- २ -

इतिहासपूर्व काळीं युरोपची व आशियाची हवा आजच्यापेक्षां बरीच उष्ण होती ; अधिक उबदार होती.  आपले केसाळ पूर्वज रानावनांतून भटकत ; कंदमुळांवर, पानाफळांवर रहात. मिळालेंच कधीं तर कच्चें मांस खात.  त्याचें हाडपेर बळकट होतें, परंतु पाय जरा वांकलेले होते.  त्यांना तितकें नीट ताठ उभें रहातां येत नसे.  जरा बुटबैंगण असे ते होते.  आजच्या स्त्री-पुरुषांपेक्षां ते आकारानें बरेच लहान होते.  विस्तवाचा शोध अद्याप त्यांना लागला नव्हता.  त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतें.  त्यांची भाषाहि नीटशी नव्हती.  निरनिराळे आवाज व आरोळ्या यांनीं मनांतील भाव ते एकमेकांस दाखवीत.  भूक लागली म्हणजे ते कधीं कधीं एकटे किंवा कधीं दोघेतिघे असे भक्ष्याच्या शोधार्थ निघत.  भूक शांत झाली म्हणजे एकाद्या वृक्षाच्या किंवा दगडाच्या छायेंत पाय पोटांत घेऊन ते बसत.  पुन्हा भूक लागली किंवा शत्रूच आला, एकादा अधिक बलवान् प्राणी आला तरच ते मग उठत.

अशा रीतीनें दहा लक्ष पिढ्या गेल्या ; आणि एके दिवशीं आपल्या या आलस्यमय जीवनांतून ते खडबडून जागे झाले.  डोंगरांतून, पहाडांतून अपरिचित प्राणी धांवत आले ; भीतीनें आरोळ्या मारीत, किंचाळ्या फोडीत ते आले.  ज्या दिशेनें ते आले त्या दिशेकडे ते भीतीनें पहात होते.  काय दिसत होतें तिकडे ?  दूर भुरेंभुरें असें कांहींतरी दिसत होतें.  एकाद्या प्रचंड अक्राळ-विक्राळ जिवंत प्राण्याप्रमाणें ती वस्तु हळूहळू पुढें येत होती.  हवा अति गारगार वाटूं लागली.  सर्वांना अस्वस्थ वाटूं लागलें.  आकाश काळेंकाळें झालें.  आणि आकाशांतून पृथ्वीवर बारीकबारीक तुकड्यांची प्रचंड वृष्टि होऊं लागली, आणि आकाशांतील त्या हिमशलाका उघड्या शरीरांवर पडूं लागल्यावर काय दुर्दशा झाली असेल तिची कल्पना करा ! सारें शरीर जसें बधिर झालें.  दांतखिळ्या बसल्या.  एक प्रकारचें तीव्र व अननुभूत असें दु:ख होऊं लागलें.  ती पहिल्या हिमतापाची वेळ होती.

त्या येणार्‍या हिमवृष्टीपासून ते लोक पळाले.  परंतु कितीतरी जणास भरभर पळतां येईना.  पुष्कळ जण थंडीनें गारठून मेले.  जे दूर गेले व वांचले, त्यांनीं खोल गुहांमध्यें आश्रय घेतला.  ऊब मिळावी म्हणून व संरक्षण व्हावें म्हणून सारे एकमेकांस खेंटून, जसे कांहीं चिकटून बसले.  आपल्या त्या वानरसदृश पूर्वजांना सामाजिक जाणिवेची ती पहिली प्रभा त्या वेळेस मिळाली.  सामाजिक-सामुदायिक जाणिवेची ती पहिली अंधुक उषा होती.  मानवतेच्या उंबरठ्यावर प्रथमच ते चढत होते-पहिलें पाऊल टाकीत होते.

जरूर पडली, आणि अन्नासाठीं म्हणून ज्या प्राण्यांना ते मारीत त्यांची कांतडीं सोलून काढून त्यांनीं तीं स्वत:च्या अंगाभोंवतीं गुंडाळलीं.  थंडीपासून बचाव करणें जरूर होतें.  आणि पुढें विस्तवाचा शोध त्यांनीं लाविला.  दोन काष्ठें एकावर एक घांसून ठिणगी पडते हें त्यांनीं पाहिलें.  थंडीपासून रक्षण करून घेण्यासाठीं हें चांगलेंच साधन मिळालें.  तसेंच स्वत:चें रक्षण व्हावें म्हणून गुहांत शिरून बसलेल्या इतर क्रूर पशूंपासूनहि या विस्तवाच्या शोधामुळें स्वत:चा बचाव त्यांना करतां येऊं लागला.  हा विस्तवाचा शोध हिमपातानंतर कितीतरी हजार वर्षांनी त्यांना लागला.  जवळजवळ पन्नास हजार वर्षांपूर्वी हा विस्तवाचा शोध लागला असावा.  १८ व्या शतकांतील विजेचा शोध जितका महत्त्वाचा, तितकाच महत्त्वाचा हा प्राचीन अग्निशोध होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel