थोडा वेळ राजा झेडेकानें जेरिमियाचें ऐकलें.  परंतु त्याच्या प्रमुख सल्लागारांचें मत लढाईला अनुकूल होतें.  याच सुमारास इजिप्तमधून एक लष्करी शिष्टमंडळ आलें होते.  सल्लागार राजाला म्हणाले, ''इजिप्तच्या या लष्करी अधिकार्‍यांस मेजवानी द्या.  इजिप्तची मदत आपणांस मिळावी म्हणून प्रयत्न करा.''

जेव्हां इजिप्तचे प्रतिनिधी जेरुसलेममध्यें आले तेव्हां जेरिमिया मानेवर जूं घेऊन रस्त्यावर आला.  इजिप्शियन लष्करी अमलदारांचे गणवेष झगमगत होते.  त्यांचीं तीं शस्त्रें लखलखत होतीं.  आणि हा जेरिमिया कसा होता ? भुरे-भुरे केस, मेंढ्याच्या कातड्याचा तो गबाळ वेष आणि मानेवरील जड जोखडानें वांकलेली अशी त्याची ती करुणास्पद मूर्ति होती !  तेथील तो विरोध डोळ्यांत भरण्यासारखा होता.

लोकांनी विचारलें, ''मानेवरील या जोखडाचा अर्थ काय ?''

जेरिमिया म्हणाला, ''तुमच्या मुलाबाळांचा तरवारीला व दुष्काळाला बळी देण्यापेक्षां बाबिलोनचें जूं परवडलें हा याचा अर्थ.''

कितीतरी आठवडे जेरिमिया मानेवर जूं घेऊन रस्त्यावरून जात होता.  शेवटीं एके दिवशीं लष्करी पक्षाचा एक उत्साही सभासद हनानिआ यानें तें जूं ओढून घेतलें व त्याचे तुकडे केले.  तें मोडीत असतां हनानिआ म्हणाला, ''याप्रमाणेंच बाबिलोनचें सर्व राष्ट्रांच्या मानेवर असलेलें जूं मी मोडून तोडून फेंकून देईन.''

शेवटी लष्करी पक्षाचें धोरण विजयी झालें.  झेडेकानें इजिप्तशीं करार केला आणि इकडे बाबिलोनशीं त्यानें लढाई पुकारली.  मूठभर लोक जेरिमियाच्या मताचे होते.  परंतु राष्ट्रांत युध्दोत्साह संचारला होता.  सारे युध्दानें जसे बेहोष झाले होते !  अशा या गदारोळांत जेरिमिया व त्याची मूठभर शांतिसेना यांचे कोण ऐकणार ?

बाबिलोनच्या राजाचें नांव तेबुचदनेझ्झर.  त्यानें इजिप्शियनांना ताबडतोब शरण आणिलें आणि जेरुसलेमला वेढा घातला.  अशा वेळेस देशांत शांतीची गोष्ट काढणें म्हणजे देशद्रोह होता.  परंतु जेरिमिया शांतीचा संदेश देतच राहिला.  तो म्हणाला, ''युध्द पुकारलेंच ही चूक केलीत.  परंतु अजूनहि बाबिलोनच्या राजाशीं तह करण्यास हरकत नाहीं.''  तो याच्याहि पुढें गेला.  लढूं न शकणार्‍या सर्व नागरिकांस तो म्हणाला, ''मुलांनो, स्त्रियांनों, म्हातार्‍यांनो, दुर्बलानों ! या शहरांत उद्यां उपासमारीनें उंदरांप्रमाणें मरण्याऐवजीं तुम्ही खुशाल शत्रूकडे जा.  तेथें तुम्हांला अन्नपाणी मिळेल, दवापाणी मिळेल.  माझें ऐका.'' जेरिमिया हा पंचमस्तंभी आहे,  बाबिलोनची बाजू घेणारा देशद्रोही आहे, असें सारे म्हणूं लागले.  खरें पाहिलें तर जेरिमिया देशद्रोही नव्हता वा बाबिलोनचा पक्षपातीहि नव्हता.  तो उदार हृदयाचा एक महात्मा होता.  इतर सारे पिसाटाप्रमाणें वागत असतां तो समतोल वृत्तीनें वागत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel