९.    '(दुसर्‍यांशीं वागतांना) दया दाखविण्यापेक्षां शक्ति दाखवा' हें नववें सूत्र. दुसर्‍यांच्या बाबतींत दयेपेक्षां दुष्टता व बळजोरी यांचाच प्रयोग करीत जा. मॅकिआव्हिलीनें एक सर्वसामान्य नियम सांगून ठेवला आहे कीं, आपल्याबद्दल लोकांना प्रेम वाटण्यापेक्षां भय वाटणें अधिक बरें. एकाद्या प्रतिस्पर्धी राजाचें सर्वस्व हिरावून घेतल्यावर त्याचें निसंतान करा. काम अर्धवट सोडूं नका, पुरें करा. नाहीं तर एकादा नातलग उद्यां उभा राहून सूड घेऊं पाहील. महत्त्वाकांक्षी माणसानें अर्धवट दुष्ट असून भागणार नाहीं. दुष्टपणा करावयाचाच तर तो पुरता तरी करावा. तुम्ही मनांतला सद्भाव अजीबात गुंडाळून तरी ठेवा, नाहीं तर महत्त्वाकांक्षा तरी सोडून द्या. महत्त्वाकांक्षी व्हावयाचें असेल तर सद्‍सद्विवेकबुध्दीची नांगी मोडून टाका. पण तुमच्या दुष्टपणास सीमा नसली तरी त्याला रीत मात्र अवश्यमेव हवी. तुम्हीं एकादा देश घेतला किंवा एकाद्याला लुबाडलें तर जो कांहीं दुष्टपणा करावयाचा असेल तो त्याच वेळेस करा. म्हणजे हळूहळू सारें विसरलें जाईल. एकाच तडाक्यांत सारें करून घ्यावें. पण कृपा करावयाची असेल तर ती मात्र तीळतीळ करावी म्हणजे तिची सारखी आठवण राहील. पण सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे शक्य तों दया न दाखविणें, कृपेची खैरात न करणें. हुकूमशहानें बळाच्या जोरावर सत्ताधीश राहिलें पाहिजे, प्रेमाच्या जोरावर नव्हे. प्रजेची सदिच्छा हें त्याचें बळ नसावें, तर स्वत:ची शक्ति हें त्याचें बळ असावें.

आतां मॅकिआव्हिलीची शेवटची, सर्वांत महत्त्वाची व रानटी आज्ञा पाहावयाची. कोणती बरें ती ? ऐका :—

१०.    'युध्दाशिवाय कशाचाहि विचार करूं नका' हें दहावें सूत्र. मॅकिआव्हिलीचा या पशूत्तमाचा-युध्द हाच मुख्य धंदा असला पाहिजे. मॅकिआव्हिली सांगतो कीं, राजानें आपणास वधाच्या कलेला संपूर्णपणें वाहून घेतलें पाहिजे. ''जो राज्यकर्ता आहे त्याच्या ठिकाणीं एकच कला पाहावी : ती म्हणजे युध्दाची कला.'' राजानें लष्करी गोष्टीशिवाय कोणत्याहि गोष्टींत लक्ष घालूं नये. शांततेच्या काळांत त्यानें सदैव युध्दाची तयारी करीत राहिलें पाहिजे. राजाचें संभाषण, त्याचा अभ्यास, त्याचे खेळ, त्याचें वाचन, त्याचें गंभीर चिंतन, त्याचे विचार, या सर्वांचें ध्येय एकच असलें पाहिजे व तें म्हणजे युध्द. आपल्या लोकांना कसें जिंकून घ्यावें, मानवजातीला कसें गुलाम करून टाकावें याचाच ध्यास त्यानें घ्यावा.

मॅकिआव्हिलियन शासनपध्दतींत सारे रस्ते युध्दाकडे जातात आणि आजपर्यंत युध्दच सर्वत्र जारी आहे. कारण, मॅकिआव्हिलीचेच शिष्य सर्वत्र राज्य करीत आहेत—वाईट राज्य करीत आहेत. मॅकिआव्हिलीनें दिलेली राजनीतीच जगांतील सर्व लष्करी हडेलहप्पांची व मुत्सद्दयांची नीति आहे. माणसांमाणसांतील व्यवहारांत आपण थोडें तरी बरें वागूं लागलों आहों. पण राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहारांत मात्र आपण साम्राज्यवादी स्वार्थाचें अंधळे धोरणच चालवीत आहों. मुत्सद्देगिरी, कपट व रानटी पिळवणूक हेंच धोरण सतत चालू आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांत आपण मॅकिआव्हिलीच्या कपटनीतीचें अनुकरण करतों, येवढेंच नव्हे तर तिचें कौतुक करतों. जगांतील आजकालचे प्रमुख मुत्सद्दी, नामांकित इतिहासकार व काहीं मोठे तत्त्वज्ञानी मॅकिआव्हिलीचेच शिष्य आहेत. अर्वाचीन काळांतील अतिबुध्दिमान् लॉर्ड बेकन सांगतो कीं, राजकारणांत पुष्कळसा दंभ असावा व थोडासा प्रामाणिकपणा असावा. आठव्या हेन्रीचा प्रधान थॉमस क्रॉमवेल हा मॅकिआव्हिलीचें 'प्रिन्स' हें पुस्तक राजकीय शहाणपणाचें सार मानी. एकोणिसाव्या शतकांतील मोठा इतिहासकार मेकॉले म्हणतो, ''या 'प्रिन्स' पुस्तकांत पुष्कळच उदात्त भावना आहेत.'' १९१४ सालच्या महायुध्दांत लाजिरवाणी कत्तल साडेचार वर्षे चालली होती, तिचें कारण हेंच कीं, जगांतील सारे मुत्सद्दी मॅकिआव्हिलीच्या उपदेशाप्रमाणें वागत होते. तोंडानें ते केवढीहि मोठीं तत्त्वें पुटपुटत असले तरी त्यांचा व्यवहार मॅकिआव्हिलीच्या सारखाच होता. आजचे सारे साम्राज्यवादी मुत्सद्दी, हुकूमशहा, योध्दे, मानवजातीचे नानाविध स्वरुपांतील छळवादी, सारे मॅकिआव्हिलीचेच अनुयायी आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel