प्रकरण ४ थे
प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर बिस्मार्क
- १ -

मॅझिनी व मार्क्स जगाची पुनर्रचना न्यायाच्या पायावर करण्यासाठीं खटपट करीत असतां जुन्या संप्रदायाचे राजकारणी व मुत्सद्दी आपापले राज्यकारभार स्वार्थाच्याच पायावर चालवीत होते. ते मॅकिऑव्हिलियन तत्त्वांवर निष्ठा ठेवून वागत होते, एकमेकांचे प्रदेश लुबाडूं इच्छीत होते. मुत्सद्देगिरीच्या फसवाफसवीनें ते हळूच मुलूख चोरीत व मुत्सद्देगिरीनें जमलें नाहीं तर फौजा तयार ठेवीत.

प्रिन्स ऑटो व्हॉन बिस्मार्क हा एकोणिसाव्या शतकांतील अत्यंत प्रतिगामी, फसव्या व दुष्ट मुत्सद्दी होता. त्याची मूठ लोखंडाची होती; तो बलाचा उपासक होता. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेच्या क्षितिजापलीकडे तो पाहत असे. तो म्हणे, ''राजकारणांत आपला फायदा असल्याशिवाय केवळ शेजार्‍यासाठीं आपण कांहीं करीत नसतों.'' त्यानें जर्मनीचें एकीकरण करून प्रशियन सम्राटाच्या सत्तेखालीं जर्मनी देश दिला. बिस्मार्कनें लष्करी शक्ति उभारून कित्येक पिढयांची संस्कृति रक्ताच्या वादळांत नष्ट केली. वस्तुत: तो सतराव्या शतकांत शोभणारा मुत्सद्दी होता; पण तो चुकून एकोणिसाव्या शतकांत जन्माला आला.

त्याचा बाप प्रशियन सैन्यांतील रिटायर्ड कॅपटन होता; शोनॉसेन येथें त्याची इस्टेट होती, तिची व्यवस्था बापाच्या मरणानंतर बिस्मार्क स्वत: पाहूं लागला. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी म्हणजे १८४७ सालीं प्रशियांतील पहिल्या असेंब्लीच्या निवडणुकींत तो स्वत:च्या जिल्ह्यातर्फे निवडून गेला. या काळांत प्रगतिपर वारे सुटले होते; पण बिस्मार्कनें असेंब्लीपुढें केलेलीं सारीं भाषणें प्रतिगामी होतीं. तो अनियंत्रित राजसत्तेच्या दैवी हक्कांचें समर्थन करीत होता, ख्रिश्चन स्टेटचें समर्थन करीत होता. त्या वेळीं फ्रेडरिक वुइल्यम हा राजा होता, त्याचें लक्ष बिस्मार्ककडे गेलें व त्यानें त्याला आपल्या नोकरींत घेतलें.

१८४८ मधलें क्रान्तिकारक बंड मोडणें हें त्याचें पहिलें अधिकृत काम होय. पण या क्रान्तीमुळें एक गोष्ट मात्र झाली व तिच्यासाठीं तरी बिस्मार्कनें या क्रांतीस कृता राहणें जरूर होतें. ती म्हणजे ही कीं, या वेळेस जर्मनीचें राजकीय नसलें तरी निदान आर्थिक एकीकरण झालें. वेल्स म्हणतो, ''जर्मनीचें भाग विस्कळित होते. हाताच्या पंजाचीं बोटें असतात तशीं जर्मन स्टेट्स् होतीं. बिस्मार्कनें त्यांची एकजूट करून एकमूठ केली व ती मूठ वळून इतर देशांच्या तोंडावर ठोसे देण्यास बिस्मार्क उभा राहिला.

जर्मनीचें साम्राज्य निर्मावयासाठीं त्यानें जाणूनबुजून पध्दतशीर कारवाया सुरू केल्या. त्याला जर्मन साम्राज्यासाठीं वाव पाहिजे होता; अगर त्याच्याच शब्दांत सांगावयाचें तर सूर्यप्रकाशांतील महत्त्वाची जागा त्याला हवी होती, अर्थात् उष्ण कटिबंधांतील वसाहती वगैरे पाहिजे होत्या. प्रशियाचा राजा जगांतील सर्वश्रेष्ठ, सर्वसामर्थ्यसंपन्न व केवळ अनियंत्रित सर्वसत्ताधीश व्हावा अशी त्याची मनीषा होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel