- ६ -

बुध्द प्रेमधर्मांचे आचार्य, कन्फ्यूशियस न्यायाचे उद्गाते, जेरेमिया शांतीचा संदेश देणारे आणि प्लेटो सौंदर्याचे महान् सद्‍गुरू, सौंदर्याची उपासना प्लेटो शिकवितो.  त्यानें अशी एक नगरी बांधली कीं, जींत थोर मानव नांदत.  ही नगरी प्रकाश-देवतेला-अपोलोला त्यानें अर्पण केली.  ही नगरी त्यानें तारामंडळांत ठेवून दिली.  अशा हेतूनें कीं, भविष्यकालीन शिल्पकारांनीं आदर्श म्हणून, स्वत:च्या क्रांतिकारक स्वप्नांसाठीं एक दिव्य उदाहरण म्हणून, तिच्याकडे सदैव बघावें.

परंतु केवळ नवीन समाजसृष्टीचें एक स्वप्न खेळवून, एक दिव्य चित्र रंगवूनच, समाधान मानणारा प्लेटो नव्हता.  कन्फ्यूशियसप्रमाणें स्वत:च्या तात्त्विक व ध्येयवादी विचारांना प्रत्यक्षांत आणण्यासाठीं त्यानें धडपड केली.  सायराक्यूसचा राजा डायानिशियस यानें प्लेटोला आदरानें बोलावलें.  प्लेटो सिसिली येथें गेला.  त्यानें डायोनिशियसला शहाण्या माणसाप्रमाणें राज्य कसें करावें हें शिकविलें.  परंतु प्लेटोचे कांही क्रांतिकारक विचार ऐकून तो राजा घाबरला.  त्यानें प्लेटोला गुलाम करून विकलें व प्लेटोच्या क्रांतीतून स्वत:ला वांचविलें.

प्रामाणिक व न्यायी राज्यपध्दतीला जग अद्याप तयार नव्हतें.  प्लेटोच्या एका शिष्यानें त्याची खंडणी भरली आणि प्लेटो मुक्त झाला ; त्याचें स्वातंत्र्य त्याला मिळालें.  तो पुन्हां अथेन्सला आला, आणि आपल्या त्या तत्त्वज्ञानमंदिराच्या उपवनांत बसून तो पूर्वीप्रमाणें पुन्हां तात्त्विक विचार देत राहिला, आपलीं उपनिषदें देत राहिला.  किती तरी वर्षे असा हा महान् ज्ञानयज्ञ त्यानें चालविला होता ; तो प्रकाश देत होता आणि आतां तो एक्याऐशीं वर्षाचा झाला.  एका तरुण मित्राचें लग्न होतें.  आशीर्वाद देण्यासाठीं म्हणून तो तेथें गेला होता.  तेथें लग्नांतील थट्टाविनोद चालला होता.  सर्वत्र गडबड, हंशा, आनंद होता.  तो आनंदी गोंधळ त्याच्या प्रकृतीस मानवला नाहीं.  तो थकला. 'माफ करा' असें म्हणून तो जरा विश्रांति घेण्यासाठीं, थोडी झोंप घ्यावी, डुलकी घ्यावी म्हणून शेजारच्या खोलींत गेला.  इकडे थट्टामस्करीस ऊत आला.  खानपानगान जोरांत चाललें.  त्या लग्नाच्या वर्‍हाडाला जणूं त्या थकल्याभागलेल्या वृध्द तत्त्वज्ञान्याची विस्मृतिच झाली ! इकडे हा सारा धांगडधिंगा चालला असतां थोडी विश्रांति मिळावी म्हणून तो तिकडे धडपडत होता.

परंतु त्या पलीकडच्या खोलींत प्लेटोला गाढ झोंप लागली होती—शेवटचीच गाढ झोंप ! या जगांतील अर्थहीन आवाज, निरर्थक गोंगाट अत:पर त्याची शांति भंगविणार नाहींत, त्याची विश्रांति मोडणार नाहींत.  तत्त्वज्ञान्यांचा हा राजा, तत्त्वज्ञान्यांचा हा सम्राट्, याला शेवटीं समदृष्टि अशा त्या मृत्युदेवाच्या आदर्श राज्यांतील आमंत्रण आलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel