- ३ -

पेट्रार्कचें नवयुग म्हणजे शाब्दिक क्रांति होती. त्यानें रोमन वाङ्मय उजेडांत आणलें व त्याच्या अनुयायांनी ग्रीक साहित्य उजेडांत आणलें. चिनी लोकांची छापण्याची कला युरोपांत वाढली होती. जर्मनींत गुटेम्बर्ग व हॉलंडमध्यें कोस्टर यांनीं या कलेंत शोध लावले. पुस्तकें छापलीं जाऊं लागलीं, मृत भूतकाळ सजीव होऊं लागला, पुस्तकांचा प्रसार होऊं लागल्यामुळें ज्ञान बहुजनसमाजांत जाऊं लागलें. युरोपला आपल्या थोर साहित्यिक वारशाची जाणीव झाली. मध्ययुग रानटी युध्दांत गुंतलेलें होतें. युध्दांत गुंतलेल्या जगाला वाचण्याची सात्त्विक व सांस्कृतिक करमणूक लाभली. तरवार बाजूस ठेवून पुस्तक हातांत घ्यावयास मानवजात प्रथमच शिकत होती.

नवयुगाची ही पहिली स्थिती. अज्ञानाविरुध्द बंड ही नवयुगांतील पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी स्थिती म्हणजे असहिष्णुतेविरुध्द बंड. येथें शब्दांशीं तितकेंसें काम नसून प्रत्यक्ष कृतीशीं काम होतें. मध्ययुगांतील असहिष्णु धर्मवेडेपणाविरुध्द  बंड उभारणार्‍यांमधील अग्रेसर वीर म्हणून जोहान्स हस याचा गौरव केला पाहिजे.

हस हा बोहेमियन होता. तो प्रेगच्या विद्यापीठांत प्राध्यापक होता. त्याला चर्चचे ठरीव विधिनिषेध पसंत पडेनात. बायबलमधील शब्दन् शब्द तो विश्वसार्ह मानीत नसे. त्याचा ख्रिस्ताच्या शिकवणीवर विश्वास होता; पण बायबलमधील चमत्कारांचा कांही उपयोग नाहीं असें तों म्हणे. तो भटांभिक्षुकांच्याविरुध्द होता. मधल्या उपाध्यायांच्या लुडबुडीशिवायहि ईश्वर भक्तांच्या प्रार्थना समजूं शकतो असें तो म्हणे. पोपांच्या थाटमाटावर तद्वतच चर्चच्या उध्दटपणावर व धर्मान्धतेवर तो टीका करी. तो जॉन वुइक्लिफचा मित्र व अनुयायी होता. जॉन वुइक्लिफनें लॅटिनमधील बायबलचें इंग्रजींत भाषान्तर केलें होतें. चर्चनें सांगितलेला अर्थ डोळे मिटून ऐकण्याऐवजीं जनतेनें बायबल स्वत: वाचून पाहावें म्हणून त्यानें त्याचा इंग्रजींत अनुवाद केला होता. पददलितांच्या हक्कांसाठीं तो झगडे. त्या काळांत युरोपांतील भूमीपैकीं तिसरा हिस्सा जमीन चर्चच्या मालकीची होती. ही सारी जमीन शेतकर्‍यांस परत दिली जावी असें हस म्हणे. आद्य ख्रिश्चन लोकांतले बंधुभाव व साम्यवाद पुन: येऊं देत असें तो उपदेशी. थोडक्यांत बोलावयाचे तर जोहान्स हस यथार्थपणें ख्रिश्चन होऊं पाहत होता. यामुळें संघटित चर्च त्याला शत्रु मानूं लागलें व चर्चचे अधिकारी त्याला पाण्यांत पाहूं लागले.

इ.स. १४१२ मध्यें आर्चबिशपनें जॉन वुइक्लिफचीं दोनशें पुस्तकें जाळून टाकलीं व हसला धर्मबाह्य केलें. त्यानें सारें प्रेग शहरच जणूं कायदेबाह्य ठरविलें. पण हस डगमगला नाहीं. आपलें काम हातीं घेऊन तो पुढें जात होता. त्या वेळीं रोमन कॅथॉलिक चर्चचे दोन पोप असत. एक रोम येथे व दुसरा अ‍ॅव्हिगनॉन येथें. कॅथॉलिक धर्माला दुहीचा रोग मधूनमधून जडत असे, तसाच रोग या वेळेस जडला होता. असे तट पडल्यामुळें पृथ्वीवर ईश्वराचा एक प्रतिनिधि असण्याऐवजीं दोन प्रतिनिधी झाले. वेल्स लिहितो, ''प्रत्येक जण आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अनुयायांना शाप देई, त्यामुळें थोडक्यांत सांगावयाचें झाल्यास सारेच जणूं नरकाचे धनी झाले !''

इ.स. १४१५ मध्यें कॉन्स्टन्स येथें धर्मोपाध्यायांचा मेळावा जमला. चर्चमधली दुही मिटावी म्हणून ही परिषद् भरली होती. या परिषदेसाठीं हसलाहि आमंत्रण देण्यांत आलें होतें. ''तुम्ही या व पोप, सम्राट्, तेवीस कार्डिनल्स, तेहतीस आर्चबिशप व बिशप, दीडशें अ‍ॅबट व चर्चची सुधारणा करण्यासाठीं येणार असलेले शंभरांवर ड्यूक व राजेरजवाडे वगैरेंना आपलीं मतें समजावून सांगा'' असें हसला कळविण्यांत आलें होतें व ''तुम्ही याल तर तुमच्या सुरक्षिततेची हमी आम्ही घेतों'' असेंहि आश्वासन त्याला देण्यांत आलें होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel