या ध्येयानें प्रेरित होऊन लोकांवर कशा रीतीनें राज्य चालवावें याविषयींची निश्चित सूत्रावलि त्यानें लिहून ठेविली आहे.  तसेंच जनतेंत शिस्त यावी म्हणून नानाविध विधिविधानें त्यानें सांगितलीं आहेत.  जीवनांतील प्रत्येक गोष्ट त्यानें कोणत्या तरी विधीशीं जोडली आहे.  हें विधींचें अवडंबर मोठें डोळ्यांत भरण्यासारखें आहे.  झोंपडींत रहाणारा शेतकरी राजवाड्यांतील राजाइतकाच प्रतिष्ठित.  राजाला राजाचे विधी, शेतकर्‍याला शेतकर्‍याचे.  परंतु उभयतांच्याहि जीवनांत त्या त्या गंभीर विधींमुळें एक प्रकारची प्रतिष्ठा आली.  कन्फ्यूशियसनें आपल्या लोकांवर जे हे औपचारिक असे नानाविध बाह्य विधी लादले, त्यांचें आपणांस आज हंसूं येते.  अति गुंतागुंतीचे व कांही कांही बाबतींत तर ते हास्यास्पद असे दिसतात.  या विधींमुळें चिनी राष्ट्र हें सर्व जगांत अगदीं बारीकसारीक गोष्टींकडेहि फार पहाणारें, बाह्य देखाव्यावर भर देणारें असें झालें.  परंतु यामुळें एक प्रकारचा स्वाभिमानहि त्यांच्यांत आला.  दुसर्‍यास मान देणें व स्वत:चाहि मान सांभाळणें या दोन्ही गोष्टी तें शिकलें.  राजाहि पूजार्ह आणि मी शेतकरीहि पूजार्ह.  कन्फ्यूशियसच्या शिकवणीचें सार एका वाक्यांत सांगायचें झाले तर असें म्हणतां येईल, कीं '' स्वत:शीं प्रामाणिक रहा व शेजार्‍यांशीं प्रेमानें व सहिष्णुतेनें वागा.''  दुबळ्या नि:स्वार्थतेच्या तत्त्वज्ञानाऐवजीं त्यानें त्यांना उदार आणि दुसर्‍याच्या डोळ्यांत न् खुपणारा असा सुसंस्कृत स्वार्थ शिकविला.  स्वार्थ तुमच्याजवळ असणारच.  परंतु तो शहाणा स्वार्थ असूं दे.  कन्फ्यूशियसच्या मनांत चीन हें प्रतिष्ठित नागरिकांचें राष्ट्र करावयाचें होतें.  असहिष्णु व अहंकारी लोकांची जात निर्मिण्याऐवजीं सभ्य अशा सद्‍गृहस्थांची जात त्याला निर्मावयाची होती.  चिनी राष्ट्र सद्‍गृहस्थांचें व्हावें असें स्वप्न रात्रंदिवस तो मनात खेळवित होता.  राजाला वा रंकाला तो स्वत: समानतेनें वागवी.  राजाचें स्थान वैभवाचें व थोर म्हणून त्याला तो मान देई आणि गरीब थोंर मनानें व उदात्ततेनें कसे कष्ट सोशीत आहे हें पाहून तो त्यालाहि मान देई.

ज्यांना ज्यांना जीवनांत दु:ख, क्लेश आहेत, ज्यांचीं जीवनें विकल नि विफल झालीं आहेत, ज्यांना अपयश आलें आहे, अशा सर्वांच्या दु:खांत तो सहभागी होऊं इच्छीत असे.  कन्फ्यूशियसवर त्याचा एक शिष्य यामुळें एकदां रागावला.  ''दरिद्री लोकांशीं, सर्वसामान्य जनतेशीं मिसळण्याची तुमची ही वृत्ति आम्हांला आवडत नाहीं.''  असें तो शिष्य म्हणाला.  कन्फ्यूशियस त्याला शांतपणें म्हणाला, ''दु:खीकष्टी दुनियेशीं मी एकरूप नको होऊं तर कोणाबरोबर होऊं ?''

परंतु दरिद्री नारायणाविषयीं जरी त्याला सहानुभूति वाटत असली तरी बुध्दांप्रमाणे तो केवळ करुणासागर नव्हता.  भावनांनीं वाहून जाणारा, विरघळून जाणारा तो नव्हता.  तो आपला तोल, सुवर्णमध्य कधीं विसरत नसे.  त्याची सहानुभूतीहि व्यवहारी होती.  मानवजातीला ओलांडून सर्व प्राणिमात्रास कवटाळूं पहाणारी अशी त्याची सहानुभूति नव्हती. तो म्हणे, ''जगापासून दूर निघून जाणें अशक्य आहे.  ज्या पशुपक्ष्यांशीं आपलें कांही साधर्म्य नाहीं त्यांच्याशीं एकरूप कसें व्हायचें ?''  कन्फ्यूशियस पशुपक्ष्यांसाठीं तहानलेला नव्हता.  देवदूतांना भेटायला हपापलेला नव्हता.  त्याच्या डोळ्यांसमोर स्वत:ची ही मानवजात नेहमीं असे.  तिचा तो विचार करी.  तिचें सुखदु:ख पाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel