कोणीं तरी म्हटलें आहे कीं, अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे अंधार्‍या खोलींत तेथें नसलेलें मांजर शोधीत बसण्यासारखें आहे. पण दुसरे कांही म्हणतात कीं, ज्ञात जगाच्या अभ्यासाइतकाच अज्ञात जगाचा अभ्यासहि महत्त्वाचा आहे आणि आजचें अध्यात्मच अद्यांचें सृष्टिशास्त्र होईल. शास्त्रज्ञ पाऊल टाकण्यास भितात तेथें आपण वारंवार घुसूं पाहत असतों हें तत्त्वज्ञानी कबूल करतात. पण त्यांचें म्हणणें असें असतें कीं,  तत्त्वज्ञान्यांनीं ज्या अंधारांत उड्या मारल्या त्यांचेंच फळ विज्ञानांतील मोठमोठे शोध ! अंधारांतील त्या उड्यांतूनच विज्ञान जन्मलें आहे.

तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष उपयुक्तता किती आहे या वादांत न शिरतां स्पायनोझाच्या अध्यात्मसिंधूंत आपण बुडी घेऊं या. पण आपण फार पुढें मात्र जावयाचें नाहीं. बुडणार नाहीं इतपतच खोल पाण्यांत आपण जावयाचें, प्रत्यक्ष सृष्टीच्या किनार्‍यापासून फार दूर जावयाचें नाहीं,  किनारा डोळ्यांसमोर ठेवावयाचा, असें ठरवून या समुद्रांत शिरूं या, बुडी घेऊं या.

- २ -

आपणां सर्वांस नेहमीं सोडवावेसे वाटणारे दोन प्रश्न स्पायनोझासमोरहि होते. कोणते बरें ते प्रश्न ?

१.    या जगांत आपणांस कोणीं जन्माला घातलें ?
२.    येथें आपण काय करावयाचें ?
या प्रश्नांचीं उत्तरें मिळावीं म्हणून तो ईश्वराचें स्वरूप तपासूं लागला. ईश्वराचें स्वरूप, विश्वाची रचना, मानवाचें मन या तिहींचें पर्यालोचन त्यानें सुरू केलें.

तो अशा निर्णयाला आला कीं, ईश्वरांत सारें आहे व ईश्वर सारें व्यापून आहे. ईश्वर म्हणजे सृष्टि निर्माण करणारें परम ज्ञान; त्या ज्ञानानें उत्पन्न होणारें हें जगहि तोच आहे. परमेश्वर म्हणजे सनातन स्त्रष्टा, चिरंजीव अमर कलावान्. काळाच्या खटक खटक करणार्‍या भव्य भागावर सृष्टिचंद्रसूर्यतार्‍यांचें व नाना ज्योतिर्गोलांचें तेजस्वी वस्त्र तो विणीत असतो व स्वत:च तें पांघरतो. हें दृश्य विश्व म्हणजे प्रभूचें शरीर आहे. आणि विश्वाला चालना देणारी प्रेरणा, अंत:शक्ति व अंत:स्फूर्ति म्हणजे त्या प्रभूचें मन. पण शास्त्रज्ञ 'वस्तू व वस्तूंतील शक्ति एकरूप आहेत' असें म्हणतो, त्याप्रमाणेंच प्रभूचें हें शरीर व त्याचें मन एकरूप आहेत.' दुसर्‍या शब्दांत हेंच सांगावयाचें झालें तर ईश्वर म्हणजेच हें अनंत विश्व व अनंत ज्ञान. ईश्वर म्हणजेच विश्व. प्रत्येक पर्णांत, मातीच्या प्रत्येक कणांत, प्रत्येक प्राणिमात्रांत-मग तो कितीहि क्षुद्र असो-व सर्व चराचरांत परमात्मतत्त्व आहे. ईश्वराची दिव्यता चराचरांतील अणुरेणूंत आहे. आकाशांतील अत्यंत तेजोमय गोल व पृथ्वीवरील एकादा भिकारी दोघांचीहि या सृष्टीच्या महाकाव्यांत सारखीच जरुरी आहे. सृष्टीच्या महाकाव्यांत हीं दोन्ही अक्षरें सारखींच महत्त्वाची आहेत.

हें विश्वाचें महाकाव्य त्या अनंत ज्ञानाचें फळ आहे. मानवाच्या क्षुद्र इच्छा व त्याचे क्षुद्र कायदे यांना अनुसरून हें विश्वकाव्य रचण्यांत येत नसतें. ईश्वरी मनोबुध्दि व मानवी मनोबुध्दि यांत बिलकुल साम्य नाहीं. जीवनाच्या नाटकांत प्रभूनें जें संविधानक योजिलेलें असेल तें आपल्या बुध्दीच्या कक्षेच्या पलीकडचें आहे. तें केवळ मानवाची दृध्दि ठेवून निर्मिलेलें नाहीं. मानवानें त्यावर बरें कीं वाईट हा निर्णय देत बसूं नये. नाक चष्मा ठेवण्यासाठीं आहे असें म्हणणें अगर डासांनीं चावावें म्हणून हातपाय आहेत असें म्हणणें जितकें वेडेपणाचें, तितकेंच हें विश्व आमच्यासाठीं निर्मिलेलें आहे असें म्हणणें हेंहि वेडेपणाचें आहे. मानवांनीं आपल्या मर्यादित ज्ञानानें ईश्वराच्या अनंत ज्ञानावर आक्षेप घेऊं नये.

स्पायनोझाच्या मतें ईश्वर हा एकादा लहरीनुसार वागणारा सृष्टीचा हुकूमशहा नसून तो जणूं दैवी चित्कळा आहे. स्पायनोझाचा ईश्वर कोठें स्वर्गांत बसलेला नाहीं. तो आमच्या प्रार्थनांमुळें जय किंवा आमच्या शत्रूंच्या प्रार्थनांमुळें अपजय देत नसतो. आपणांस जें सत् वा असत् वाटतें त्याच्याशीं त्या परमात्म्याला कांही एक करावयाचें नाहीं. जे निर्माण केलेंच पाहिजे असें परमेश्वराला वाटतें तें तो आपल्या अनंत बुध्दीला योग्य वाटणार्‍या नियमानुसार निर्माण करतो. या विश्वाला गतिमान् ठेवणारें शाश्वत व सनातन यंत्र म्हणजे ईश्वर; पण या यंत्राला प्रेरणा देणाराहि तोच व या यंत्राचें नियमन करणारी इच्छाशक्तीहि तोच. आणि शाश्वत गतिमान् व शाश्वत प्राणमय अशा या शक्तीयंत्रांतले आपण सारे अवश्यक असे भाग आहों. आणि त्या अनंत शक्तिमान् यंत्रालाच आपण अधिक सुटसुटीत नांव न सांपडल्यामुळें ईश्वर म्हणून संबांधितों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel