येशू जुडाच्या डोंगरांत भटकत राहिला.  मानवजातीनें त्याला उडाणटप्पू ठरविलें होते.  जॉन दि बॅप्टिस्ट याच्याप्रमाणें त्यालाहि आढळून आलें कीं, माणसें पशूंच्याच प्रतिकृती आहेत.  निराशेच्या गर्तेत पडलेले लोक त्याच्याभोंवतीं गोळा झाले.  कोळी, कामगार वगैरे दरिद्री लोक त्याचे अनुयायी झाले.  त्यानें त्यांना भावी सुखाची—स्वर्गांतील राज्याची—आस दाखविली, अंधारमग्नांना आशेचा किरण दाखविला.  ''सोडा आपलें घरदार'' तो म्हणाला, ''व चला माझ्या पाठोपाठ.  प्रभूच्या नव्या राज्यांत आपण शहरें, पुरें, पट्टणें हिंडत जाऊं, या गांवाहून त्या गांवीं जाऊं, पृथ्वीवर सर्वत्र प्रभूचें राज्य स्थापूं, ईश्वराचा झेंडा चोहोंकडे नेऊं.''

त्याच्याभोंवती जमा झालेले भिकारी म्हणजे बेजबाबदार व मजा करूं पाहणार्‍या लोकांचा जथा !  त्यांना खाणेंपिणें व भांडणें या गोष्टी आवडत.  एकदां एका गांवी त्यांचे स्वागत कोणींच केलें नाहीं म्हणून त्या गांवाला काडी लावावयाला ते निघाले ; पण ख्रिस्तानें त्यांचे मन वळविलें व त्यांना तसें करूं दिलें नाहीं.  जगांतल्या रूढींकडे पाहून तोंड वेंगाडण्यांत त्यांना परमानंद वाटे.  रविवारी म्हणजे प्रार्थनेच्या पवित्र दिवशी कांही वेडेवांकडे, अपवित्र काम करतांना ते कोणास आढळले तर ते असा युक्तिवाद करीत कीं, ''लोकांसाठीं रविवार आहे, रविवारसाठीं लोक नाहींत.'' जे त्यांचे ऐकत नसत, ऐकावयाला तयार नसत, त्यांना ते शिव्याशाप देत व त्यांची निंदा करीत. ''तुम्ही जणूं मृतवत्, मुडदे आहां !'' असें ते त्यांना हिणवीत.  ईश्वरानें त्यांचा नाश करावा म्हणून ते प्रार्थना करीत.  सोडोम व गोमारा येथील लोकांचा जसा पूर्वी प्रभूनें नायनाट केला तसाच याहि लोकांचा त्यानें नायनाट करावा म्हणून ते प्रभूला प्रार्थीत.  ते जणूं गॅलिलींतले समाजवादीच होते !  अनुयायी फार अतिरेक करूं लागले तर त्यांचा मुख्य नेता ख्रिस्त त्यांस आवरी ; पण खुद्द येशूहि कधीं कधीं अत्यंत संतापे, प्रक्षुब्ध होई.  ख्रिस्ताची वाणी वा त्यांचीं कृत्यें अद्यापि पुरेशीं सुसंस्कृत झाली नव्हतीं.  आपला संदेश न ऐकणार्‍यांवर तो संतापे,  त्याला धीर धरवत नसे.  तो उतावळा व अधीर होता.  निराशेच्या भरांत एकदां तो म्हणाला, ''जो माझ्या शब्दाचा विश्वास ठेवणार नाहीं तो नरकात जाईल.'' आयुष्याच्या या काळांत त्याच्या ठायीं सहनशीलता नव्हती, सौम्यता नव्हती. तो एकदम रागावे, संतापे, प्रक्षुब्ध होई.  कधीं कधीं क्रोध आवरणें त्याला अशक्य होई.  जोरदार व तेजस्वी शब्दांनीं ऐकणार्‍यांचा हृदयपालट झाला नाहीं कीं तो हात उगारावयासहि मागेंपुढें पाहत नसे.  हातांत चाबूक घेऊन तो अन्यायाचें शासन करण्यास उभा राही ; हातीं तरवार घेऊन तो पृथ्वीवर स्वर्गाचें राज्य आणूं पाहीं.

पण त्याच्या ठायीं दैवी विनोदहि होता व मुलावर तर तो अपार प्रेम करी.  तो जेथें जेथें जाई, तेथें तेथें त्याच्याभोंवतीं मुलें गोळा होत व त्याला म्हणत, ''या, आमच्याबरोबर खेळायला या.'' तो त्यांच्याबरोबर हंसे, खेळे.  एक मुलगा खांद्यावर आहे, एक हाताला ओळखंबा घेत आहे, पुष्कळ जण त्याच्या पाठीमागून येत आहेत, अशा थाटांत त्याची ती ऊन लागून तांबूस पिंगट झालेली धिप्पांड मूर्ति रस्त्यांवरून जातांना नेहमीं दिसे.  तीं मुलें पॅलेस्टाइनमधलीं लोकगीतें मोठमोठ्यानें गात व हावभाव करीत त्याच्याबरोबर हिंडत.  ख्रिस्ताचें एकाद्या गांवीं आगमन म्हणजे तेथल्या मुलांना जणूं सुटीचा दिवस !  तो नाझारेथचा गोड मुरलीवाला मुलांना इतकें मोहून टाकी कीं, पृथ्वीच्या टोंकापर्यंत कोठेंहि त्याच्याबरोबर जावयास तीं आनंदानें तयार असत.

येशूची सारी आशा त्या बाळगोपाळांवर होती.  ''हे माझे बाळसंवगडी म्हणजेच जगाची, प्रभूची व माझी आशा !'' तो म्हणे, ''ईश्वराचें राज्य अशा सरळ, निष्पाप, निर्मळ व प्रेमळ मुलांसाठींच असतें.  मुलांना त्याचें म्हणणें पट्कन् समजे.  नवीन राज्याच्या ज्या अद्‍भुत कथा तो सांगे त्या त्या मुलांना खर्‍या वाटत.  त्यांत त्या निष्पाप बालकांना असंभाव्य वा अशक्य कांहींच वाटत नसे.  तो स्वत: त्या मुलांना घेऊन त्या रम्य आनंदभुवनांत जाणार होता. ''त्या नवीन मंगल भूमतींत द्वेष-मत्सर असणार नाहींत, दु:ख असणार नाहीं, रोग असणार नाहींत, मरण येणार नाहीं !'' असे तो सांगे.  मुलें त्याच्याजवळ बसून तल्लीनतेनें ऐकत, आश्चर्यानें त्यांचे डोळे विस्फारित होत. येशू त्यांच्या डोळ्यांसमोर जीं कल्पनारम्य चित्रें उभीं करी, त्यांमुळें त्यांचीं तोंडे आशेनें व श्रध्देनें चमकूं लागत. ''या पृथ्वीवर हीं मुलेंच नवीन स्वर्ग उभारतील, तो निर्माण करण्यास मदत करतील, मोठ्या माणसांच्या हातून हें काम होणार नाहीं,'' असें त्याला वाटे.  जे वयानें वाढलेले असतात ते बिघडलेले असतात.  साहसी वृत्ति, आत्मविश्वास, त्याग, श्रध्दा, इत्यादि गुण त्यांच्या ठायीं नसतात.  प्रत्यक्ष वस्तुस्थितींतील वैगुण्यें, जगांतील दु:खें व निराशा त्यांच्या हृदयांत खोल रूतून बसलेलीं असतात.  ते केवळ संसारी असतात, व्यवहारापुरतें पाहतात.  या रानटी जगांतील व्यावहारिक शहाणपणामुळें त्यांना सौम्य व शांत अशा एका नव्या जगांतील सौंदर्य दिसत नाहीं.  ख्रिस्त वयानें मोठ्या असलेल्या प्रौढांजवळ स्वर्गीय राज्याविषयीं बोले तेव्हां त्यांना त्याचा अर्थहि समजत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel