- २ -

पण रोमन लोकांत सभ्यता, संस्कृति किंवा श्रीमंती नसली तरी ते महत्त्वाकांक्षी लढवय्ये होते.  ज्या वेळीं आर्य लोक उत्तरेकडून आल्प्स पर्वत ओलांडून खालीं आले त्या वेळेस त्यांच्यापैकीं येथें राहिलेल्या आर्य लाकांचे वंशज ते हे इटालियन.  हे इटालियन लोक जेव्हां त्या पायाच्या आकाराच्या भूभागांत गेले तेव्हां त्यांना तेथें आधींच येऊन राहिलेल्या दोन जाती आढळल्या.  रानटी आयबेरियन व सुसंस्कृत युट्रस्कन तेथें होते.  इटालियनांनीं आयबेरियनांचा नि:पात केला.  युट्रस्कर लोकांपासून ते रस्ते बांधणें, शिल्पकाम, वैद्यकी, औषधें, ज्योतिषशास्त्र, इ० नाना गोष्टी शिकले व मग त्यांनीं आयबेरियनांप्रमाणें त्यांचाहि नि:पात केला, त्यांचेहि उच्चाटन केलें.

हे इटालियन सारे एकजुटीनें लढत नव्हते.  त्यांचे निरनिराळे संघ होते.  ते एकमेकांपासून पृथक् राहून सर्वत्र लूटमार करीत व सर्व देशाला सळो कीं पळो करून सोडीत.  त्यांच्या जथ्यांपैकीं एक जथा तर फारच रानवट होता.  पळून गेलेले गुलाम, अतिशुद्र लोक व ठिकठिकाणचे परित्यक्त व बहिष्कृत लोक अशांचा तो जथा होता.  त्यांनीं टायबर नदीच्या मुखाजवळचा डोंगराळ प्रदेश जिंकून घेतला, त्याची तटबंदी केली व जे जे गुलाम पळून येत, चोर-दरोडेखोर न्याय चुकविण्यासाठीं आधार शोधीत जात, त्या सर्वांना तेथें आश्रय देण्यास सुरुवात केली.  अशा रीतीनें रोम शहर स्थापलें गेलें.

प्रथम त्यांच्या या वसाहतींत बायका नव्हत्या.  पण ज्या ज्या गोष्टीची जरुरी भासेल ती ती गोष्ट मिळवून घ्यावयाचीच असा रोमन लोकांचा बाणा होता.  जवळच्या सबाइन लोकांवर ते तुटून पडले व त्यांच्या बायकांपैकीं अत्यंत सुंदर व धट्ट्याकट्ट्या बायकांना घेऊन गेले.  त्या बायकाहि जावयाला फारशा नाखुष होत्या असें नाहीं.  विजयी रोमनांच्या बायका होण्यास त्या तयारच होत्या.  या आपल्या नव्या बायकांच्या मदतीनें त्यांनीं सबाइन लोकांशीं मैत्री केली व नंतर सारें इटालियन द्वीपकल्प पादाक्रांत करण्यासाठीं ते निघालें.

त्यांची प्रगति फार झपाट्यानें झाली नाहीं ; पण जेथें ते पाय रोंवीत तेथें ते तो भक्कम करीत.  त्यांचे लष्करी यंत्र हळूहळू पण निश्चितपणें शत्रूंस चिरडून टाकी व शरण यावयास लावी.  रोम शहराभोंवतालची शंभर मैल घेराची जागा जिंकून घ्यावयास त्यांना तीनशें वर्षे लागलीं.  पण एकदां तो प्रदेश जिंकून इटली ताब्यांत घेतल्यावर इटलींस कोणीहि त्यांच्याविरुध्द डोकें वर काढूं शकला नाहीं.  शस्त्रांनीं लढून ते जो जो नवीन प्रदेश मिळवती, तेथें तेथें ते लगेच रोमन वसाहत स्थापीत.  अशा रीतीनें रोमला अनुकूल अशा लोकांचे संबंध सर्वत्र पसरून सर्व इटली देश त्यांनीं आपल्या ताब्यांत ठेवला.

पण या बाहेरच्या विजयी मुलुखगिरीस घरच्या भांडणांमुळें मधूनमधून अडथळा येई.  रोमन लोकांसारखे आपणांस भांडणारे लोक जगाच्या इतिहासांत दुसरे क्वचितच दिसून येतील.  त्यांनीं प्रथम युट्रस्कन लोकांतील राजांचें शासन मान्य केलें ; पण हळूहळू त्यांना या राजांचा वीट आला व त्यांनीं निराळी शासनपध्दति सुरू केली.  दरसाल दोन पालनकर्ते निवडले जात.  तसेंच प्रतिष्ठित नागरिकांचें एक पार्लमेंट असे.  हे दोन पालनकर्ते या पार्लमेंटमधील प्रतिनिधींच्या सल्ल्यानें राज्यकारभार चालवीत.  या प्रतिष्ठित प्रतिनिधींना पॅट्रिशियन म्हणत.  ज्या गुलामांनीं व दरोडेखोरांनीं रोम स्थापिलें त्यांच्या वंशजांना पॅट्रिशियन किंवा वरच्या वर्गाचे लोक म्हणण्यांत येई.  हे इतर लोकांचे जणूं मायबापच !  जे गरीब व दरिद्री लोक असत त्यांना प्लीबियन म्हणण्यांत येत असे.  वरिष्ठ वर्गांच्या अहंमन्यतेमुळें व दुष्टतेमुळें हे सामान्य लोक शेवटीं बंड करून उठले.  त्यांनीं सार्वत्रिक संप पुकारला.  ते जवळच्या एका टेकडीवर गेले व तेथें प्रतिस्पर्धी असें दुसरें शहर उभारण्याची त्यांनी धमकी दिली.  रोमच्या दरवाजाजवळच असा एक प्रबळ शत्रु उत्पन्न झाला म्हणून प्रतिष्ठित पॅट्रिशियनांना भीति वाटली.  त्यांनीं प्लीबियनांना बोलावून त्यांनाहि राज्यकारभारांत भाग देण्याचें कबूल केलें.  तेव्हांपासून हे सामान्य लोकहि आपले प्रतिनिधीं पाठवूं लागले.  बहुजनसमाजाच्या या प्रतिनिधींना 'ट्रायब्यून्स' म्हणत.  अमुक एक कायदा आपल्या मतदारांच्या हिताविरुध्द आहे असें वाटलें तर ते तो कायदा नामंजूर करूं शकत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel