तिच्या खटल्याच्या वेळेस मुख्य न्यायाधीश बोव्हिसचा बिशप पेरी कौचॉन हा होता. तो अत्यंत श्रध्दाळू व निष्ठावन्त  ख्रिश्चन होता. पॅरिसच्या विद्यापीठानें त्याच्या धार्मिकतेची जाहीर स्तुति केली होती. ''बिशप देवासाठीं किती तळमळतात ! किती त्यांचें धैर्य, केवढी त्याची धडपड ! ते कसे वाट पाहत असतात ! किती मानसिक व्यथा व वेदना ! चर्चसाठीं त्यांना किती यातना !'' अशा प्रकारें पॅरिसच्या विद्यापीठानें बिशपांची पाठ थोपटली होती. पण विद्यापीठाच्या वरील प्रशस्तींत शेवटीं ''चर्चसाठीं त्यांनीं किती लोकांस छळलें व किती लोकांचे प्राण घेतले !'' असे शब्द घातले असते तर बरें झालें असतें. कारण जळणार्‍या नास्तिकांच्या चरबीचा वास त्यांच्या नाकांना फार आवडे. कॉन्स्टन्स येथें जी धर्म-परिषद् भरली होती व जेथे हसला वचन मोडून अटक करून ठार मारण्यांत आलें होतें त्या परिषदेंत हे बिशपहि होते. हसच्या खटल्याच्या वेळीं हेच बिशप म्हणत होते कीं, कधीं कधीं न्यायाचा औपचारिक देखावा न करतांहि अपराध्याला मारणें रास्त असतें, क्षम्य असतें.

इंग्रजांनीं जेव्हां जोनला पेरी कौचॉन याच्या हातीं दिलें तेव्हांच त्यांनीं तिच्या मरण-पत्रावर सही केली. ती जिवंत सुटावी अशी त्यांना इच्छाच नव्हती. चर्चनें जर नास्तिक म्हणून तिला ठार केलें नाहीं तर तिला पुन: इंग्रजांच्या ताब्यांत द्यावयाचें असें ठरलें होतें. It was a case of "heads you lose, tails I win."  खटल्याच्या आरंभी न्यायाधीश-मण्डळांत असलेल्या दोघां न्यायाधीशांनीं एकंदर सारें काम बेकायदेशीर आहे असे म्हटलें, तेव्हां त्यांपैकीं एकाला ताबडतोब कमी करून अध्यक्षांच्या परवानगीनें कैदेंत टाकण्यांत आलें व दुसरा त्याला शिस्त लावण्याची फुरसत वरिष्ठांना मिळण्यापूर्वीच पळून गेला !

खटला जवळजवळ चार महिने चालला हाता. आरंभीं न्यायाधीश बेचाळीस होते, ते शेवटीं शवेटीं त्रेसष्ट झाले. शिकारी कुत्र्यांप्रमाणे ते तिच्या पाठीस लागले होते. त्यांनीं तिच्यावर लादलेले आरोप बाष्कळ होते. चर्चच्या मदतीवांचून ती स्वर्गांतील शक्तिंशीं बोलली हा तिच्यावरील मुख्य आरोप होता. दुसर्‍या शब्दांत हेंच सांगावयाचें झाल्यास भटांभिक्षुकांच्या इच्छेला मान देण्याऐवजीं तिनें देवाची इच्छा मानली हा तिचा गुन्हा हाता. ते पुन: म्हणाले, ''तिला ज्या शक्ति दिसल्या त्या दैवी नसून सैतानी होत्या.'' आणि न्यायाधीश त्रेसष्ट व ती एकटीच असल्यामुळें त्यांची इच्छा बलीयसी ठरली !

तिला आपलें भवितव्य माहीत होतें. तरीहि त्या खटल्याचे वेळेस वातावरणांत तिनेंच जरा विनोदी रंग भरला. एके दिवशीं खटल्याच्या वेळीं ते सर्व धार्मिक कावळे एकदम कावकाव करूं लागले, तेव्हां ती त्यांना गोड आवाजांत म्हणाली, ''भल्या बापांनो, सारे असे एकदम नका बोलूं. तुम्ही एकमेकांचा गोंधळ उडविण्याचें पाप कराल.''

इ.स. १४३१ च्या मेच्या तिसाव्या तारखेस न्यायाचा हा फार्स संपला. जोनला जिवंत मारण्याची शिक्षा झाली. पॅरिसच्या विद्यापीठानें पेरी कौचॉनची पाठ पुन: थोपटली. ''बिशपनें हा खटला अत्यंत गंभीरपणें व पवित्र आणि न्यायी वृत्तीनें चालविला'' असे उद्गार विद्यापीठानें काढले.

तिला मरणाची शिक्षा देऊन चर्चच्या प्रतिनिधींनीं तिला स्टेटच्या मारेकर्‍यांच्या हवालीं केलें. रक्तपाताकडे आपणांस पाहवत नाहीं असें चर्चचें म्हणणें असे. चर्च मरणाची शिक्षा देई, पण स्वत: तिची अमलबजावणी करीत नसे. ते काम स्टेटकडे असे. चर्च शिक्षा देऊन पुन: त्या मरणोन्मुखांना मारलें जात असतां त्यांच्या आत्म्यासाठीं प्रार्थना करी !

जोनला जाळण्यापूर्वी पॅरिसच्या विद्यापीठांतील प्रोफेसर निकोलस मिडी यानें तिला प्रवचन दिलें. तो म्हणाला, ''चर्चचा एकादा अवयव बिघडला तरी सारें चर्च रोगी होतें.'' नंतर ''तूं मरावयालाच लायक आहेस'' असें तिला सांगून तो म्हणाला, ''चर्चच्या बर्‍यासाठीं तूं मर. जा, जा, शांतीनें मर. चर्च तुला वांचवूं शकणार नाहीं.'' आपल्या गुन्हेगारांच्या कत्तलीचा दोष आपणांकडे येऊं नये म्हणून चर्चवाले शेवटीं नेहमीं म्हणत, ''चर्च काय करणार ? चर्चच्या हातांत काय आहे ?'' पण जोन ऑफ आर्कला अधिक समजत होतें. पेरी कौचॉनकडे बोट करून ती म्हणाली, ''बिशप, तुमच्यामुळेंच मला मरावें लागत आहे.''

- ६ -

हें जें शोकपर्यवसायी नाटक झालें त्याचा शेवटचा भाग साडेपांचशें वर्षांनीं केला गेला तेव्हां पोपनें शेवटीं असें जाहीर केलें कीं, ''जे संदेशदाते जोनला भेटत ते सैतानाचे दूत नसून देवदूतच होते. मी तिची शिक्षा रद्द करतों व ती सन्त होती असें जाहीर करतों.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel