- ३ -

कोणाहि नाटककारानें लिंकनच्या चरित्रापेक्षां अधिक दु:खद संविधानक निर्मिलेलें नाहीं. तो इतिहासांतील अत्यंत महत्त्वाकांक्षी पुरुष होता; पण त्यानें जें जें हातीं घेतलें त्या सर्वांत त्याला अपयशच आलें आणि अखेर जेव्हां यश आलें, तेव्हां तें अपयशापेक्षांहि कटुतर वाटलें. ज्या एकमेव स्त्रीवर त्याचें प्रेम होतें, ती मरण पावली व जिच्याशीं त्यानें लग्न केलें तिला पति सुखी व्हावा यापेक्षां पति कीर्तिमान् व्हावा याचीच चिंता जास्त असे. तो काँग्रेससाठीं दोनदां आणि सीनेटसाठीं दोनदां उभा राहिला; पण चारीहि वेळीं पडला. तो धंद्यांत शिरला, पण त्यांतहि त्याला अपयशच आलें. युनायटेड स्टेट्सच्या लँड-ऑफिसमध्यें नोकरी मिळावी म्हणून त्यानें अर्ज केला, पण तो नामंजूर झाला. व्हाइस-प्रेसिडेंटच्या जागेसाठीं तो उभा राहिला व अयशस्वी झाला. आणि अखेर जेव्हां तो प्रेसिडेंट म्हणून निवडला गेला, तेव्हां तो अत्यंत शांतिप्रिय असूनहि त्याला अत्यंत रानटी असें युध्द पुकारावें लागलें ! कुटुंबीयांवर त्याचें फार प्रेम होतें; पण दोन मुलें अकालीं मेलीं व त्याला रडावें लागलें;  एक तर अगदींच अर्भकावस्थेंत वारलें व दुसरें वयाच्या बाराव्या वर्षी. त्या वेळीं लिंकन प्रेसिडेंट होता. युध्दाची भीषण व गंभीर जबाबदारी खांद्यांवर असतां प्रिय पुत्राच्या मृत्यूचा असह्य व जबरदस्त धक्का त्याला बसला ! शेवटीं १८६५ सालीं युध्द एकदांचें संपलें. दैवानें विजयानंदाचा व यशाचा पेला भरून आणला. पण तो पेला तो ओंठाशीं आणणार तोंच गोळी घालून कोणीं तरी त्याचा प्राण घेतला. जनरल ली शरण आल्यावर पांचच दिवसांनीं त्याचा खून झाला. खरी ट्रॅजेडी कशी लिहावी हें देवांनीं लिंकनच्या चरित्रानें मानवी नाटककारांना शिकविलें आहे.

- ४ -

मी वर म्हटलें कीं, लिंकनजवळ शहाणपण कमी होतें. म्हणून हें अन्तर्गत युध्द झालें. माझ्या म्हणण्याचा अर्थ मला स्पष्ट करूं दे. लिंकन जगांतला एक मोठा मुत्सद्दी होता खरा, तरी पण प्रथम तो राजकारणी होता. त्याला मानवांच्या कल्याणाची तळमळ होती, पण तो स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला आधीं पूजिणारा होता. तो अभिजात व प्रतिभावान् विचारस्त्रष्टा नव्हता. तो विचारानें जुन्या वळणाचाच होता. वैयक्तिक सूड घ्यावयाचा असेल, तर त्यासाठीं लढण्यास तो तयार असे. राष्ट्राचा कोणीं अपमान केला अगर राष्ट्रावर कोणीं अन्याय केला, तर त्यासाठींहि लढावयास तो तयार असे. लढाईशिवाय अन्य मार्गच त्याला कधीं दिसत नसे. अन्यायाविरुध्द हत्यार उपसणें हा एकच मार्ग त्याला शिकविण्यांत आला होता. त्याला धीर धरवत नसे. बुध्द, कन्फ्यूशियस, टॉल्स्टॉय, यांच्याप्रमाणें त्याला गंभीर व प्रशान्त अशी दीर्घदृष्टि नव्हती.

त्यानें गुलामगिरीचें पाप पाहिलें, पण हें पाप मरणोन्मुख आहे, लवकरच नष्ट होणार आहे, हें मात्र त्यानें ओळखलें नाहीं. आपल्या राजकीय आशा-आकांक्षांच्या धुमाकुळांत जीवनाकडे विश्वव्यापक दृष्टीनें पाहण्याची संवय त्याला लावून घेतां आली नाहीं. तसें करण्यास त्याला वेळहि झाला नाहीं व तसा त्याचा स्वभावहि नव्हता. तो प्रेसिडेंट होण्यास उत्सुक होता; पण आपल्या निवडणुकीमुळें दक्षिणेकडील व उत्तरेकडील संस्थानांमध्यें नक्की युध्द होणार हें मात्र त्याच्या लक्षांत आलें नाहीं. १८६० सालीं प्रेसिडेंटच्या जागेसाठीं चार उमेदवार उभे होते. गुलामगिरीविरुध्द जोरदार आणि चढाईचें धोरण अवलंबावें असें म्हणणारा त्यांपैकीं फक्त लिंकनच होता. उत्तरेकडच्यांनीं ढवळाढवळ केल्यावाचूनहि दक्षिणेकडची गुलामगिरी नष्ट होईल अशी लिंकनचा प्रतिस्पर्धी डग्लस याची श्रध्दा होती. डग्लसची दृष्टि मोठी होती, पण लिंकन हुषार राजकारणपटु होता.

डग्लस निवडला गेला असता तर युध्द झालें नसतें, गुलामगिरी नैसर्गिक रीत्याच मेली असली; लिंकन इतिहासांत कमी प्रसिध्द झाला असता, पण अधिक दैववान् ठरला असता. पण संकुचित दृष्टि व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यामुळें देशांत मरण व विनाश हीं मात्र त्यानें ओढवून घेतलीं. युध्दाशिवाय जें करतां आलेंच नसतें असें कोणतेंहि भलें त्यानें केलें नाहीं, कोणतेंहि हितमंगल त्याला करतां आलें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel