सेंट फ्रॅन्सिसच्या स्वभावांतील मुख्य गोष्ट म्हणजे अपरंपार सहानुभूति. त्याच्या मनांत सर्वांविषयीं प्रेम तद्वतच आदर असे. या बाबतींत तो बुध्दाप्रमाणें होता. तो जसा मोठ्यांतल्या मोठ्या माणसांशीं वागे, तसाच अत्यंत क्षुद्र माणसांशींहि वागे. एकाद्या सम्राटाला प्रणाम करण्यापेक्षां एकाद्या भिकार्‍याची क्षमा मागणें त्याला अधिक आवडे. वृक्षवेलींची वा फूलाफळांचीहि झोंप मोडूं नये म्हणून तो अगदीं हळू बोले. त्याची नम्रता स्वत:ला उगीचच क्षुद्र मानणारी नसून स्वत:चा विसर पाडणारी होती. ती खोटी व नीच निरहंकारिता नव्हती, तर स्वत:ला शून्य करणारी, खरी, श्रेष्ठ निरहंकारिता होती. त्याला स्वत:चा विचार करण्यास वेळच नसे. दुसर्‍यांना साह्य करण्यांत व सुख देण्यांतच तो सदैव रंगलेला असे. त्याला या जगांतील सार्‍या व्यक्ति जणूं राजाप्रमाणें वाटत व तो त्या सर्वांची जणूं आज्ञाधारक प्रजा असल्याप्रमाणें त्यांशीं वागे.

- ५ -

जगाचें भलें करीत भरपूर हिंडल्यावर तो घरीं परत आला, तेव्हां त्याचें वय चव्वेचाळीस वर्षांचेंच असेल, पण तो वृध्द झाला होता—ध्येयासाठीं चाललेली अविश्रांत धडपड व तदर्थ भोगावे लागलेले कष्ट यांमुळे तो खूप वृध्द झाला होता—जणूं अनेक शतकांनीं वृध्द झाला होता ! डोळे अधू होत होते; तरीहि हा प्रेमळ देवदूत लोकांना सुख देत हिंडत होता, आशेचीं मधुर गाणीं गात सर्वत्र जात होता. पण त्याची शक्ति संपत आली. तो अ‍ॅसिसी येथील आपल्या घरीं आला. ''तुम्ही कोठेंहि दूर यात्रा करावयाला गेलां, तरी शेवटीं घरीं या. तुमचें घर म्हणजे ईश्वराची पवित्र जागा होय.''

आणि ती अखेरची वेळ होती. त्याच्याभोंवतीं प्रेमळ मित्र होते. तो भूमातेच्या मांडीवर निजला तो निजलाच. इ.स. १२२६ मध्यें तो देवाकडे गेला.

तो निराश होऊन मेला. जी. के. चेस्टरटन लिहितो, ''सर्व मानवानीं सहकार्यानें वागावें असें आमरण शिकविणार्‍या फ्रॅन्सिसला सभोंवतीं झगडे व विरोध वाढत असतां मरण यावें हें दुर्दैव होय ! त्यानें आत्यंतिक दारिद्र्याचा वसा घेतला होता. तो युध्दविरोधक होता, अराजकवादी होता. तो आपल्या पंथांतील बंधूंना खासगी मालमत्तेपासून दूर राहण्यास सदैव सांगे. तो म्हणे, ''तुम्हीं मालमत्ता केली कीं तिच्या रक्षणार्थ तुम्हांला शस्त्रास्त्रें लागतील व मग तुम्हांला कायदेहि करावे लागतील.'' ईश्वराच्या गायकाला हातांत एक बांसरी, एक वीणा पुरे, असें तो नेहमीं म्हणे ! पण त्याला आपल्याच नांवानें मोठमोठे व संपन्न मठ स्थापन झालेले पाहावे लागले ! कांहीं फ्रॅन्सिस्कन बंधू घेतलेलें दारिद्र्याचें व्रत विसरून चर्चच्या मालमत्तेचे हक्क मिळावे म्हणून भांडत असल्याचें पाहण्याची पाळी त्याच्यावर आली. तथापि पुष्कळसे फ्रॅन्सिस्कन पंथीय घेतलेल्या व्रतांना चिकटून राहिले व सेंट फ्रॅन्सिसच्या शिकवणीशीं प्रामाणिक राहिले. त्यांचा छळ झाला. सर्व जण त्याचा तिरस्कार तसाच द्वेष करीत. सेंट फ्रॅन्सिसच्या मरणानंतर थोड्याच वर्षांत शंभरांहून अधिक फ्रॅन्सिस्कन पंथीय जिवंत जाळले गेले !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel