फ्रॅन्सिस तारुण्य ओलांडून पलीकडे जात होता.  त्या वेळीं त्याचें शहर इटलींतील दुसर्‍या एका शहराशीं युध्द करण्यांत गुंतलें होतें.  त्या काळांत अशीं युध्दें नेहमींच चालत.  पूर्वीचें रोमन साम्राज्य जाऊन त्याचीं अनेक लहानलहान स्वतंत्र संस्थानें झालीं होती.  ठायीं ठायीं तट व भिंती असलेल्या शहरांत राहून सरदार आजूबाजूच्या प्रदेशांवर राज्य करीत.  शेजारच्या राजांशीं अखंड युध्दें सुरू असत.  जगाचें एकीकरण तरवारीनें करणार्‍या रोमनांनीं स्वत:च्या राष्ट्राचे मात्र शत खंड केले ! त्यांच्या त्या मूर्खपणामुळें उद्भावलेल्या मोठमोठ्या युध्दांतून छोटीं छोटीं युध्दें पैदा झालीं.  पूर्वी एकजात घाऊक कत्तली होत ; आतां किरकोळ कत्तली होऊं लागल्या.  प्रत्येक शहर दुसर्‍या कोणत्या तरी शहराविरुध्द लढत होतें.  व्हेनिस फ्लॉरेन्सविरुध्द, फ्लॉरेन्स अ‍ॅसिसीविरुध्द, अ‍ॅसिसी पेरुगियाविरुध्द, पेरुगिया व्हेनिसविरुध्द अशी अखंड युध्दमालिका इटलीभर चालू होती.  सर्व युरोपभरच हा मारणमरणाचा प्रकार बोकाळला होता म्हणाना !  पहिल्या सीझरची महत्त्वाकांक्षा हजारों छोट्या सीझरांनीं उचललीं ; पण एकाजवळहि त्याची प्रतिभा नव्हती.  लहानलहान शहरांमधील कधीं न संपणार्‍या या यादवींत मध्ययुगांतील संस्कृति नष्टप्राय होत होती.

पेरुगिया व अ‍ॅसिसी यांमध्यें जेव्हां हें मूर्खपणाचें द्वंद्वयुध्द सुरू झालें, तेव्हां तरुण अ‍ॅसिसी भावनांनीं पेटून आपल्या शहरातर्फे स्वयंसेवक म्हणून नांव नोंदविता झाला. त्यानें आतांपर्यंत अनेक साहसाच्या पण शांततामय गोष्टी केल्या होत्या.  त्याला आतां जरा बदल हवा होता.  तो युध्दांतील चैतन्यमय अशीं तेजस्वी साहसें करावयाला, त्यांची चव घ्यावयाला उत्सुक झाला होता.  पण युध्दांतील हीं साहसें त्याला फार पसंत पडलीं नाहींत.  तो एका युध्दांत पकडला गेला व मध्यकाळांतल्या तुरुंगांचाहि अनुभव त्याला चाखावयाला मिळाला ; युध्दाइतका तेजोमय तो नसला तरी रानवट तर होताच.  तुरुंगवासामुळें त्याची युध्दोत्सुकता कायमची नष्ट झाली.

तुरुंगांतून घरीं आल्यावर तो फार आजारी पडला.  क्षणभर तर तो मरणारसें देखील भासलें ; पण शेवटीं तो वांचला.  तथपि तो अशक्त असल्यामुळें अंथरुणांत पडून राही.  पडल्या पडल्या तो जीवनाकडे एका नवीन दृष्टीनें पाहूं लागला.  या जगांत वायफळ बडबडच फार ; करणें थोडें, मचमच फार ! हें जग निरूपयोगी वस्तूंच्या पाठीमागें उगीचच धांवत असतें.  हे लोक क्षुद्र गोष्टींसाठी उगीचच भांडत वा लढत असतात.  असलें क्षुद्र जीवन अत:पर जगावयाचें नाहीं असा त्यानें निश्चय केला व मानवाला शोभेसें वैचारिक जीवन जगण्याचें ठरविलें.

बरा झाल्यावर त्यानें पुन: सैनिक होण्याचें नाकारलें.  त्याचे पूर्वीचें सारे मित्र एकामागून एक त्याला सोडून गेले.  ते त्याला भितुरडा, मागें मागें राहणारा, नेभळट म्हणून निंदींत ; पण त्यांचीं निंदा ऐकून तो शांतपणें स्मित करी.  त्याला ती निंदा जणूं मुकुटाप्रमाणें वाटे, दूषणें भूषणें वाटत.  तो दुसर्‍यांना पीडा देण्यास तयार नव्हता व म्हणून स्वत: कष्ट सोसण्यास सिध्द झाला.  हें एक नवीनच साहस होतें.  कष्ट सोसण्याचा हा नवीनच आनंद, नवाच अनुभव होता.  आजपर्यंतच्या सर्व साहसांपेक्षां दुसर्‍यास त्रास न देतां स्वत: हालअपेष्टा भोगण्याचें साहस त्याला अधिक रोमांचकारी वाटलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel