राजा संतापला.  इतर भक्तगणांना सात्त्विक चीड आली.  कांही वेळ सारे स्तब्ध होते.  जेरिमिया त्यांच्यावर वाग्बाणांचा वर्षाव करीत होता.  चोर्‍या करतां, खून करतां, व्यभिचार करतां ; आणि हीं सर्व पापें करून येथें माझ्यासमोर येऊन उभे राहतां ? हें माझ्या नांवानें स्थापलेलें मंदिर, येथें का चोरांचा मेळावा जमावा ?  हें मंदिर कीं चोरांच्या अड्डयाची जागा ? तुम्ही असत्यवादी, लफंगे, खुनी आहांत.  मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सारे पापी आहांत.  पक्ष्याचें घरटें जसें पिलां-पांखरांनी गजबजलेलें असतें तशीं तुमची घरें पापांनीं व वंचनांनी भरलेलीं आहेत.  तुम्ही धष्टपुष्ट झालां आहांत, लठ्ठ झालां आहांत.  धनकनकसंपन्न असें मान्यवर झालां आहांत.  परंतु अनाथ व पोरके तुमच्या नांवानें खडे फोडीत असतात.  जे गरीब आहेत, त्यांना पदोपदीं वाण आहे, असे सारे लोक 'तुम्ही पापात्मे आहांत, धर्ममर्यादांचे उल्लंघन करणारे आहांत' याला साक्षी आहेत.

''म्हणून प्रभूसमोर तुमचा नक्षा उतरला गेलाच पाहिजे.  तुमचा गर्व धुळींत मिळाला पाहिजे.  वाळवंटांतील एकाद्या प्रेताप्रमाणें हें तुमचें शहर होईल.  उत्तरेकडून लांडगे येतील.  आणि तुम्हांला फाडून खातील.''

अशी ही मर्मांतिक टीका व निंदा कोण कोठवर सहन करणार ?  ते सारे धर्मपूजक जेरिमियाच्या अंगावर धांवून आले.  ठार करा याला असें सारे ओरडले.  राजा शांत होता.  त्यानें जेरिमियाच्या बचावासाठींहि कांही केलें नाहीं.  जमावानें मन मानेल तसें वागावें असेंच जणूं तो सुचवीत होता.  त्यांच्या इच्छेच्या आड तो नव्हता.

जेरिमियाचा खटला सुरू झाला.  न्यायाधिशासमोर तो उभा होता.  त्याच्यावर ज्यांनीं आरोप लादले होते त्यांच्यासमोर तो उभा होता.  बोललेल्या शब्दांपैकी एकहि शब्द मागें घ्यावयास तो तयार नव्हता.  परंतु जे न्यायाधीश होते त्यांचा आत्मा राजाच्या आत्म्यापेक्षां अधिक उदात्त होता.  त्या धर्मात्म्याचें अलौकिक धैर्य पाहून ते विरघळले.  त्या महान् संस्फूर्त पुरुषानें न्यायाधिशांना आपलेंसें केले.  त्यांनीं त्याला दोषमुक्त ठरविलें.

कांही काळ जेरिमिया जेरुसलेम सोडून स्वत:च्या जन्मग्रामीं जाऊन राहिला.  परंतु तेथेंहि त्याला शांति नव्हती.  त्याच्या क्रांतिकारक जहाल मतांमुळें भटभिक्षुक त्याच्यावर दांतओठ खात होते.  त्या भटभिक्षुकांनीं कांही गुंड हाताशीं धरले.  एकदां जेरिमिया एकटाच जात होता.  रस्त्यांत कोणी नव्हतें.  त्या मारेकर्‍यांनीं त्याच्यावर हल्ला केला.  जेरिमिया मोठ्या मुष्किलीनें वांचला.  तो कसातरी जिवानिशीं सुटला.  पॅलेस्टाइनमधील संस्कृतिसंरक्षक, नितिधर्मरक्षक निराश झाले.  परंतु त्यांनीं जेरिमियाचा पिच्छा सोडला नाहीं.  त्यांनीं जेरिमियाच्या घरांतील नोकरांना वश करण्याचे प्रयत्न केले.  जेरिमियाच्या अन्नांत विष कालवलें जावें म्हणून त्यांनीं उद्योग केले.  परंतु तो कट जेरिमियाच्या लक्षांत आला आणि तो वेळींच वांचला.  तो पुन्हा जेरुसलेमला आला.  आपल्या देशबांधवांच्या दुष्टपणासमोर आरसा धरण्याचें स्वत:चें जीवितकार्य त्यानें पुन्हा सुरू केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel