आंतरिक प्रेरणेनें हे आर्य सर्वत्र पसरले आणि बहुतेक सर्व युरोपियन राष्ट्रांचे पूर्वज बनले, तसेंच मेडीस, इराणी व हिंदु यांचेही ते पूर्वज होते.  हिंदु व युरोपियन हे एकाच पूर्वजांपासून जन्मलेले आहेत हें स्पष्टपणें दाखविण्यासाठीं कांही इतिहासकार 'आर्य' या शब्दाऐवजीं 'इंडोयुरोपीय जात' असा शब्द वापरतात.

हे इंडोयुरोपियन किंवा आर्य जेव्हां पर्वत ओलांडून हिंदुस्थानांत येऊं लागले, तेव्हां या देशांत रहाणार्‍या त्या खुजा व कृष्णवर्णी लाकांकडे ते तुच्छतेनें पाहूं लागले.  या मूळच्या रहिवाशांना ते दस्यु म्हणत.  ते त्यांचा नि:पात करूं लागले.  पुष्कळांना त्यांनीं गुलामहि केलें.

अशा रीतीनें हिंदुस्थानांत जातिभेद प्रथम जन्मला.  नवीन आलेले आर्य हे वरिष्ठ वर्ग बनले आणि येथल्या जित लोकांना त्यांनीं अस्पृश्य केलें.

आर्यांमध्यें माणसां-माणसांत हे उच्चनीच भेद मानण्याची जी मूर्ख पध्दति होती ती अद्यापहि तशीच आहे.  हिंदुस्थानांतच नव्हे तर युरोपांत व अमेरिकेंतहि वरतीं ब्राह्मण व खालीं तळाला अस्पृश्य असे प्रकार आहेत.  ब्राह्मण व अस्पृश्य दोघेहि मेल्यावर नि:पक्षपाती किड्यांना सारखीच गोड मेजवानी देतात ही गोष्ट दिसत असली तरीहि हे मूर्खपणाचे भेद केले जातच आहेत.

परंतु सध्यां प्राचीन हिंदुस्थानकडे पहावयाचें आहे.

ख्रिस्तशकापूर्वी सुमारें दोन हजार वर्षांच्या सुमारास आर्य हिंदुस्थानावर स्वारी करूं लागले.  आर्यांची ही स्वारी कित्येक शतकें सारखी सुरू होती.  हे आर्य हिंदुस्थानांत आले.  त्यांनीं ठायीं ठायीं राज्यें स्थापिलीं.  या नव्या देशांत निरनिराळीं सोळा राज्यें त्यांनी स्थापिलीं.  प्रत्येक जण आपापल्या राज्यांत गुण्यागोविंदानें रहात होता.  हत्तीची, वाघाची शिकार करीत, भूमीचें येणारें विपुल उत्पन्न उपभोगीत, एक प्रकारचें सुखी व निश्चित असें जीवन ते कंठीत.  त्यांचें तें जीवन जणूं स्वप्नमय होतें.  तें प्रत्यक्षापेक्षां कल्पनासृष्टींतीलच जणूं भासे.  देश उष्ण होता.  जमीन सुपीक होती, विपुल होती.  आणि थोड्याशा श्रमानें भरपूर पिके.  फारसा वेळ काबाडकष्टांत दवडावा लागत नसे.  भव्य महाकाव्यें रचायला व तत्त्वज्ञानें गुंफायला त्यांना भरपूर वेळ होता.  पर्‍यांच्या गोष्टी लिहायला व जीवनाच्या गूढतेचा शांतपणें विचार करायला त्यांना वेळ होता.  अशा या वातावरणांत त्या ज्यू प्रेषिताच्या/जेरिमियाच्या/जन्मानंतर पन्नास वर्षांनी बुध्द जन्माला आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel