पण ईश्वर अधिक जाणतो व म्हणतो, ''मनुष्य अपूर्ण आहे व अंधारांतून धडपडत जात असतो, जीवनांत सतत पापें करीत असतो, हें खरें; पण आपल्या पापांतूनच तो अन्त:प्रेरणेनें जणूं प्रकाशाकडे जात असतो. देवाचा व सैतानाचा करार होतो व सैतानानें फॉस्टला मोह पाडून त्याच्या अमर आत्म्याचा नाश करता येतो का पाहावें असें ठरतें. जर एकाद्या जाणार्‍या क्षणाला 'हें क्षणा, तूं थांब. किती सुंदर आहेस तूं !'' असें म्हणावें लागून फॉस्ट पुढें जावयाचें नाकारील तर सैतान विजयी असें ठरावयाचें होतें.

फॉस्टचा पूर्वार्ध सर्वांस माहीतच आहे. सैतान फॉस्टला नवतारुण्य व जगांतील नाना स्वार्थी सुखें देऊन मोह पाडूं पाहतो. सौंदर्य, संपत्ति, विषयसुखें, बेछुटपणा, प्रेमाच्या जबाबदार्‍या न पत्करतां त्याचीं सुखें तेवढीं भोगणें, सारें सैतान फॉस्टला देत असतो. सैतानानें सांगितल्याप्रमाणें फॉस्ट मार्गरेटला प्रेमपाशांत अडकवितो व स्वत:चीं पापें व दु:खें भोगावयाला तिला सोडून जातो. कथेच्या या पाहिल्या भागांत त्याची सर्वत्र चुका करण्याकडे प्रवृत्ति आहे. तो वासनाविकारांकडे एकदम वळतो; पण या सर्व कुमार्गांत असा प्रसंग केव्हांच येत नाहीं कीं, जेव्हां एकाद्या क्षणाला 'तूं किती सुंदर आहेस ! थांब' असें म्हणण्याचा मोह त्याला पडावा.

मार्गरेटच्या मरणानंतर सैतान त्याला निराळयाच प्रकारच्या मोहांत पाडूं पाहतो. फॉस्ट मानवजातींचें प्रतीक आहे. आपणाला जीवनांतील प्रत्येक अनुभव यावा असें त्याला वाटतें. मानवांबरोबर राहावें, श्रमावें, त्यांच्याबरोबरच मानवजातीचें गलबत फुटेल तेव्हांचीं संकटें भोगावीं, त्या विपत्तींत त्यांचे भागीदार व्हावें असें त्याला उत्कटपणें वाटतें. 'प्रत्येक वेदनेसाठीं हृदय उघडें करून मानवांचे सारे आनंद व त्यांचीं सारीं दु:खें अनुभवण्याची' त्याला तळमळ लागलेली असते. सैतान फॉस्टला एका राजाच्या दरबारचा सल्लागार करतो. तो तेथें गटेप्रमाणें आपल्या कर्तबगारीनें व योग्य सेवेनें मानसन्मान मिळवितो. राजा कृतज्ञता दाखवितो. पण त्याला सुख मिळत नाहीं व वर्तमानकाळांतील जीवनामुळें तो निराश होतो. भूतकाळांतील सारें जीवन—सारें मानवी जीवन. तो डोळ्यांसमोर आणूं पाहतो. प्राचीन काळांतील हेलेनला तो जणूं पुन: सजीव करतो व तिजशीं लग्न लावूं पाहतो (जसें गटेनें ग्रीक कवींच्या विचारांशीं लग्न लावलें होतें). पण हेलेनला आलिंगन देताच ती अदृश्य होते व तिचा फक्त झगा उरतो. प्राचीन ग्रीसचें जीवन समजून घेणें फॉस्टला व गटेलाहि जमत नाहीं. त्यांनीं कितीहि प्रयत्न केले तरी प्राचीनांचा तो सुंदर आत्मा त्यांच्या हातीं सांपडत नाहीं. फक्त बाहेरचें कवचच त्यांच्या हातीं येतें.

फॉस्ट अशा प्रकारें एका अनुभवांतून दुसर्‍या अनुभवांत जातो. पण त्याला कशांतहि सुख वाटत नाहीं. ''त्याचें साधें चालणें म्हणजेहि सतरादां ठेंचाळणें व पडणें होतें.'' तो जें जें हातीं घेतो त्यांत त्यांत त्याला अपयशच येतें. कधीं काळीं विजय मिळालाच तरी तो पोकळ असतो व त्यामुळें त्याची अधिकच निराशा होते. युध्दांतील विजय म्हणजे मरणच होय. दोन्ही बाजूंचा विनाश झालेला असतो. सैतान त्याला मोठमोठीं शहरें व राज्यें, किल्ले सुंदर स्त्रिया, वैभवशाली कृत्यें, शाश्वत यश:श्री, सारें कांहीं देतो. पण फॉस्ट शेवटीं या सर्व गोष्टींना विटतो. त्याच्या जीवनाची कमान आतां पूर्ण होऊन खालीं उतरूं लागते. तारुण्यांतील सुखें, मध्यमावस्थेंतील महात्कृत्यें यांतून त्याला सारभूत असें कांहींच मिळत नाहीं. त्याच्या डोळ्यांवरची झांपड उडते, त्याची भ्रांति नष्ट होते, चिंता त्याच्या घराचा कबजा घेते. तारुण्यांतील वासनांच्या निखार्‍यांची जळून राख झालेली असते. तो अंध होतो व जीवनावधि चाललेला सुखाचा उद्योग आतां पुरे असें त्याला वाटूं लागतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel