एपिक्युरस सर्वांचा मित्र होई ; मैत्री जोडण्यांत तो अद्वितीय पुरुष होता.  मैत्री कशी जोडावी हें तोच जाणे.  आपल्या सुखांत सर्वांना सहभागी करणें हाच सुखी होण्याचा खरा मार्ग होय.  आपलें सुख सर्वांना द्या.  असें करणें मोठें उदारपणाचें अगर उदात्तपणाचें आहे म्हणून मात्र नव्हे, तर जरूरीचें आहे म्हणून.  आपल्या जगण्यांत शहाणपणा नसेल, न्यायीपणा नसेल, गोडपणा नसेल, तर आपणांस आनंदानें जगतां येणार नाहीं, सुखासमाधानानें नांदतां येणार नाहीं.  प्राचीन काळांतील कन्फ्यूशियसप्रमाणें व आपल्या काळांतील बरट्रांड रसेलप्रमाणें एपिक्युरस शहाणा व अविरोधी स्वार्थ शिकवीत असे.  तो म्हणे, ''जर दुसर्‍यांनीं आपल्या सुखाआड येऊं नका असें तुम्ही इच्छीत असाल तर तुम्हीहि दुसर्‍यांच्या सुखाआड येऊं नका.  स्वत:ला अपाय होऊं नये म्हणून तरी दुसर्‍यास अपाय करूं नका.  तुम्हांला त्रास नको असेल तर दुसर्‍यासहि त्रास देऊं नका.  स्वत: जगा आणि दुसर्‍यांसहि जगूं द्या. प्रक्षुब्धता टाळा.  उगाच धोके पत्करूं नका.  युध्दाच्या रानवटपणापासून दूर राहा.  राजकारणाच्या घाणींत नका शिरूं.  प्रेमाचा अतिरेक नको तसाच अति द्वेषहि नको.  मैत्रीचा गोड गुण जोडा.  मैत्री जोडणें हा धर्म माना.  मैत्रीची पूजा करा.  कारण, मैत्री ही अत्यंत मधुर, अति पवित्र व सुंदर वस्तु आहे.  या जगांत निश्चितपणें सुखाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे खर्‍या मैत्रीनें मिळणारी सहानुभूति.  बाकी सारें कितपत किंमतीचें आहे याविषयीं शंकाच आहे ; पण मैत्रीचा आनंद ही मात्र नि:शंक गोष्ट आहे.  जीवनांतील दु:खक्लेशांमुळें आपण मरणालाहि मिठी मारतों, त्याप्रमाणें मैत्रीच्या आनंदासाठीं हें जीवन कितीहि कटू वाटलें तरी आपण त्याला कवटाळूं या.''

एपिक्युरसला मित्रांचे सुख होतें म्हणूनच त्याला सार्‍या आपत्ती सुखानें सहन करतां आल्या.  दारिद्र्य, प्रियजनांचा वियोग, दुखणीं, यांमुळें त्याचें जीवन खरोखरच नि:सार झालें होतें.  पण मृत्युशय्येवरूनहि तो आपल्या एका मित्राला पुढील पत्र लिहितांना दिसतो :— ''माझ्या आयुष्यांतला हा शेवटचाच सुखाचा दिवस आहे आणि मी तुला लिहीत आहे.  मला मूत्राशयाचा रोग झाला आहे.  वेदना इतक्या होत आहेत कीं, याहून आणखीं कांही दु:खदायक असूं शकेल असें मला तरी वाटत नाहीं.  पण या अपरंपार दु:खाच्या विरुध्द बाजूच्या पारड्यांत आपण कितीदां प्रेमानें बोललों व एकत्र अनेक गोष्टी केल्या त्यांच्या प्रेमळ स्मृतींचा आनंद घातला कीं हें असमी दु:खहि मला नसल्यासारखेंच वाटतें.  दु:खाचें पारडे हलकें होतें.''

आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशीं त्यानें या ओळी लिहिल्या व एकाहत्तर वर्षेपर्यंत रोज रात्रीं तो ज्याप्रमाणें डोळे मिटीत असे त्याचप्रमाणें त्यानें त्या रात्रींहि शांतपणे, समाधानानें व सहजतनें डोळे मिटले ते कायमच.  दुसरे दिवशीं सकाळीं आपण उठूं कीं न उठूं, जागे होऊं कीं कायमचेंच झोंपीं जाऊं याचें त्याला काय होय ?  तो जागा झाला असता वा कायमचा झोंपी गेला असता तरी त्याला असा काय मोठासा फरक वाटणार होता ? जीवन, मरण, दोन्ही त्याला जणूं सारखींच सुखप्रद होतीं !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel