कैसर एकोणीस वर्षांचा असतां म्हणजे १८७९ सालीं त्याची आजी, इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, ही हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषणा करण्यांत आली, त्याच वेळीं त्यानें मनाशीं खूणगांठ बांधून ठेवली कीं, मी जेव्हां जर्मनीचा राजा होईन तेव्हां मीहि असाच सम्राट होईन व वाटेल ती किंमत देऊन जर्मन साम्राज्य वाढवीन. त्याचे वडील तिसरे फ्रेडरिक हे १८८८ सालच्या जून महिन्यांत वारले. त्यांनीं फक्त तीनच महिने राज्य केलें. वुइल्यमला राज्याभिषेक झाला. त्यानें गादीवर येतांच चॅन्सेलर बिस्मार्क याला काढून टाकलें व आपण एकट्यानें राज्य चालवावयाचें ठरविलें.

वुइल्यम फार उंच नव्हता. त्याचा डावा हात सुकलेला होता. त्याची बुध्दिषह कांहीं मोठी अपूर्व नव्हती. पण तो स्वत:ला आपल्या अहंकाराच्या आरशांत पाही. 'आपण महाप्रभु आहों', 'ईश्वराच्या खालोखाल जर कोणाचे वैभव असेल तर तें आपलेंच', असें त्याला वाटे. त्यानें आपल्यासमोर जणूं जिहोव्हाचा आदर्श ठेवला होता. तो तदनुसार वागत होता, त्याच्याप्रमाणें आपणाला बनवूं पाहत होता. आपलें यशावैभव वाढविण्यासाठींच मानवजात आहे असें त्याला वाटे. कीर्तीची अपरंपार भूक त्याला होती. आपल्या पिढींतील जास्तींत जास्त मोठा आवाज करणारा आपणच व्हावें असें त्याला वाटे. सारीं राष्ट्रें आपणाकडे पाहत राहतील अशा रीतीनें आपल्या तलवारीचा खणखणाट  करण्याचें त्यानें ठरविलें होतें. ब्रिटानिया समुद्राची स्वामिनी होती. कैसरनेंहि भूमीचा तसाच समुद्राचाहि स्वामी होण्याचें ठरविलें. त्याचे निर्दय व कठोर डोळे जगाला क:पदार्थ मानीत. त्याच्या मिशांची दोन्हीं टोकें वर मिळलेलीं असत—जणूं तो स्वर्गालाहि तुच्छ मानीत होता, स्वर्गालाहि ऐट दाखवीत होता !

सारीं राष्ट्रें तलवारीच्या साधनानें आपापलीं राज्यें—साम्राज्यें वाढविण्यासाठीं धडपडत होतीं, स्पर्धा करीत होतीं. ''ठीक,'' कैसर म्हणाला, ''या सर्वांना जर्मन राष्ट्र तलवार कसें धरतें तें दाखवून देतों.'' सारें इंग्लंड युध्दभावनांनीं .नाचत होतें. पुढील गीत सर्वांच्या ओंठावर होतें :—

''आम्हांला लढण्याची इच्छा नाहीं; पण लढण्याची वेळच आली तर आमच्याजवळ भरपूर आरमार आहे, भरपूर द्रव्यबळ आहे व भरपूर मनुष्यबळहि आहे.''

इंग्लंडचें आव्हान वुइल्यमनें स्वीकारलें, ''मीहि माझ्या जर्मनीला माझ्या हयातींत सैन्य, संपक्ति व गलतबें यांनीं संपन्न करतों'' अशी घोषणा करून तो प्रतिज्ञेवर सांगे कीं, ''माझें सारें जर्मन राष्ट्रच शिपाईगिरीचा पेशा पत्करील. विजयी चढाई हेंच माझें जीवितकार्य !''  राज्यावर येतांच तो म्हणाला, ''सैन्यावरच माझी सारी भिस्त आहे.''  आपल्या जर्मन राष्ट्राला शिस्त शिकवावयाला, शिक्षण द्यावयाला व संघटित करावयाला तो उभा राहिला. कत्तलीसाठीं तो त्याना पुष्ट करूं लागला. इतिहासांतील अत्यंत अव्यंग असें युध्दतंत्र त्यानें निर्माण केलें व तें खरोखरच इतकें परिपूर्ण होतें कीं, तें शेवटी वाटोळें फिरलें व निर्मात्याचाच नि:पात करतें झालें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel