हीं तीन कारणें शोधून या जगांत प्रचार करण्यासाठीं, युध्दप्रिय जगाला शांतीचे मार्ग दाखविण्यासाठीं, तो बाहेर पडला. त्याची आमरण प्रचारयात्रा सुरू झाली. त्यानें पाऊस, बर्फ व वारा यांपासून स्वत:चा बचाव करून घेण्यासाठीं कातड्याची एक कोट-पाटलोण शिवली व रुंद कडांची एक टोपी तयार करून घेतली आणि निघाला हा यात्रेकरू ! सार्टर रिसार्टस या ग्रंथांत कार्लाईल म्हणतो, ''अर्वाचीन इतिहासांतील अत्यंत प्रसिध्द व लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वॉटर्लूची, पेटर्लूची, ऑस्टरलिट्झची किंवा आणखी कोठली लढाई नव्हे, तर पुष्कळशा इतिहासकारांनीं उल्लेखहि न केलेली आणि टिंगल करण्यासाठींच कांहींनीं उल्लेख केलेली गोष्ट होय. सर्वांनीं ती लक्षांत ठेवण्यासारखी आहे : ती म्हणजे जॉर्ज फॉक्सनें आपल्या यात्रेसाठीं शिवलेला कातडी सूट. तो क्वेकर पंथाचा आद्य संस्थापक होता. त्याचा धंदा चांभाराचा होता. या विश्वाची दैवी कल्पना ज्यांना आविर्भूत होते अशांपैकीं तो एक होता. कांहींना या विश्वाची दिव्यता अधिक उदात्त स्वरूपांत दिसते, कांहींना जरा कमी उदात्त स्वरूपांत दिसते, तर कोणाकोणाला अधिक विशुध्द स्वरूपांत दिसते. तें कांहींहि असो, जॉर्ज त्यांपैकीं एक होता. ज्यांच्यासमोर विश्वाचें सत्यस्वरूप आविर्भूत होतें, त्यांना प्रॉपेच्ट्स, पैगंबर वा ईश्वरी वृत्तीनें रंगलेले अवलिये असें म्हणतात. जॉर्ज फॉक्सचें लीस्टरशायरमधलें चांभाराचें दुकान पोपांच्या प्रासादांपेक्षांहि अधिक पवित्र होतें. ''हे थोर जॉर्ज फॉक्स, शीव, तुझा तो कातड्याचा सूट शीव. त्या कोटाला जो जो टांका तूं घालीत जाशील, तो तो गुलामगिरीच्या हृदयालाच जाऊन बोंचेल, धनपूजा व ऐहिकाची पूजा यांच्या हृदयांत घुसेल. तुझें हें काम संपलें म्हणजे युरोपांत एक मुक्त पुरुष दिसेल, एक खरा स्वतंत्र पुरुष दिसेल आणि तो म्हणजे तूंच.''

कातड्याच्या सुटांतील या शांतिदूताला कधीं कधीं शेतांतील गवताच्या गंजीजवळ निजावें लागे. तुरुंगांतल्या थंडगार जमिनीवर, दमट व ओलसर जागेंत कित्येक वर्षे त्याला सक्तीनें निजावयाला लावण्यांत आलें ! असा हा जॉर्ज फॉक्स जगांतील अत्यंत आश्चर्यकारक अशा सैन्याचा *पति होता. शांतीसाठीं झगडणारी-अहिंसेनें लढणारी-सेना !

जॉर्ज फॉक्सच्या काळांतले क्वेकर म्हणजे स्वातंत्र्यार्थ लढणारे वीर-शिरोमणी होत. हे सवा्रंत शूर असे स्वातंत्र्य-सैनिक धर्म-प्रांतांतले अराजकवादी होते-धर्माच्या बाबतींत ते कोणाचीहि सत्ता मानीत नसत. सतराव्या शतकांतल्या या अहिंसक प्रतिकारकांनीं शत्रूच्या रक्ताचा एकहि थेंब न सांडतां दीर्घकालपर्यंत लढाई चालविली व अखेर या शांततावीरांनीं विजय मिळविला.

- २ -

जॉर्ज फॉक्स प्रचारार्थ बाहेर पडल्याला आता सहा वर्षे झालीं होती. या सहा वर्षांत त्याला साठ निष्ठावंत स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले. ख्रिश्चनांना खरा धर्म देण्यासाठीं त्याचा प्रचार सारखा सुरू होता. दोनच वर्षांत साठाचें पन्नास हजार अनुयायी झाले. तें आपणांस 'प्रकाशबाळें' किंवा 'मित्रसंघ' म्हणवीत; पण पुढें त्यांना क्वेकर हें नांव मिळालें. एका विरोधकानें म्हटलें, ''प्रभूचें नांव उच्चारतांच कांपू लागावें असें हा आपल्या अनुयायांना सांगतो.'' क्वेक होतो अर्थात् कांपतो तो क्वेकर.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel