ही कथा जरा काल्पनिक वाटते.  ज्याची जन्मकथा अशा असंभाव्य गोष्टींत गुरफटलेली आहे असा मूसा हा इतिहासांतील पहिलाच मनुष्य नव्हे.  सुमेरियन लोकांचा राजा पहिला सारगान हा सुध्दां नदींतील एका नावेंत आढळला अशी गोष्ट आहे.  राजघराण्यांतील अविवाहित स्त्रिया आपल्या मुलांची जन्मकथा अशा चमत्कारांनींच सांगत असत.  जणूं ती पध्दत पडून गेली होती.

गोष्ट बहुधा अशी असावी, कीं ज्यु पुरुषापासून इजिप्शियन राजकन्येला हा बाळ झाला असावा.  मूसाचा हा असा आकस्मिक जन्म झाला.  इजिप्शियन व ज्यू दोघांनाहि या बाळाची जन्मकथा लपविण्याची इच्छा असणें स्वाभाविक होतें.  म्हणून जुन्या करारांत अशी ही कल्पनारंजित कथा सांगितली गेली.

परंतु हा सारा तर्क आहे.  कांहीं असो.  मूसाचे आईबाप कोण होते हा प्रश्न कांहीं महत्त्वाचा नाहीं.  त्याच्या अंगात ज्यू रक्त होते ही गोष्ट खरी.  इजिप्शियन राजपुत्राप्रमाणें तो वाढविला गेला हेंहि खरें.  या दोन बाबतींत एकमेळ आहे.  त्याचें मूसा हे नांवहि इजिप्शियन आहे.  मूसा या शब्दाचा अर्थ 'अमक्या अमक्याचा मुलगा' असा आहे.  मूसाचा स्वभावहि अगदीं ज्यू होता.

मूसाच्या बाल्याची फारशी माहिती नाहीं.  धर्मोपदेशकाचें शिक्षण त्याला देण्यांत आलें होतें.  लहान वयांतच थोर राजा अखनटन याच्या शिकवणीशीं त्याचा परिचय झाला.  अखनटन हा इजिप्तचा शहाणा राजा.  एकेश्वरीमताचा त्यानें शोध लावला होता.  लोक त्याला वेडा मानीत.

मूसा वयानें मोठा झाला.  हेलिमोपॉलिस (म्हणजे सूर्याचें शहर) येथील धर्ममंदिरांत शिक्षणार्थ तो जाई.  तो दाढीमिशा काढी.  चेंडूचे खेळ खेळे.  विद्यार्थ्यांच्या मंडळांत भाग घेई.  तो लौकरच एक मातबर इजिप्शियन सरदार झाला असता.  मेल्यावर सुंदरशा ममींत (शवपेटिकेंत) त्याचा देह मसाल्यांत घालून ठेवला गेला असता.  परंतु मूसा बंडखोर होता.  तो ज्यू होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel