प्रकरण ६ वें
ज्यानें साम्राज्य मिळविलें पण संस्कृति विध्वंसिली असा सायरस
- १ -
ज्या राष्ट्रांनीं ज्ञान-देवांची, धर्म-प्रेषितांची थोर विभूति म्हणून, हेच खरे महावीर म्हणून, पूजा केली अशा राष्ट्रांचें आपण धांवते दर्शन घेतलें. आतां आपण अशा एका देशाकडे वळूं या, कीं जेथें योध्दा म्हणजेच परमश्रेष्ठ मनुष्य मानला जाई, जेथें विषय-लंपटता, पशुता व स्वार्थ हेच परमोच्च सद्गुण मानवी सद्गुण मानले जात. हिंदुस्थान व चीन यांना इतर आशियापासून अलग करणार्या पर्वतांना ओलांडून आपण पलीकडे जाऊं या. आपण पश्चिमेकडे जाऊं या. तें पहा इराणचें मैदान. आपण मागें पाहिले आहे, कीं कांही आर्यशाखा येथें वसाहती करून राहिल्या होत्या. या सर्व शाखांना मेडीज किंवा पर्शियन असें संबोधण्यांत येतें. हे अर्धवट जंगली, साहसी, रक्ततृषार्त असे लोक होते. पायांपासून डोक्यापर्यंत ते कातड्यांचा पोषाख करीत, अति ओबडधोबड असें अन्न खात. दोनच गोष्टी ते शिकत : घोड्यावर बसणें व लढणें. शांततेनें शेती किंवा व्यापार करणें ही गोष्ट त्यांना कमीपणाची वाटे. त्यांना ज्या गोष्टीची जरूर वाटे ती ते खुशाल लुटीत. स्वत:ला लागणार्या वस्तू जे विकत घेत त्यांना ते दुबळे म्हणून संबोधीत, बावळट म्हणून ते त्यांचा उपहास करीत. सर्वत्र लूटमार करीत ते दौडूं लागले. ठायीं ठायीं त्यांनीं पुरें-पट्टणें धुळीस मिळविलीं. सारें आशिया खंड उध्वस्त व दग्ध नगरांच्या धुळीनें व राखेनें भरून गेलें. आतांपर्यंत एवढें मोठें साम्राज्य कोणीं मिळविलें नव्हतें अशी शेखी ते मारूं लागलें.
प्रचंड साम्राज्य बांधणारे मेडीज हे पहिले होते. त्याचें अनुकरण पर्शियानें केले. ख्रि.पू. ६०६ मध्यें मेडीज लोकांनीं निनवी शहर घेतलें. असीरियन लोकांची सत्ता त्यांनीं कायमची नष्ट केली. भूतलावरून त्यांनीं त्यांचें उच्चाटन केलें. त्यानंतर छप्पन वर्षांनीं सम्राट् सायरस पुढें आला. सायरसनें मेडिजी लोकांच्या वैभवाचा बुडबुडा फोडला. पर्शियाच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षाच्या मोठ्या बुडबुड्याचा धक्का लागून मीडियन सत्तेचा बुडबुडा नष्ट झाला.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्याला ही गोष्ट झाली. याच शतकांत चीनमध्यें आणि हिंदुस्थानांत लाओत्से, कन्फ्यूशियस व बुध्द झाले. इतिहासाच्या ग्रंथांतून या तीन शांतिप्रधान महात्म्यांविषयीं फारसें लिहिलेलें नसतें. कारण ते रणधुमाळी माजविणारे नव्हते. ते स्वप्नसृष्टींत रमणारे अवलिये होते. प्रचंड सैन्यें घेऊन त्यांनीं कधीं परराष्ट्रांवर स्वार्या केल्या नाहींत. परंतु सायरस आदळआपट करणारा वीर होता. तो जागतिक साम्राज्याचा निर्माता होता. तो आपल्या पायांखालीं सारें आशिया खंड तुडविणारा सेनानी होता. आणि यासाठीं मूर्ख इतिहासकारांनीं त्याला ''मोठा'' ही पदवी दिली आहे. थोर सम्राट्, महान् सम्राट्, असें त्याला संबोधण्यांत येतें.
सायरस मोठा होता. परंतु कशांत ? तो अहंकारानें मोठा होता. कारस्थानें करण्यांत मोठा होता, लांचलुचपती घेण्यांत मोठा होता, अनियंत्रित सत्ता गाजविण्यांत मोठा होता, भोगलालसेंत मोठा होता. इतर कशांतहि तो मोठा नव्हता.