ते शहर चुना व पितळ यांच्या एकाद्या प्रचंड मनोर्‍याप्रमाणें आकाशांत उंच गेलें होतें.  शहरांतील अत्यंत उंच अशा इमारतींहूनहि उंच जागीं शहरांतील झुलत्या बागा होत्या.  कृत्रिम बागांचे मजल्यावर मजले उभारण्यांत आले होते.  मागील राजा नेबुचदनेझ्झर यानें आकाशाला मिठी मारायला जाणारी अशी ती उद्यानांची इमारत उभारली होती.  बागांचा फुलता-झुलता असा हा मनोरा मोठा अपूर्व होता.  जणूं फुललेल्या वृक्षवेलींचा घवघवीत असा प्रचंड पुष्पगुच्छच बाबिलोन शहर आकाशांतील प्रभूच्या चरणीं अर्पीत होतें.  शहराच्या मध्यभागांतून नदी युफ्रेतीस वहात होती.  तिच्यावर प्रचंड दगडी पूल होता.  अफाट दळणवळणांत व्यवस्था असावी म्हणून नदीखालूनहि एक बोगदा होता.  नदीच्या खालून व नदीच्या वरून असे हे रस्ते होते.  नदीतीरावरच्या राजवाड्यांत सुंदर ग्रंथालय होतें.  तेथें खाल्डियाचा ज्ञानोपासक राजा नबोनिडस आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत बसे आणि मातीच्या विटांवर तो इतिहास लिहून ठेवीत असे.  युध्दाच्या गोष्टींपासून त्याचे विचार दूर होते.  सभोंवतालचे राजे युध्दें व कारस्थानें करीत असतां राजा नबोनिडस ज्ञानोपासनेंत रमला होता.  आणि अकस्मात् सायरस आला !  प्रचंड वादळाप्रमाणें तो आला.  त्यानें शहरांतील सैनिकांना व भटांभिक्षुकांना लांचलुचपती दिल्या.  ते धर्माधिकारी लांचलुचपतीला बळी पडले.  फितुरीस यश आलें.  लढाईशिवायच सायरस राजधानीच्या दरवाजातून आंत आला.

बाबिलोनिया जिंकून सायरसनें इजिप्तकडे दृष्टि वळविली.  पहिलें पाऊल म्हणून त्यानें बाबिलोनमधील ज्यूंना पॅलेस्टाइनमध्यें परत पाठविलें.  बाबिलोनमध्यें जवळजवळ सत्तर वर्षे हे ज्यू कैदी म्हणून रहात होते.  त्यांना सायरस जणूं उध्दारकर्ता वाटला !  परंतु सायरसनें ज्यूंना त्यांची मातृभूमि परत दिली, ती उदारपणानें व निरपेक्षपणें दिली नव्हती.  पर्शियाच्या साम्राज्यशाही धोरणांतील तो एक भाग होता.  पॅलेस्टाईनमध्यें मित्र-राष्ट्र असण्याची सायरसला फार जरूर होती.  कारण इजिप्तमध्यें घुसण्याचा मागचा दरवाजा म्हणजे पॅलेस्टाइन.

सायरसच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर एकच ध्येय होते.  तें म्हणजे साम्राज्यनिर्मितीचें.  ही एकच महत्त्वाकांक्षा त्याला होती.  पर्शियन साम्राज्याच्या बाहेर सूर्य कोठें प्रकाशणार नाहीं एवढें मोठें साम्राज्य त्याला स्थापावयाचें होतें.

परंतु इजिप्त जिंकून घेण्यापूर्वीच सायरस मारला गेला.  एका युध्दांत तो स्वत: जातीनें लढत होता.  आपला भव्य देह त्यानें शत्रूंच्या शस्त्रास्त्रांसमोर उभा केला आणि तो ठार झाला.  प्रदेश, आणखी प्रदेश, असें करणार्‍या सायरसला शेवटीं योग्य तें उत्तर मिळालें.  त्याच्या तृप्त न होणार्‍या तृष्णेला अंतिम जबाब मिळाला.  सहा फूट लांबीच्या त्याच्या देहाला भरपूर पुरेल असा जमिनीचा तुकडा त्याला मिळाला.  मर्त्यलोकींचा पुरेपूर वांटा त्याला लाभला.

- ४ -

सायरसनें आरंभलेलें दिग्विजयाचें कार्य त्याच्या मुलानें--कंबायसिसनें-पुढें चालविलें आणि कंबायसिसचें काम पुढें डरायसनें हाती घेतलें.  कंबायसिसनें इजिप्त उध्वस्त केला, डरायसनें बाबिलोनचा पुरा विध्वंस केला.  एक हजार वर्षांची पुंजीभूत होत आलेली संस्कृति त्यांनीं धुळीस मिळविली.  त्या संस्कृतीला मागें खेंचून पुन्हा आपल्या रानटीपणापाशीं त्यांनीं ती आणून ठेवली.  त्यांना यापेक्षां अधिक चांगलें कांही माहीत नव्हतें.  कारण ते वेडेपीर होते.  सारे लष्करी आक्रमक--सायरस, अलेक्झांडर, हॅनिबॉल, सीझर, नेपोलियन--सारे एकजात वेडेपीर होते, मूर्खशिरोमणी होते.  ज्याचें म्हणून डोकें ठिकाणावर असेल तो कधींहि आपल्याच मानवबंधूंच्या कत्तली करून आपली कीर्ति वाढवावी अशी इच्छा करणार नाहीं ; रक्ताचे पाट वाहवून तो स्वत:चा गौरव वाढवूं इच्छिणार नाहीं.  आपलें हें जग अद्याप अर्धवट रानटी स्थितींतच आहे.  अजूनहि, दिग्विजय करूं पहाणार्‍या या भूतकाळांतील खाटकांची आपण पूजा करीत असतों.  मागील जेत्यांना आपण भजतों व आजचे जे जेते आहेत त्यांना तरुणांच्या डोळ्यांसमोर अनुकरणीय आदर्श म्हणून आपण ठेवतों.  आपण जेव्हां खरोखर सुधारूं, सुसंस्कृत होऊं, तेव्हां जग जिंकूं पहाणार्‍या या सार्‍या तरवारबहाद्दरांना आपण वेड्यांच्या दवाखान्यांत ठेवूं ; अत्याचारी अशा माथेफिरू वेड्यांच्यामध्यें त्यांना ठेवूं ; कारण या संहारकारी सैतानांचें खरें स्थान तेंच होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel