'सूड घेणें हेंच जणूं जीवनाचें उदात्त ध्येय' असें हॅम्लेटला वाटतें. या सूड घेण्याच्या पवित्र कर्माच्या आड त्याच्या मतें ऑफेलियाचेंहि प्रेम येता कामा नये. हॅम्लेटचें जग एकंदरीत जंगलीच आहे. जरी तेथें तत्त्वज्ञानाचे विचार व सुंदर सुंदर वाक्यें ऐकावयाला आलीं, तरी सूडभावना हेंच परमोच्च नीतितत्त्व म्हणून तेथें पूजिलें जात आहेसें दिसतें. हॅम्लेट नाटकांतलें सारें काव्य दूर केल्यास तें अत्यंत विद्रूप वाटेल; त्यांत थोडीहि उदात्तता आढळणार नाहीं. हॅम्लेट हा एक तरुण व सुंदर राजपुत्र असतो. त्याची बुध्दि चौरचौघांच्या बुध्दीसारखीच असते. भुतांवर विश्वास असल्यामुळें तो आपली बुध्दि गमावून बसतो. पित्याचें भूत आपणास खुनाचा सूड घेण्यास सांगत आहे असें त्याला वाटतें व त्याचें डोकें फिरतें. तो मातेची निंदा करतो व ज्या मुलीशीं तो लग्न करणार असतो तिला दूर लोटून देतो. ती निराश होऊन आत्महत्या करते. तो तिच्या भावाला व बापाला ठार मारतो. नंतर आईला मारून तो स्वत:हि मरतो. आणि हें सर्व कशासाठीं ? तर भुताला दिलेल्या सूड घेण्याच्या वचनाच्या पूर्ततेसाठीं ! सुडाच्या एका गोष्टीसाठीं ही सारी दु:खपरम्परा ओढवून आणणें वेडेपणाचें वाटतें. एका सुडासाठीं केवढी जबर ही किंमत ! या नाटकाचें 'दारू प्यालेल्या रानवटानें लिहिलेलें नाटक' असें वर्णन व्हॉल्टेअरनें केलें आहे तें बरोबर वाटूं लागतें. सारें मानवी जीवन—मानवी जीवनाचें हें सारें नाटक सुध्दां—एका दारुड्यानेंच लिहिलें आहे असेंच जणूं आपणांसहि वाटूं लागतें. पण शेक्सपिअर जीवनाकडे फार संकुचित दृष्टीनें पाहतो असें म्हणणार्‍या संकुचित दृष्टीच्या टीकाकारांचें हें मत आहे. शेक्सपिअरच्या प्रज्ञेचा व प्रतिभेचा केवळ एक किरण हॅम्लेटमध्यें दिसतो. मानवी जीवनांतल्या अनंत गोष्टींतील सूड ही केवळ एक गोष्ट आहे, त्याप्रमाणेंच हॅम्लेटमध्यें शेक्सपिअरच्या अनंत विचारसृष्टींतील एकच गोष्ट दिसते. तें त्याचें वा जगाचें संपूर्ण दर्शन नव्हे. शेक्सपिअर हा जादूगार आहे. तो निसर्गाचें पूर्णपणें अनुकरण करूं शकतो. त्यानें हॅम्लेटला स्वत:च्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची मूर्ति बनविलें नाहीं. हॅम्लेटच्याद्वारां स्वत:च्या बुध्दीचा फक्त एक भाग त्यानें दाखविला. अनंत पात्रांच्याद्वारां त्यानें आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. सृष्टि आपलें स्वरूप विविधतेनें प्रकट करते : कोठें एक रंग, कोठें दुसरा; कोठें हा गंध, कोठें तो. तसेंच या कविकुलगुरूचें आहे. त्याच्या नाटकी पोतडींत हॅम्लेटमधल्या विचारांपेक्षां अधिक उदात्त विचार भरलेले आहेत. निसर्ग कन्फ्यूशियसला प्रकट करतो, तद्वतच हॅम्लेटलाहि निर्मितो. पण जगाचें पृथक्करण करतां करतां, प्रयोग करतां करतां, निसर्गाला व शेक्सपिअरला सुडापेक्षां अधिक उदात्त व सुंदर असें कांहीं तरी दाखवावयाचें असतें. हें जें कांहीं तरी अधिक सुंदर व अधिक उदात्त आहे, तें आपणांस 'टेंपेस्ट' मध्यें पाहण्यास मिळेल.

'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकांत शेक्सपिअर जगांतील अन्यायाला उपहासानें उत्तर देतो. हॅम्लेटमध्यें जगांतील अन्यायाची परतफेड सुडानें करण्यांत आली आहे, पण टेंपेस्टमध्यें अन्यायाची परतफेंड क्षमेनें करण्यांत आली आहे. टिमॉन व हॅम्लेट यांच्याप्रमाणेंच प्रॉस्पेरोहि दु:खातून व वेदनांतून गेलेला आहे. पण दु:खानें तो संतापत नाहीं, तर उलट अधिकच प्रेमळ होतो. त्याच्या हृदयांत अधिकच सहानुभूति उत्पन्न होते. ज्यांनीं त्याच्यावर आपत्ति आणलेली असते त्यांच्याबद्दलहि त्याला प्रेम व सहानुभूति वाटतात. तो जगाला शिव्याशाप देत नाहीं. जगाचा उपहासहि करीत नाहीं, पण आपल्या मुलांच्या खोड्या पाहून बाप जसा लाडिकपणानें हंसतो, तसा प्रॉस्पेरो हंसतो. टेंपेस्टमध्यें उपहास व तिरस्कार यांचा त्याग करून जरा अधिक उदात्त वातावरणांत शेक्सपिअर गेला आहे, खर्‍या तत्त्वज्ञानांत गेला आहे. इतर बर्‍याच नाटकांमध्यें शेक्सपिअर एकाद्या हृदयशून्य देवाप्रमाणें मानवांची क्षुद्रता आणि संकुचितता पाहून मिस्कीलपणानें हंसतो. तो एकाद्या राजाला सिंहासनावरून खालीं खेंचतो व 'हा तुझा डामडौल, ही तुझी ऐट सर्व नष्ट होऊन किडे तुला खाऊन टाकणार आहेत; त्या किड्यांना मासे खातील व ते मासे एकाद्या भिकार्‍याच्या पोटांत जातील.' असें त्याला सांगतो. पण टेंपेस्टमध्यें जरा रागवावयाचें झालें तरी तो रागहि सौम्य व सुंदर आहे. या नाटकांत कडवट व विषमय उपहासाचें करूण करुणेंत पर्यवसान झालें आहे. आतां आपण टेंपेस्टमधील कथा जरा पाहूं या. प्रॉस्पेरो हा मिलनचा ड्यूक. तो हद्दपार केला जातो. तो आपल्या मुलीसह एका जादूच्या बेटावर राहतो; तिचें नांव मिरान्दा. त्याच्या भावानेंच त्याला मिलनमधून घालवून दिलेलें असतें. भावाचें नांव अ‍ॅन्टोनिओ. नेपल्सचा राजा अलोन्सो याच्या मदतीनें तो भावाला हांकून देतो. प्रॉस्पेरो व त्याची तीन वर्षांची मुलगी यांना गलबतांत बसवून तो तें समुद्रांत सोडून देतो. हें गलबत सुदैवानें या मंतरलेल्या बेटाला येऊन लागतें. येथें प्रॉस्पेरो मुलीला शिकविण्यांत व मंत्रतंत्रांचा अभ्यास करण्यांत वेळ घालवितो. एरियल नामक एक विद्याधर असतो व कॅलिबन नामक एक राक्षस असतो. त्या दोघांना वश करून तो त्यांना आपली सेवा करावयास लावतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel