यांतील प्रत्येक आज्ञा आपण जरा नीट पाहूं या :—

१.    'स्वत:चा फायदा पाहा' ही त्याची पहिली आज्ञा. मॅकिआव्हिली हा नैतिकदृष्ट्या अंध होता. हें सारें जग एक आहे ही कल्पनाहि त्याला शिवली नव्हती ! हा मानवसमाज म्हणजे भावांभावांचें एक कुटुंब आहे,  सुखदु:खांत त्यांनीं परस्परांशीं एकरूप व्हावें, असें त्याला कधींहि वाटलें नाहीं. माणसें म्हणजे इतस्तत: पसरलेले रानटी पशूंचे कळप आहेत, अडाणी पशूंचे गट आहेत, असेंच तो मानी ! या जगांत कांहीं भोळे लोक आहेत, कांहीं दुष्ट पशू आहेत. दुष्टांनीं भोळ्यांभाबड्यांना स्वत:च्या सेवेसाठीं राबवावें असें त्याचें स्पष्ट मत होतें. या भोळंसटांवर जुलूम करणें, त्यांना चाबूक दाखविणें, हाच खरा मार्ग. याच रीतीनें त्यांचा उपयोग करून घेतां येईल असें तो म्हणे. जंगलचा कायदा असा आहे कीं, तुम्ही जर दुसर्‍याला हीनदीन न कराल तर दुसरे तुम्हांस हीनदीन करतील. बळी तो कान पिळी ! म्हणून तो म्हणतो कीं. जे बलवन्त आहेत त्यांनी आपल्या शक्तिचा प्रभाव दाखवावा व दुबळ्यांनीं आपल्या स्वत:च्या संरक्षणासाठीं गडबड करूं नये, अशा अर्थाचे कायदे करावे. प्रबळांची सेवा करणें हें दुबळ्यांचें कर्तव्य आहे. प्रबळांचें कर्तव्य मात्र एकच व तें म्हणजे स्वत:ची सेवा करणें, स्वत:चा स्वार्थ साधणें.

२.    दुसरें सूत्र 'स्वत:शिवाय दुसर्‍या कोणाला मान देऊं नका' हें आहे. तो लिहितो, दुसर्‍याच्या मोठेपणास जो कारणीभूत होईल तो स्वत:च नष्ट होईल. दुसर्‍यांचे हितसंबंध तोंपर्यंतच वाढवावे, दुसर्‍यांना तोंपर्यंतच गौरवावें, कीं जोपर्यंत त्यांचा स्वत:च्या स्वार्थासाठीं उपयोग करून घेतां येईल. पण ते अधिक लोकप्रिय होऊं लागले तर त्यांना ठार करावें. महत्त्वाकांक्षी मनुष्याला प्रतिस्पर्धी असणें बरें नव्हे; ते नाहींसे केलेच पाहिजेत. यशस्वी राष्ट्राला एकच धनी असावा, एकच हुकूमशहा असावा; बाकी सर्वांनीं त्याचे गुलाम असावें. राजानें दुसर्‍यांपासून नजराणे घ्यावे, दुसर्‍यांकडून स्तुतिसुमनांजलि घ्यावी, पण स्वत: मात्र कोणाचीहि स्तुति करूं नये, कोणालाहि देणगी वगैरे कांही देऊं नये.

३.    'साधुतेचें ढोंग करून दुष्ट आचरण करा' हें तिसरें सूत्र. वाईटच करा, पण चांगलें करीत असल्याची बतावणी करण्यास चुकूं नका. अप्रामाणिकपणा व दंभ यांवर मॅकिआव्हिलीचा विश्वास होता. मुत्सद्दयानें कधींहि मनांतील गोष्ट मोकळेपणानें सांगूं नये असें तो प्रांजलपणें म्हणे. आपण भलेपणानें वागणें अहितकर होय. पण भलेपणाचें सोंग करणें मात्र फायदेशीर असतें. जो अत्यंत चांगुलपणानें राहण्याची पराकाष्ठा करील, जो साधुतेचा आदर्श होऊं इच्छील, त्याचाच शेवटीं या भोंदू व दुष्ट जगांत नाश होईल. मॅकिआव्हिली म्हणतो, ''आपली सत्ता राहावी, दुसर्‍यांना लुटतां यावें, म्हणून राजानें न्यायबुध्दि, भूतदया, माणुसकी, विश्वास वगैरेंना रजा दिली पाहिजे. या सद्‍गुणांच्या विरुध्द, यांच्या उलट त्यानें वागलें पाहिजे; पण आपण अशा रीतीनें वागतों असें प्रजेला कळूं मात्र देतां कामा नये. राजा उदार आहे, दयाळू आहे, धार्मिक आहे, न्यायी आहे, असेंच प्रजेला सतत वाटेल अशी खबरदारी त्यानें घेतली पाहिजे. राजा प्रजेला वस्तुत: चिरडून टाकीत असतांहि तो आपलें रक्षण करीत आहे, असेंच ज्याला प्रजेला भासवितां येईल तोच खरा यशस्वी राजा !'' ओठांवर दया जरूर असूं दे,  पण पोटांत मात्र पापच असूं दे, अशी राजांना मॅकिआव्हिलीची शिकवण आहे.

४.    'जें जें शक्य असेल तें तें मिळवा, घ्या' हें चवथें सूत्र. स्वार्थी असा, लोभी असा, जें जें मिळवितां येईल तें तें मिळवा. मॅकिआव्हिलीच्या दुष्ट स्मृतीप्रमाणें राजानें स्वत:च्या इच्छापूर्तीशिवाय अन्य कशाचाहि विचार करूं नये, दुसर्‍यांच्या हक्कांची काळजी करूं नये. शक्य तें सारें लुटा, विरोध करणार्‍यांना गप्प बसवा, पण उदार असण्याची शेखी मिरविण्यास मात्र चुकूं नका. तथापि अतिलोभ नको; पण तो वाईट आहे म्हणून नव्हे, तर त्यांत धोका आहे म्हणून. परकीयांची लुटालूट करणें फार चांगलें; मात्र ते सूड घेऊं शकणार नाहींत असे असावे. स्वत:च्याच प्रजेवर फार कर बसवाल तर बंड होण्याची शक्यता असते. राजाला प्रजा रागानें पदच्युत करील अशी भीति असते. थोडक्यांत सांगावयाचें तर दुबळ्यांना लुटा व प्रबळांच्या बाबतींत सावध राहा. अशा रीतीनें वागाल तरच तुम्ही मोठे व्हाल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel