प्रकरण ८ वें
टॉर्कीमीडा व पवित्र 'इन्क्विझिशन' न्यायसंस्था
- १ -

इन्क्विझिशन या संस्थेविषयीं मीं कदाचित् पूर्वग्रहदूषित होऊन लिहीत आहे असें कोणास वाटूं नये म्हणून तिचें वर्णन मी तिच्या समर्थकांच्याच शब्दांत देणार आहें. या प्रकरणासाठीं गोळा केलेली सारी माहिती रोम कॅथॉलिक पुस्तकांतून घेतली आहे. ज्यांनीं ही संस्था सुरू केली, ज्यांनीं तिचें भूतकाळांत समर्थन केलें व जे आजहि एक थिअरी किंवा सिध्दान्त म्हणून तिचें मंडन करूं पाहत असतात अशांच्याच दृष्टींतून मी या 'इन्क्विझिशन' संस्थेकडे पाहणार आहें.

ते पहिले आरंभींचे ख्रिश्चन लोक ख्रिस्ताच्या शिकवणी नुसार हरएक अत्याचाराच्याविरुध्द होते. टरटुलियन म्हणे, ''ख्रिश्चनांना लष्करांत नोकरी करण्याचा हक्क नाहीं. धर्माची सक्ति करणें हें कोणत्याहि धर्माचें काम नाहीं. धर्माचा स्वीकार मोकळेपणानेंच केला जावा. तो कधींहि लादला जाऊं नयें.'' ओरिजेन व लॅक्टॅन्टियस यांचींहि मतें अशींच होतीं. लॅक्टॅन्टियस लिहितो, ''धर्म बळजबरीनें लादतां येणार नाहीं. अत्याचाराचें समर्थन कधींहि करतां येणार नाहीं.''

पण चौथ्या शतकांत ख्रिश्चनांचा हृदयपालट होऊं लागला. ऑगस्टाईन म्हणे कीं, कांही बाबतींत धर्मावर विश्वास न ठेवणार्‍यांस ठार मारणें योग्य आहे. ऑप्टेटस तर ''जे जे नास्तिक असतील त्या सार्‍यांना ठार मारलेंच पाहिजे'' असें उघड उघड म्हणे. ऑगस्टाइन व ऑप्टेटस आज सन्त मानले जातात.

चौथ्या शतकापासून पुढें ख्रिश्चनांचीं सदय व सहिष्णु हृदयें अदय व दुष्ट होऊं लागलीं आणि परधर्मीयांचा म्हणजे ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणार्‍यांचा छळ करावयाचा हें जणूं ठरुनच गेलें. पण अकराव्या शतकापर्यंत खरा ख्रिश्चनपणा थोडा तरी शिल्लक होता; त्यानंतर मात्र ख्रिश्चन साधुता जणूं पुरी लोप पावली ! परधर्मीय किंवा अधिकृत रोमन कॅथॉलिक धर्मावर विश्वास न ठेवणारे यांची सररास होळी होऊं लागली—अशांचें प्रचंड प्रमाणावर भस्म होऊं लागलें.

बाराव्या शतकांत ही जिवंत जाळण्याची प्रथा अधिकच बळावली. लोकांना ही दुष्टता आवडूं लागली. ११४० सालीं ग्रॅशियन यानें असें आज्ञा-पत्र काढलें कीं, नास्तिकता हा मरणाई गुन्हा आहे. क्रूसेडर्सना सांगण्यांत आलें कीं, जेथें जेथें परधर्मी दिसेल तेथें तेथें त्याला ठार करा. कॅथॉलिक इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो, ''हें कत्तलीचें काम जे जे करीत त्यांना पोप क्षमापत्रें देत असे.''

तेरावें शतक तर ख्रिश्चन इतिहासकार—विशेषत: रोमन कॅथॉलिक इतिहासकार—फारच मोठें मानतात. अशा या महत्तम शतकांतच पोप तिसरा इनोसन्ट झाला. त्यानें बिशपांना आज्ञापत्र लिहिलें, ''जे जे रोमन कॅथॉलिक धर्म मानणार नाहींत, त्या सर्वांना बहिष्कृत करा. 'या धर्मबहिष्कृततेच्या नरकांत पडाल' अशा शापाच्या आध्यात्मिक तरवारीनें न भागलें तर खरी भौतिक तरवार उपसून तिचा उपयोग करा.'' १२०९ सालीं बेझेरिस येथें मोठी कत्तल झाली. कत्तल करणारांनीं अ‍ॅबट आर्नोल्ड याला विचारलें, ''हा रोमन कॅथॉलिक आहे कीं नाहीं हें आम्हीं ओळखावें कसें ?'' तो म्हणाला, ''सार्‍यांचीच कत्तल करा. कोण कोणत्या धर्माचा हें देव पाहून घेईल.''

सहाव्या क्रूसेडचा नेता राजा दुसरा फ्रेडरिक हाता. तो वरील अ‍ॅबटपेक्षां जरा सौम्य होता. त्यानें आपल्या धार्मिक अनुयायांना सांगितलें, ''परधर्मीयांना जिवंत नका जाळूं. फक्त त्यांच्या जिभा छाटा, उपटा.''

पण इन्क्विझिशन नामक जी प्रसिध्द छळणारी न्यायसंस्था स्थापली गेली तिचें सारें श्रेय पोप नववा ग्रेगरी याला आहे. १२३१ सालीं त्यानें असा कायदा केला कीं, जे जे हट्टी विधर्मी असतील त्यांना ठार मारलेंच पाहिजे. आपल्या नास्तिकपणाचा पश्चात्ताप होऊन जे कॅथॉलिक होतील त्यांना सोडून द्यावें, म्हणजे ठार मारूं नये, पण जन्मभर तुरुंगांत मात्र ठेवावें. ग्रेगरीनें आपल्या हाताखालच्या बिशप वगैरे सर्वांना पटवून दिलें कीं, नास्तिकांना जिवंत जाळणें हें मुख्यतम कर्तव्य आहे. बिशपांनीं या कर्तव्यात कला ओतली. या कर्तव्यांत ते परम आनंद मानूं लागले. केवळ एका व्हेरोना शहरांत एका महिन्यांत त्यांनीं साठ माणसें जिवंत जाळलीं !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel