पण दोघामध्यें कोमल व गाढ प्रेम होतें. त्यांचा पत्रव्यवहार प्रसिध्द आहे. दोघेंहि परस्परांना पत्रांत प्रथम परस्परांचें कुशल विचारतात. फॉक्सनें स्वत:साठीं एक गरम कोट विकत घ्यावा म्हणून त्याच्या पत्नीनें पाठविलेले पैसे एके दिवशीं त्याला मिळाले. पण त्या पैशांचें त्यानें एक नारिंगी रंगाचें कापड खरेदी करून त्याचा मार्गरेटकरतां एक लांब झगा शिवविला व म्हटलें, ''मला कोटाची जरुरी आहे, पण मार्गरेटला झग्याची अधिक जरुरी आहे.''  कधीं कधीं तो थकल्यासारखा दिसे तेव्हां ती त्याला म्हणावयाची, ''पुरे आतां हिंडणें-फिरणें. स्वार्थमूरला घरीं येऊन राहा. विश्रांती घे.''  पण दूर करावयाला अन्याय शिल्लक असेपर्यंत फॉक्सला विसांवा कोठला ? अमेरिकेंत क्वेकराचा छळ होत असल्याचें फॉक्सच्या कानांवर येतांच इंडस्ट्री नांवाच्या एका फुटक्या जहाजांत बसून तो अमेरिकेंत जावयास निघाला. खलाशी व उतारू गलबतांतील पाणी पंप करून सारखें बाहेर काढीत होते. गलबत बुडूं नये म्हणून हा जलोत्सर्गप्रकार रात्रंदिवस सुरू असे.

वारा व पाणी यांपासून धोका होता तसाच समुद्रावरच्या चांच्यांपासूनहि हाता. पुष्कळ दिवस बार्बरी येथील चांचे त्याच्या गलबताचा पाठलाग करीत होते. पण इंडस्ट्री कशी तरी निभावली व साठ दिवसानंतर ब्रिटिश वेस्ट इंडीजमधील बारबुडा येथें येऊन लागली.

प्रवासांत फॉक्सला संधिवात व ताप यांचा आजार जडला. अमेरिकेंत उतरल्यावरहि या रोगानें तो आजारी होताच; पण तो शारीरिक दु:खांकडे लक्ष देत नसे. आजारीपण त्याला एक किरकोळ बाब वाटत असे. तो आपलें काम सारखें करी, पण शेवटीं गळून जाई. गलबतांतून उतरतांच त्यानें वेस्ट इंडीजमधल्या क्वेकर-संस्थेंत व्यवस्थितपणा आणला. त्यानें नीग्रो गुलामांना स्वातंत्र्य दिल्याचेयं जाहीर केलें. १६७१ मध्यें जॉर्ज फॉक्सचें म्हणणें जर अमेरिका ऐकती तर अमेरिकेंत १८६१ सालीं अमेरिकेमधील आपसांतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठीं जें युध्द झालें तें झालेंच नसतें. वेस्ट इंडीज बेटांतून तो अमेरिकेंत गेला.

अमेरिकन वसाहतींत त्याच्या येण्याची फार अवश्यकता होती. ह्या नवीन खंडांत जणूं प्रॉटेस्टंटांचीच सत्ता होती. हें खंड प्रॉटेस्टंटांना निर्धोक करता करतां क्वेकरांना मात्र तें धोक्याचें झालें. मॅसाच्युसेट्स् वसाहतीचा गव्हर्नर एन्डिकॉट याच्या परवानगीशिवाय चार क्वेकरांनीं बोस्टन येथें पाऊल टाकलें म्हणून त्यांना पचंशीं देण्यांत आलें. त्याचीं नांवें वुइल्यम रॉबिन्सन, मार्मड्यूक रॉबिन्सन, वुइल्यम लेड्रा व मेरी डायर. याच बोस्टर शहरांत क्वेकरांना दूध देणार्‍यांना तुरुंगांत टाकण्यांत आलें होतें. डोव्हर गांवीं तीन क्वेकर बायांना गाडीपाठीमागें बांधून बर्फातून ओढीत-फरफटत नेण्याची सजा देण्यांत आली होती. आणखी नऊ गांवांनाहि अशीच शिक्षा फर्मावण्यांत आली होती.  ''या भटक्या क्वेकरांना पकडा. .....त्यांच्या पाठीवर दहादहा फटके मारा'' असे हुकूम त्या शहराच्या कॉन्टेबलांना सुटले होते. या हुकुमांवर राइट ऑनरेबल रिचर्ड वाल्डेन याची सही होती. अमलबजावणी करण्याचें काम रेव्हरेंड रेनॉर याच्याकडे होतें. एका गांवच्या पोलिसांनीं फटके मारून त्यांना पुढच्या गांवच्या पोलिसांच्या ताब्यांत द्यावयाचें व आपल्या वसाहतींतून त्यांची पीडा घालवून द्यावयाची.

अमेरिकनांतील प्यूरिटनांचीं हृदये विरघळविण्याचे कामीं फॉक्सला फारसें यश आलें नाहीं; पण क्वेकराची हृदयेयं मजबूत व अविकंप करण्यांत त्याला यश लाभलें. 'बलवंतांसमोर निर्भय राहा व दुबळ्यांबरोबर दयेनें वागा' असें त्यानें आपल्या अनुयायांच्या मनांवर अत्यंत उत्कृष्टपणें बिंबविलें. क्वेकर शरण गेल्याचें उदाहरण इतिहासांत नाहीं. त्याचप्रमाणें शरण येण्यासाठीं त्यांनींहि कोणावर कधीं सक्ती केली नाहीं. पेनसिल्व्हानियांत क्वेकरांचें प्रभुत्व पाऊणशें वर्ष होतें, पण तेवढ्या काळांत क्वेकरांकडून एकहि इंडियन कधीं फसविला गेला नाहीं कीं कत्तल केला गेला नाहीं.

- ६ -

फॉक्स अमेरिकेंतून परत आल्यावर धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत इंग्लंडमध्यें फिरत राहिला. जगांत सर्वत्र शांतीचें साम्राज्य स्थापा असें तो शिकवीत असे. मरणाआधीं चार वर्षे म्हणजे १६८७ सालीं त्याच्या प्रयत्नांस निम्में यश आलें. दुसर्‍या जेम्सनें धर्माच्या बाबतींत भाषण-स्वातंत्र्य व विचार-स्वातंत्र्य देणारा कायदा पास केला. पण जागतिक शांततेची उरलेली निम्मी लढाई हळूहळू तथापि निश्चितपणें जिंकली जात होती. इतिहासांत आपणांस प्रथमच युध्दंचीं जरा लाज वाटूं लागली आहे-लष्करी हडेलहपपांवरची श्रध्द कमी होत चालली आहे.

लवकरच एक दिवस असा उजाडेल कीं जेव्हां लीस्टरशायरमधील हा अशिक्षित चर्मकार मानवजातीच्या थोर शिक्षकांपैकीं एक म्हणून सर्वत्र गौरविला जाईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel