प्रकरण ४ थे
मुक्या शतकांचा आवाज : डान्टे
- १ -

सेंट फ्रॅन्सिस रोमन चर्चचा आनुषंगिक पुत्र होता, तर डान्टे रोमन चर्चचा खरा म्हणजे संपूर्ण अर्थानें पुत्र होता. सेंट फ्रॅन्सिसच्या मोठेपणाशीं त्याच्या कॅथॉलिक असण्याचा संबंध नव्हता. तो मुसलमान असता, ज्यू असता वा बुध्द धर्मी असता तरीहि त्यानें आपल्या जीवनाचें दैवी काव्य लिहिलेंच असतें. त्याचा मोठेपणा अभिजात होता. तो गुण तो एका विशिष्ट धर्माचा वा पंथाचा असल्यामुळें आलेला नव्हता. तो कॅथॉलिक होता ही केवळ योगायोगाची गोष्ट होती. पण डान्टेचा मोठेपणा त्याच्या कॅथॉलिक पंथीय असण्यामुळेंच आहे. डान्टे कॅथॉलिक नसता तर त्याला इन्फर्नो हें महाकाव्य लिहितां आलें नसतें. नरकाचीं व भीषण शिक्षांचीं वर्णनेंहि करतां आलीं नसतीं. सेंट फ्रॅन्सिस मानवजातीची उत्कृष्टता दाखवितो, तर डान्टे रोमन कॅथॉलिक पंथाची उत्तमता दाखवितो. सेंट फ्रॅन्सिस हें मानवजातीच्या वेलीवरील सुगंधी व निर्दोष फूल आहे, डान्टे हें कॅथॉलिक धर्माच्या वेलीवरचें फूल आहे. कॅथॉलिक, बिन कॅथॉलिक, सर्वासच सेंट फ्रॅन्सिस वांचवूं पाहतो, या जगांतील दु:खांतून त्या सर्वांचीच सुटका करण्यास धांवतो; पण डान्टे कांहीं अपवादात्मक कॅथॉलिक व्यक्ति सोडून बाकी सर्वांना परलोकींच्या नरकाग्नींत लोटून देतो !

सेंट फ्रॅन्सिसचा आवाज सर्व काळांसाठीं आहे. त्याची वाणी सर्व युगांसाठीं आहे; पण डान्टे केवळ मध्ययुगाची भाषा बोलतो, फक्त मध्ययुगाचा पुरस्कार करतो. त्याचें महाकाव्य चर्चचे गुण, दोष दोन्ही दाखवितों ..... मध्ययुगांतल्या मनांतील सौंदर्य व कडवेपणा दोहोंचेंहि संपूर्ण चित्र तो देतो. मध्ययुगांतील भलें, बुरें, दोन्ही रंगवितो. मध्ययुगांतील मन—डान्टेचें कॅथॉलिक पंथीय मन-उत्कट प्रेम करी तद्वतच उत्कट द्वेषहि करी; चर्चमधल्या सर्व गोष्टींवर तें मन प्रेम करी,  पण चर्चबाहेरील जगाचा मात्र द्वेष व तिटकारा करी. तो द्वेष प्रेमामुळेंच होता. प्रत्येक कॅथॉलिकास असें शिकविण्यांत येत असे कीं, ईश्वराचें आपल्या लेंकरांवर प्रेम असल्यामुळेंच तो त्यांना शिक्षा करतो. जे चुकतील, पद-च्युत होतील त्यांना तो प्रेमानें कठोर शासन करतो. ईश्वराच्या या प्रेमाचें अनुकरण करणारे हे मध्ययुगांतील कॅथॉलिकहि त्यांना जे चुकलेले वाटत त्यांचा छळ करीत, त्यांना ठार मारीत. ''यांच्या आत्म्यांचा बचाव व्हावा म्हणून, यांच्यावर आमचें प्रेम आहे म्हणूनच आम्ही यांना छळतों व ठार करतों'' असें ते म्हणत. जी. के. चेस्टईन आपल्या 'सेंट फ्रॅन्सिस' या पुस्तकांत लिहितो, ''माणसावर प्रेम करणें व त्याला ठार मारणें यांत विसंगति नाहीं.'' चेस्टर्टन हा आजकालच्या कॅथॉलिसिझमचा आचार्य आहे. चेस्टर्टनच्या मध्ययुगीन मनाला तेराव्या शतकांतील तें मन नीट समजतें. डान्टेला नरकांत पडणारांविषयीं करुणा वाटे. फ्रॅन्सेस्का ऑफ रिमिनि ही व्यक्ति त्याला लहानपणापासून माहीत होती. त्याचें फ्रॅन्सेस्कावर प्रेम होतें; पण त्यानें फ्रॅन्सेस्कास नरकांतच लोटलें आहे. डान्टेला का करुणा नसे वाटत ? वाटे, पण आपल्या पापांसाठींच त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे, त्यांचा अमानुष छळ होत आहे, या विचारानें डान्टेला एक प्रकारचा आनंद वाटतो; तो छळ पाहून त्याचे डोळे ओले होत नाहींत ! तो पाहण्यांत त्याला नकळत जणूं एक प्रकारचें दुष्ट समाधानच वाटतें ! आणि त्यांचीं ती पापें तरी खरींखुरीं होतीं का ? डान्टेच्या मतें मात्र तीं त्यांचीं पापेंच होतीं व म्हणून तो त्यांना भराभरा नरकवासाच्या शिक्षा ठोठावतो. त्या सर्वांचा छळ व्हावा अशी प्रभूचीच इच्छा आहे असें त्याला वाटे. डान्टे ज्या चर्चचा प्रतिनिधी होता, त्या चर्चप्रमाणेंच तोहि ईश्वराची इच्छा काय आहे येवढें सांगूनच थांबत नसे, तर स्वत: शिक्षा देणारा व ठार मारणारा ईश्वराचा अमलदारहि बने. डान्टेचें हृदय विश्वकवीचें होतें; पण त्याचें मन मात्र मध्ययुगांतील पाद्र्याचें होतें.

मध्ययुगांतील इतिहासाचा आत्मा नीट समजावयाला हवा असेल तर डान्टेचें मन समजून घेणें फार महत्त्वाचें आहे. कारण मध्ययुगाचा आत्मा म्हणजेच डान्टे. म्हणून या बाबतींत मी जरा विस्तारानें लिहीत आहें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel