पण शिवाय मार्को तरुण, देखणा व गोड वाणीचा असल्यामुळें तो शंभर शहाण्यांची उणीव भरून काढील असें त्यांना वाटत होतें. मार्को कुब्लाईला चुकीच्या धर्मापासून परावृत्त करील अशी श्रध्दा, असा विश्वास त्यांना होता. पण त्या पोलोची ही समजूत म्हणजे हास्यास्पद अहंकारावांचून दुसरें काय होतें ? व्यापारांत यशस्वी होत असल्यामुळें आपण जे जें हातीं घेऊं त्यांत यशच मिळेलच असें त्यांना वाटे. मार्कोच्या मदतीनें आपण केवळ आपल्या पेट्याच सोन्याच्या नाण्यांनीं भरूं असें नव्हे तर स्वर्गहि कोट्यवधि चिनी ख्रिश्चनांनीं भरून टाकूं अशी अहंकारी आशा करीत ते येत होते.

साडेतीन वर्षे प्रवास करून ते चीनला पोंचले. कुब्लाईखानाच्या दरबारी ते सोळा वर्षे राहिले. त्यांनी लाखों रुपये मिळविले; पण एकाहि माणसास ख्रिश्चन करून स्वर्गांत पाठविण्याचें काम त्यांना करतां आले नाहीं. पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम तर कुब्लाईखानावर झालाच नाहीं, पण उलट कुब्लाईनेंच पौर्वात्य संस्कृतीचा खोल ठसा मार्कोवर उठविला. मार्को युरोपियन व ख्रिश्चन होता तरी, कुब्लाईनें त्याला एक बडा अधिकारी म्हणून नेमलें. तेराव्या शतकांतील चिनी आजच्या युरोपियनांपेक्षांहि उदार व विशाल दृष्टीचे होते. १९३५ सालीं एकाद्या कन्फ्यूशियस किंवा बौध्द धर्माच्या चिनी माणसाला इंग्लंडमध्यें महत्त्वाची सनदी नोकरी मिळणें कितपत संभवनीय वाटतें ? कल्पना करा.

मार्को पोलो व्हेनिसला परतला तेव्हां व्हेनिस व जिनोआ यांच्या दरम्यान चाललेल्या आरमारी लढाईत त्यानें भाग घेतला. ही लढाई १२९८ सालीं झाली. जिनोईजनीं मार्कोला कैद केलें. तुरुंगांत वेळ घालविण्यासाठीं व बरोबरच्या कैद्यांची करमणूक व्हावी म्हणून तो आपला पूर्वेकडील वृत्तांत रस्टिसिआनो नामक एका लेखकाला सांगून लिहवून घेऊं लागला. 'मार्को पोलोचें प्रवासवृत्त' या नांवानें रस्टिसिआनोनें तो वृत्तांत पुस्तकरूपानें प्रसिध्द केला. हें पुस्तक चौदाव्या शतकातील फार खपणार्‍या पुस्तकांपैकीं एक होतें. मार्को जरा अतिशयोक्ति करणारा होता. तो प्रवासी व्यापारी व हिंडताफिरता विक्रेता होता व असे लोक कसें बोलतात, काय काय गप्पा मारतात हें सर्वांस माहीतच आहे. लाखों हिरेमाणकें, लाखों मैल सुपीक जमीन, लाखों सोन्याचीं नाणीं, आश्चर्यकायक स्त्रीपुरुष, इत्यादि नानाविध गोष्टींविषयीं तो अतिशयोक्तिनें बोलतो व लिहितो. त्याच्या या अतिशयोक्तिपूर्ण लेखनपध्दतीमुळें लोक त्याला ''लाखोंनीं लिहिणारा मार्को, लक्षावधि मार्को'' असें थट्टेनें म्हणत. आधींच मार्कोची अतिशयोक्ति व तींत आणखी रस्टिसिआनोच्या अलंकारांची भर पडतांच अशी एक नवलपूर्ण कथा जन्मास आली कीं, ती वाचतांना आपण एकाद्या जादूगाराच्या सृष्टींत किंवा पर्‍यांच्या अथवा गंधर्वांच्या नगरींतच आहों असें वाटतें. पण ही अतिशयोक्ति व हे अलंकार वगळतांहि मार्को पोलोचें हें पुस्तक उत्कृष्ट आहे यांत शंकाच नाही. तें इतिहासांत नवयुग निर्माण करणारें आहे. स्वत:च्या संस्कृतीहून वेगळ्या दुसर्‍याहि संस्कृती आहेत, आपल्या देशाशिवाय दुसरे देशहि आहेत असें या ग्रंथानें युरोपियनांस शिकविलें व त्यांची दृष्टि या अन्य संस्कृतींकडे व देशांकडे वळविली. या पुस्तकानें मध्ययुगांतील झांपड पडलेल्या मनाला जागृत केलें. जागृत करणार्‍या अनेक कारणांपैकीं मार्को पोलोचें प्रवासवृत्त हें एक महत्त्वाचें कारण आहे. या ग्रंथामुळें मध्ययुगांतील युरापीय मनासमोरचें क्षितिज विस्तृत झालें व त्याला पूर्व व पश्चिम यांमध्यें विचारांची व वस्तूंची अधिक उत्साहानें देवघेव व्हावी व व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वाढावे असें आंतून वाटूं लागलें. जग अधिक मोठें झालें, जगाचा अधिक परिचय झाला, मानवजात अधिक जवळ आली, पूर्वेकडे जाण्यास अधिक सोपे व जवळचे रस्ते शोधून काढावे असें युरोपियनांस वाटूं लागलें व या प्रयत्नांतूनच अमेरिका त्यांना एकदम अचानक सांपडली.

युरोपियनांनीं चिनी लोकांची बंदुकीची दारू घेतली. चिनी लोकांनीं ती शोधून काढली, पण ती केवळ शोभेसाठीं व मुलांच्या खेळांसाठीं वापरली. युरोपियनांनीं ती युरोपांत नेली व तिजपासून मरणाचें प्रभावी साधन तयार करून तिचा युरोपीय युध्दांत प्रचार सुरू केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel