आरंभींच्या झारांच्या काळांत रशियाची अशी दुर्दशा होती. पण सतराव्या शतकाच्या अखेरीस झार पीटर अलेक्झीविच यानें या प्रचंडकाय रशियन राक्षसाला आपल्या मजबूत हातांनीं झोंपेंतून जागें केलें व त्याला पश्चिम युरोपच्या सुधारणेकडे किलकिल्या डोळ्यांनीं पहावयास लाविलें.

- २ -

झार फिओडोर हा पीटरचा भाऊ. तो स्पायनोझाच्या मरणानंतर पांच वर्षांनीं म्हणजे १६८२ सालीं मरण पावला. तेव्हां पीटर दहा वर्षांचा होता. पीटरचा सोळा वर्षांचा इव्हान नांवाचा एक दुबळा भाऊ होता. पीटर व इव्हान हे दोघे संयुक्त राजे निवडले गेले. पण दोघेहि लहान असल्यामुळें त्यांची बहीण सोपिच्या राज्यकारभार पाही. ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळें तिनें पीटरला मॉस्कोच्या उपनगरांत पाठविलें व सिंहासनाचा कबजा घेतला. तिच्या मनांत त्याला आपल्या मार्गांतून अजी दूर करावयाचें होतें; पण तिनें त्याला तूर्त तात्पुरतें दूर केलें.

पीटर पंधरा वर्षांचा होईतों त्याला लिहावाचावयासहि येत नव्हते व बोटें मोडूनहि दहांपर्यंत आंकडे मोजतां येत नव्हते; पण त्याला मोडतोड करण्याचा नाद मात्र फार होता. हातांनीं नेहमीं कांही तरी करीत राहण्याची व खेळांतील गलबतें बांधण्याची त्याला आवड होती. बालवीर जमवून तो लुटूपटीच्या लढायाहि खेळे. हेच बालवीर पुढें रशियन सैन्याचा कणा बनले. यांतूनच रशियन सेना उभी राहिली.

आरंभींच्या झारांच्या काळांत परकीयांना मॉस्कोंत राहण्यास बंदी होती. त्यांना मॉस्कोच्या उपनगरांत रहावें लागे. पीटरची व या परकीयांची गांठ पडे व त्यांच्याविषयीं त्याला प्रेम वाटे. त्याला त्या परकीयांनीं जीवनाची एक नवीनच तर्‍हा दाखविली. ती त्याला अधिक रसमय वाटल्यामुळें त्याचें मन तिच्याकडे ओढलें गेलें. डच गलबतें बांधणारे, साहसी इंग्रज प्रवासी, इटॅलियन न्हावी, स्कॉच व्यापारी, पॅरिसमधील नबाब, जर्मन पंतोजी, हॅनिश वेश्या, या सर्वांशीं तो परिचय करून घेऊं लागला. पीटर सुशिक्षित नव्हता; पण या सर्वसंग्राहक वातावरणांत त्याची दृष्टि मोठी होऊं लागली. तो जणूं जगाचा नागरिक बनूं लागला. त्याचें जिज्ञासु मन जें जें मिळे तें तें घेई. त्याच्याशीं संबंध आलेल्या परकीय स्त्री-पुरुषांचे कांहीं गुण व बरेचसे दुर्गणहि त्यानें घेतले. पश्चिम युरोपांतील मोठमोठ्या राजांविषयीं अनेक कथा त्याच्या कानीं आल्या व आपणहि त्यांच्याप्रमाणें व्हावें असें त्याला वाटूं लागलें.

सतराव्या वर्षी त्यानें दोन गोष्टी केल्या : स्वत:चें लग्न व बहीण सोपिच्या हिची हकालपट्टी. एवढ्याशा वयांत आपण होऊन मुलें या गोष्टी करीत नाहींत. त्याचा अर्धवट भाऊ इव्हान पुढें लवकरच मेला व पीटर रशियाचा एकमेव सत्ताधीश झाला. उपनगरांतील वास्तव्य सोडून तो राजधानींत राजवाड्यांत रहावयाला आला. पण राणीच्या संगतींत किंवा दरबारांतील सुखांत त्यानें मन रमेना, रंगेना. परकीय व्यापारी, सुतार, वेश्या वगैरेंचीच संगत त्याला अधिक आवडे. म्हणून साधे कपडे घालून तो पुन: उपनगरांतील विदेशी मित्रमंडळींच्या संगतींत राहण्यास गेला, तेव्हां सरदारांनीं व दरबारी लोकांनीं नाकें मुरडलीं.

पीटर धष्टपुष्ट, रानवट व दांडगट होता. त्याचें शरीर शूप विकसित झालें होतें, पण मन अविकसितच राहिलें. तो रंगानें काळसर असून सहा फूट साडेसहा इंच उंच होता. त्याचे ओंठ जाड होते. अशा या अगडबंब व धिप्पाड माणसाची वृत्ति उत्कट होती. त्याला स्वत:चें कांहींहि सोडूं नये असें वाटे. जीवनांत त्याला कांहींच गंभीर वाटत नसे. सारें जग जणूं त्याचें खेळणें होतें.

त्याला गलबतें बांधण्याची फार हौस होती. तो सांगे, ''मला पीटर दि कार्पेंटर म्हणा.''  राजदंड हातीं मिरविण्यापेक्षां घण हातीं घेऊन काम करणें त्याला अधिक आवडे. लहानपणीं त्यानें अल्प प्रमाणावर सैन्य उभारलें होतें. आतां गलबतें बांधून आरमाराचाहि पाया घालावा असें त्याच्या मनांत आलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel