारें जगत् म्हणजे डार्विनपुढें एक प्रश्नचिन्ह होतें, एक गूढ व बिकट अशी समस्या होती. तो जणूं गणितांतलाच एक प्रश्न होता, भूमितींतील एक सिध्दन्त होता. तो सोडवावयास पाहिजे होता. त्यांत पुष्कळच अज्ञात राशी होत्या. जग हें कौतुक करण्यासारखी कलाकृति नसून तें एक गणित आहे, एक कोडें आहे, असें डार्विनला वाटे. वाङ्मयाची त्याची आवड कधींच नष्ट झाली होती; पण त्याचें विज्ञानच त्याला वाङ्मयाप्रमाणें, कलेप्रमाणें, संगीताप्रमाणें झालें होतें. मानवांविषयीचें त्याचें प्रेम कधींहि नष्ट झालें नाहीं. विज्ञानाखालोखाल त्याला न्यायाविषयीं उत्कट आस्था वाटे. एकदा त्याचें 'बीगल' गलबत ब्राझिल येथें थांबलें. कांही नीग्रो गुलाम पळत होते. त्यांमध्यें एक स्त्रीहि होती. पाठलाग करणार्‍यांच्या हातीं लागूं नये म्हणून त्या म्हातार्‍या नीग्रो स्त्रीनें कड्यावरून उडी घेतली. तिचे तुकडे तुकडे झाले ! डार्विन लिहितो, ''एकाद्या पोक्त व पावन रोमन स्त्रीनें जर असें केलें असतें तर 'केवढें हें स्वातंत्र्यप्रेम !' असें म्हटलें गेलें असतें; पण तेंच नीग्रो स्त्रीनें केलें म्हणून त्याचें 'पाशवी हट्टीपणा' असें विकृत वर्णन करण्यांत आलें !'' गुलामगिरीवर अन्यत्र टीका करतांना तो लिहितो (आणि त्यानें अमेरिकेंतील सिव्हिल वॉरच्या आधीं वीस हें वर्षे लिहिलें होतें हें लक्षांत घेतलें पाहिजे), ''गुलामांच्या धन्याकडे करुणेनें व आस्थनें पण गुलामांकडे मात्र नि़ष्ठरतेनें पाहणारे लोक स्वत: गुलामांच्या स्थितींत असल्याची कल्पना करून पाहतील तर गुलामांची स्थिती किती निराशाजनक असते हें त्यांना कळून येईल. आशेचा किरण नाहीं, उत्साह नाहीं, आनंद नाहीं, जीवनांत कधीं कांहीं फरक पडण्याची वा स्थिति सुधारण्याची तिळमात्र शक्यता नाहीं ! किती केंविलवाणें जीवन ! आपलीं मुलेंबाळें व पत्नी आपणापासून केव्हां वियुक्त केलीं जातील, ओढून नेलीं जातील याचा नेम नाहीं, क्षणोक्षणीं ताटातूट होण्याची चिंता सतावीत आहे अशी परिस्थिती डोळ्यांसमोर आणा. ही माझी पत्नी, 'हीं माझीं मुलेंबाळें !', असें म्हणण्याचा निसर्गानेंहि न नाकारलेला गुलामांचा हक्क हिरावून घेऊन त्याची लाडकीं मुलें-बाळें, त्यांची प्रियतम पत्नी, यांची गुराढोरांप्रमाणें अधिकांत अधिक किंमत देणारांन विक्री करण्यांत येते ! आणि तीहि कोणाकडून ? तर शेजार्‍यावरहि आपल्याइतकेंच प्रेम करण्याचा आव आणणार्‍यांकडून ! ईश्वरावर श्रध्द ठेवणारे, त्याच्या इच्छेप्रमाणें पृथ्वीवर सर्वांनीं वागावें असें उपदेशिणारेच या प्रकाराचे पुरस्कर्ते असावे, त्यांनीं त्याचें समर्थन करावें व 'यांत काय आहे !' असें म्हणून उडवाउडवी करावी हें केवढें आश्चर्य ?''

'बीगल' मधून सफर करीत असतां मानवप्राण्यांची उत्पत्ति कसकशी होत गेली, हें शोधून काढण्यासाठीं ज्याप्रमाणें त्यानें बारकाईनें निरीक्षण चालविलें होतें, त्याप्रमाणेंच मानवांच्या दु:खांकडेहि त्याची बारीक नजर होती. त्यांकडे तो काणाडोळा करीत नव्हता, करुणेनें पाहत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel