तो आपल्या मन:श्चक्षूंसमोर स्वप्नसृष्टींत ते शेतकरी पाहतो. त्यांची ती दुर्दशा व त्यांचें तें भिकारडें जीवनच त्याला दिसतात असे नव्हें, तर त्या शेतकर्‍यांतील प्रेमळपणाहि त्याला दिसतो. किती सुंदर व साधें तें जीवन ! शेतकर्‍यांतील जें जें चांगलें, तें तें त्याच्या दृष्टीस दिसतें. त्या शेतकर्‍यांच्या अज्ञानाची, आळसाची, हट्टीपणाची, दंभाची व अविश्वासाची तो त्यांना क्षमा करतो; कारण, तो आतां त्यांच्याकडे पाहत नसून त्यांच्या आंत पाहतो, जणूं त्यांच्या जीवनांत, हृदयांत शिरतो. त्यांच्या हालअपेष्टा, त्याची अनंत सहनशक्ति, त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह, जें जें नशिबी असेल तें तें जीवनांत शांतपणें स्वीकारणें, मृत्यूसमोरहि धैयानें व शांतपणें उभें राहणें, हें सारें आतां त्याला दिसूं लागतें. तो गुणगुणतो, ''खरोखरच सुंदर आहे हें शेतकर्‍यांचें सरळ, निर्दोष व निष्पाप जीवन ! किती साधें व किती गोड !! किती सेवामय व किती कर्ममय !!! त्यानें देऊं केलेली मदत ते नाकारीत, त्यामुळें त्याला वाईट वाटे. पण आतां त्याला सारें समजूं लागलें व समजूं लागल्यामुळें त्याला सहानुभूतीहि वाटूं लागली. कारण, ते सारे भाऊच होते. तो व ते शतकरी एकरूफा होते. एकाच हाडामांसाचे, एकाच रक्ताचे, निर्दय भवितव्यतेच्या प्रहाराखालीं जगणारे, श्रमणारे, मरणारे असेच ते सारे अगतिक जीव नव्हते का ? भवितव्यताच मालक, तीच जमीनदार ! हें दैव सर्वांना नाचवीत आहे, रडवीत आहे, नष्ट करीत आहे. सारेंच दैवाच्या हातीं ! सारेच दैवाचे दास !!

- २ -

१८५१ सालीं टॉल्स्टॉय पैसे उधळून बसला होता. सावकारांचा ससेमिरा चुकविण्यासाठीं तो कॉकेशसमध्यें पळून गेला व सैन्यांत दाखल झाला. त्याचा भाऊ आधींच तेथें अमलदार झाला होता. एकोणिसाव्या वर्षी तो आत्महत्या करूं इच्छीत होता. पण आतां तेविसाव्या वर्षी तो जीवनावर पूर्ण भरंवसा ठेवणारा झाला होता. तो जीवनाला मिठी मारून बसला होता. तात्विक संशय-पिशाच्चें त्यानें पिटाळून लावलीं. मानगुटीला बसणारी पापाची भीति त्यानें झुगारून दिली. तो पुन: एकदां गूढवादांत व सुंदर स्त्रियांत रमूं लागला. तरुण फॉस्टप्रमाणें तो जगांत वावरूं लागतो, जगाला नाकारण्याऐवजीं त्याचें स्वागत करतो. हें जग एकंदरीत बरें व करमणूक करणारें खेळणें आहे असें त्याला वाटूं लागतें. सुखात भर घालणारा प्रत्येक अनुभव त्याला चांगला वाटूं लागतो. आपल्या 'कोसॅक्स्' या कादंबरींत तो लिहितो, ''कांहींहि वाईट नसते. एकाद्या सुंदर मुलीच्यासंगतींत करमणूक करून घेण्यांत काय पाप आहे ? उलट, तें आरोग्याचें व निकोप आणि निरोगी प्रकृतीचेंच लक्षण होय.''

पर्वतांच्या सौंदर्यांत तो रंगला, तन्मय झाला. तो लढला व जुगार खेळला. त्यानें प्रेमप्रकारहि केले आणि अत्यंत काव्यमय पण यथार्थदर्शन घडविणार्‍या अप्रतिम कादंबर्‍या त्यानें लिहिल्या. त्यानें नानाविध वाङ्मय निर्माण केलें-बाल्यांतील गोष्टी, मुलांच्या गोष्टी, युध्दांतील कथा, कॉसॅक्स लोकांवरील कादंबर्‍या, निबंध, पत्रें असा प्रचंड वाङ्मयप्रवाह त्याच्या बहुप्रसव, प्रतापी व प्रतिभासंपन्न लेखणींतून जोरानें व भव्यतेनें वाहूं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel