प्रकरण ७ वे
ऑर्लीन्स येथील कुमारी जोन ऑफ आर्क : फ्रान्सची माता

- १ -

विशुध्द करणारे नवयुगाचे वारे जरी अशा रीतीनें वाहूं लागले तरी अद्यापि मध्ययुगांतील दुष्टतेचें भूत पश्चिम युरोपच्या मानगुटीस बसलेंच होतें. हे वारे आले तरी हें दुष्ट धुकें पश्चिम युरोपच्या मूखमण्डलास आच्छादून राहिलेंच होतें. पंधराव्या शतकभर फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, बोहेमिया, इत्यादि देशांत हजारों स्त्रीपुरुषांत जिवंत जाळण्यांत येत होतें. मानवी चरबी सर्वत्र जळत होती व तिची घाण चोहोंकडे भरून राहिली होती. धर्मान्त आचार्यांना टीकेचें तोंड बंद करण्याचा फारच सोपा उपाय सांपडला होता. तो म्हणजे टीकाकारांना ठार मारण्याचा. जे जे चर्चशीं सहमत नसत अगर ज्यांची ज्यांची संपत्ति पाहून पोप प्रभृतींचा स्वार्थ जागृत होई, त्या सार्‍यांना जिवंत जाळून त्यांची धनदौलत जप्त करण्यांत येईल !

चर्चशी सहमत नसणारे तेवढेच नव्हेत तर राजकीय गुन्हेगारहि नास्तिक म्हणून जाळण्यांत येत असत. पोप व राजे हातांत हात घालून जात होते. राजाला धर्माचा व धर्माला राजाचा पाठिंबा असे. राजाविरुध्द वर्तन ईश्वराविरुध्दच समजण्यांत येई. जणूं ईश्वरच राजांना अभिषेक करतो असें मानण्यांत येत असे. चर्चनें मान्यता दिलेल्या शासनसंस्थेस विरोध करणें हें देहान्त शिक्षेचा गुन्हा करण्यासारखें गणण्यांत येई. हा गुन्हा केवळ शासनसंस्थेविरुध्दच नसे, तर चर्चच्याहि विरुध्द असे. जोन ऑफ आर्कची जीवितकथा समजून घेण्यासाठीं चर्च व स्टेट यांच्यातील हें परमैक्य लक्षांत ठेवणें आवश्यक आहे. चर्चचे अधिकारी ज्याला धार्मिक गुन्हा समजत. तो हातून घडल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणें धार्मिक गुन्ह्याच्या सदराखालीं तिचा खटला चालणें क्रमप्राप्तच होतें व नास्तिक म्हणून तिला जाळण्यांत येणार हेंहि ठरलेलेंच होतें. आजच्या चिकित्सक मनाला जोन ऑफ आर्कचें सारें जीवन विश्वासार्ह वाटत नाहीं; पण पंधराव्या शतकांतल्या भोळ्या श्रध्दाळू मनाला तिचें जीवन विचित्र वाटत नसे आणि तत्कालीन परिस्थितींत तिला ज्या प्रकारचें मरण आलें त्या प्रकारचेंच येणें साहजिक होतें.

- २ -

मध्ययुगांत प्रत्येक जण देवदूतांशीं बोले, प्रत्येकाचा चमत्कारांवर विश्वास असे. पॅरिसमध्यें रिचर्ड नांवाचा कोणी एक साधु होता तो आपणास स्वर्गाचा प्रत्यक्ष आवाज ऐकूं येतो व आपणास देवाच्या इच्छेचा अर्थ समजतो असें म्हणे. त्यानें सार्‍या पॅरिस शहराला वेड लावलें. श्रध्दाळू धर्मभावनांना वाटे कीं, पॅरिसमध्यें त्यानें जणूं समुद्रच उंच बनविला ! दुसरा एक कार्थेलाइट पंथी थॉमस कॉनेटा नांवाचा साधु होता तो स्वर्गांतील देवदूतांनीं आपणास धर्माची किल्ली दिली आहे असें म्हणे. फ्रान्समध्यें व बेल्जममध्यें त्याच्या प्रवचनांस पंधरा ते वीस हजारपर्यंत श्रोते जमत. ब्रिटनीमधली पिएरेटी नामक एक स्त्री आपल्या बंधुभगिनींस म्हणे, ''मी नेहमीं ख्रिस्ताशीं बोलत असतें.'' एका फ्रेंच धनगराचा एक मुलगा होता, त्याच्या अंगातून रक्ताचा घाम बाहेर येई असें सांगत. ज्यांच्या अंगांत येतें असे स्त्रीपुरुष प्रत्येक प्रान्तांत असत. आपण स्वर्गांतील आत्म्यांशी सदैव बोलतो असें हे स्त्रीपुरुष मानीत व इतरांना मानावयास लावीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel