प्रकरण ९ वें
अमेरिका न शोधणारा कोलंबस
- १ -

१४४२ च्या जुलै महिन्यांत ज्यू स्पेनमधून हांकलले गेले. त्याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यांत कोलंबसानें अमेरिका शोधून काढली; पण शोधून काढली असें म्हणण्याऐवजीं त्यानें पुन: शोधून काढली असें म्हणणें अधिक यथार्थ होईल. कारण, पांचशें वर्षांपूर्वीच अमेरिका लीफ एरिक्सन यानें शोधून काढली होती. तो मोठा धाडसी दर्यावर्दी होता. (Viking Captain होता.)  ज्याला आज आपण नोव्हास्कोशिया म्हणतो त्यांच्या किनार्‍यावर त्याचें गलबत वादळानें जाऊन लागलें होतें. त्या देशांत खूप द्राक्षें आढळल्यामुळे त्यानें त्याला व्हाईनलँड असें नांव दिलें. तो तेथें सर्व हिंवाळाभर राहिला. परत घरीं आल्यावर त्यानें आइसलंडमधील कांही पिल्ग्रिम-फादरांना अमेरिकेंत जाण्यास आग्रहानें सांगितलें. इ.स. १००३ मधील ही गोष्ट. ही वसाहत वसविली गेली; पण येथील इंडियन लोकांच्या वैरभावामुळें ती मोडली. आणि हे भटक्ये यात्रेकरू (Vikings) पुन: स्वदेशीं परत आले. नॉर्समन लोकांच्या प्राचीन बखरींतून लीफ व हे दर्यावर्दी लोक यांचे हे पराक्रम वर्णिले आहेत.

तरुणपणीं कोलंबस आइसलंडमध्यें गेला होता. पेरू देशचे प्रोफेसर लुई उल्लोआ म्हणतात कीं, ''कोलंबस त्या वेळीं ग्रीनलंडपर्यंत गेला होता. अमेरिकेच्या जमिनीवरहि त्यानें त्या वेळीं पाय ठेवले असावे. या त्याच्या जलपर्यटनाचा उद्देश केवळ चांचेगिरी हा होता. प्रोफेसरसाहेबांचा हा अंदाज बरोबर असेल तर कोलंबसाची १४९२ मधली ती सुप्रसिध्द अमेरिकन सफर पहिली नसून दुसरी असली पाहिजे.

पण हा सारा तर्क आहे. कारण, कां कोणास माहीत, पण कोलंबस स्वत:च्या पूर्वचरित्राविषयीं फारसें कधीं सांगत नसे. म्हणून त्याच्या पूर्वचरित्रांतील रिकामे भाग भरून काढण्यासाठीं अनेक दंतकथा निर्मिल्या गेल्या. इतिहासकारांनीं कोलंबसाविषयीं लिहिलेलें सर्व जर आपण खरें मानूं लागलो तर निरनिराळ्या प्रकारचे शंभर तरी परस्परविरोधी कोलंबस आपणांस पाहावे लागतील ! त्याचा जन्म अनेक शहरीं करावा लागेल, त्याला ज्यू, स्पॅनियर्ड, इटॅलियन म्हणावें लागेल; कधीं त्याला विद्वान् म्हणावें लागेल, तर कांहींच्या मतानुसार त्याला अगदीं 'ढ' म्हणावें लागेल; कोणीं म्हणतात कीं, तो सरदारपुत्र होता, तर कोणी म्हणतात तो एका खाणावळवाल्याचा मुलगा होता; कोणी त्याला ध्येयवादी मानतात, तर कोणी त्याला दांभिक म्हणतात; कोणी त्याला कवित्वहृदयाचा गूढवादी म्हणतात, तर कोणी त्याला भावना-शून्य धंदेवाला समजतात; कोणी त्याला देशभक्त म्हणतात, तर कोणी त्याला देशद्रोही म्हणतात; कोणी तो अत्यंत दारिद्र्यांत मेला असें म्हणतात, तर कोणी म्हणतात कीं मरणकालीं तो संपत्तींत लोळत होता ! कोणी त्याला उत्कृष्ट व कुशल नावाडी म्हणतात, तर कोणी म्हणतात कीं, त्याला नौकानयनविद्येचा गंधहि नव्हता !

स्वत:च्या आयुष्याच्या ज्या भागाविषयीं कोलंबस मौन पाळतो तो भाग आपणहि सोडून देऊं या. अज्ञात भूतकालाच्या धुक्यांतून पुढें आलेला असा तो आपणांस कोठें बरें दिसतो ? पोर्तुगाल देशाचा राजा दुसरा जॉन याच्याकडे गेला असतां. अटलांटिक महासागरामधून एक मोठी सफर योजावी व तिचा प्रमुख म्हणून आपणास नेमावें असें तो राजास सांगत होता. राजाचें मन तो अशा सफरीसाठीं वळवीत होता. त्या काळांत पोर्तुगीज लोक दर्यावर्दी म्हणून जगप्रसिध्द होते. व्हेनिसचे तसेच जिनोआचे व्यापारी जवळच्या भूमध्यसमुद्रांत व्यापार करीत असता पोर्तुगीज लोक अज्ञात व अगाध अशा अटलांटिक महासागरांत धाडसानें शिरत होते ! आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यानें तसेंच दूर मदीरा व कॅनरी बेटांपर्यंत ते जात. कांहीं धाडसी पोर्तुगीज दक्षिण अफ्रिकेस वळसा घालून हिंदुस्थानला पोंचूं पाहत होते. १४९३ मध्यें तुर्कांनीं कॉन्स्टँटिनोपल घेऊन युरोपचा आशियांतील अतिपूर्वेकडील देशांजवळचा खुष्कीचा मार्ग तोडून टाकल्यामुळें युरोपियन व्यापार्‍यांना जलमार्ग शोधून काढणें भाग झालें.

आणि या सुमारास तो अज्ञात साहसी ख्रिस्तोफर कोलंबस पुढें आला व म्हणाला, ''नीट पश्चिमेकडे जाऊन मी पूर्वेकडचा रस्ता शोधून काढतों. पृथ्वी वाटोळी आहे आणि ज्यांच्याविषयीं आपण इतकें ऐकतों ते पूर्वेकडचे राजे आपल्या पायांखालीं पाताळांत आहेत. मला जर माणसें व गलबतें मिळतील तर मार्को पालोनें स्वप्नांत सुध्दां कधीं पाहिली नसेल इतकी संपत्ति मी पोर्तुगालमध्यें आणीन. आणि पैशाहूनहि अधिक महत्त्वाची किंवा निदान तितक्याच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मी सार्‍या हिंदूंना पोर्तुगीज राजाच्या नांवानें ख्रिश्चन करीन.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel