रोमन सैनिकांसमक्ष उच्चारलेले ते शब्द म्हणजे जणूं भविष्यवाणीच होती !  पण रोमनांनीं त्या शब्दांकडे लक्ष दिलें नाहीं.  पायलेटनें त्याला मरणाची शिक्षा फर्मावली ! रोमन रिवाजाप्रमाणें क्रॉसवर खिळे ठोकून त्याला ठार मारण्यांत आलें !  ख्रिस्ताबरोबर दोन चारहि त्याच्या दोन्ही बाजूंस क्रॉसवर चढविले गेले.  त्यांनीं अपार वेदना होऊं लागल्यामुळें शिव्याशाप दिले ; पण ख्रिस्तानें क्षमा केली.  क्रॉसवरून लोंबकळणार्‍या त्या तिघांच्याहि मरणकाळच्या किंकाळ्या मात्र एकमेकींत मिसळून गेल्या.  अव्यवस्थित अशा या जगांत कोठेंच नीट न बसूं शकणारे असें ते तिघे दुर्दैवी, करुणास्पद जीव होते !

- ४ -

मानवी ख्रिस्ताचें माझ्या मतें हें असें चित्र आहे.  घरच्यांनीं नाकारलेला, नागरिकांनीं धमकावलेला, मित्रांनी सोडलेला, शत्रूंनीं क्रॉसवर चढविलेला, अनुयायांकडून आतांपर्यंत विपरीत अर्थ केला गेलेला असा हा येशू ख्रिस्त कांही जादूगार नव्हता.  त्यानें चमक्तार केले नाहींत.  पण द्वेषानें पेटलेल्या या जगांत त्यानें दाखविलेलें प्रेम हाच खरोखर थोर व अपूर्व चमत्कार नव्हे काय ? त्यानें केलेल्या चमत्कारांच्या म्हणून ज्या कथा गॉस्पेल्समध्यें वर्णिल्या आहेत, त्यांहून त्यानें शत्रूंबद्दल दाखविलेलें प्रेम हा कितीतरी पटींनी मोठा चमत्कार नव्हे काय ?  अर्वाचीन रूढ अर्थानें तो चर्चवाला नव्हता.  त्याला विधिविधानांचा तिटकारा होता.  कोंडलेलीं व गजबजलेलीं प्रार्थना-मंदिरें त्याला आवडत नसत.  त्याचें चर्च मोकळ्या जागेंत होतें.  रस्त्याच्या कडेचा एकादा दगड हेंच त्याचें व्यासपीठ, तद्वतच जाडाभरडा व प्रवासामुळें जीर्ण-शीर्ण झालेला एकादा झगा हाच त्याचा पोषाख असे आणि आपल्या मातृभूमीचीं गाणी गाणारे ज्यू मजूर त्याचे साथीदार असत.  ख्रिस्त आज जिवंत असता तर आपल्या नांवानें चालणारी युध्दें, तद्वतच करण्यांत येणारे द्वेष-मत्सर, छळ व अपराध पाहून तो विस्मितच झाला असता.  ज्या ज्यू राष्ट्रानें ख्रिश्चनांना देव दिला त्याच ज्यूंची निंदा चर्चवाले करीत आहेत असें त्याला दिसलें असतें.  एका ज्यू धर्ममार्तंडानें त्याला मरणाची शिक्षा फर्मावली येवढ्याचसाठीं आपली सारी ज्यू जात धिक्कारिली जात असलेली त्याला दिसली असती व त्यानें ख्रिश्चन चर्चला सौम्यपणें सांगितलें असतें कीं, आपणास जन्म देणारी माताहि एक ज्यू बाईच होती.  ख्रिस्त जर आज जर्मनींत येईल तर तेथले ख्रिश्चन विद्यार्थी त्याला ज्यू समजून त्याच्या पाठीस लागतील.  तो रुमानियांत जाईल तर त्याला तेथले लोक धांवत्या आगगाडीच्या डब्याच्या खिडकींतून बाहेर फेंकून देतील.  तो पॅलेस्टाईनमध्यें जाईल तर अरब लोक त्याला ठार करतील व जवळच उभे असणारें ख्रिस्ती धर्मी इंग्रज सैन्य ती गंमत पाहत राहील.  अमेरिकेंतहि पुष्कळशा कॉलेजांत ख्रिस्ताला प्रवेश मिळणार नाहीं.  थोडक्यांत म्हणजे आज जर ख्रिस्त जिवंत होऊन येईल तर त्यालाहि ख्रिश्चन राष्ट्रांना स्वत:च्या धर्माकडे घेऊन जाणें अशक्यप्राय होईल व मान हालवून म्हणावें लागेल, ''हे प्रभो, हे तात, यांना क्षमा कर,  आपण काय करीत आहों हें यांना कळत नाहीं.'' तर मग ख्रिस्ताचें जीवन काय फुकटच गेलें ?  तो काय उगीचच जगला ? बिलकुल नाहीं.  बर्नार्ड शॉ सर्वांना बजावून सांगत आहे कीं, ''ख्रिस्ताचें जीवन विफल झालें असें अद्यापि म्हणतां येणार नाहीं.  कारण, त्याच्या पध्दतीनें प्रयोग करून पाहण्याचें शहाणपण अद्यापि कोणींहि दाखविलेलें नाही.''

पण शॉच्या या म्हणण्यांत नेहमींप्रमाणें अतिशयोक्ति आहे.  कारण दोन माणसांनीं ख्रिस्ताच्या पध्दतीचा अवलंब केलेला आहे : एक म्हणजे ज्यू तत्त्वज्ञानी स्पायनोझा व दुसरे म्हणजे हिंदु धर्मी गांधी.  ख्रिश्चन जनतेला पुन: ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यांत ज्यू व हिंदु यांना अद्यापिहि यश येण्याचा संभव आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel